असं नातं हवंय….!! – स्नेहल डोके पाटील

असं नातं हवंय….!!

मला असं नातं हवंय, ज्यात मला कोणतंही स्पष्टीकरण देत बसावं लागणार नाही. स्वतःबद्दल खुलासे देत बसण्याजोगे काहीही असणार नाही.

शारीरिक थकव्यापेक्षा तुम्हाला मानसिक थकवा जास्त खच्ची करतो. ज्यामुळे असं नातं शोधावंस वाटत, जिथं मला विश्वासातून निर्माण झालेल स्वातंत्र्य लाभेल. जिथे मला माझ्या वागणुकीबद्दल खुलासे द्यावे लागणार नाहीत.

मला असं नातं हवंय, जिथे माझ्याच विरोधात मला उभं केलं जाणार नाही. माझी काही बलस्थाने आहेत, तर काही त्रुटी सुद्धा आहेत. जे नातं मी शोधात आहे, त्यात माझ्या कमकुवत बाजूला सतत भडकवलं जाणार नाही, चिथावलं जाणार नाही.


मला असं नातं हवंय, जिथे नेहमी माझ्यातील सकारात्मक घटक वैयक्तिक पातळीवर आणले जातील.

मी असं नातं बांधू इच्छितो/इच्छिते, जिथे माझा “आज” मी काल केलेल्या चुकीच्या प्रकाशात पहिला जाणार नाही.

मी माणूस आहे हातून चुका होणारच, मला आता असं कोणी हवंय जे माझ्या चुकांचा अहवाल राखत बसणार नाही.
शोध अशा नात्याचा आहे, जिथे कालच्या कुरबुरी आजच्या परस्पर संवादामध्ये खीळ घालत नाहीत, जिथे “काल” कालच संपून गेलेला असेल.

मला असं नातं हवंय, ज्यात सारखं केवळ मलाच पुढाकार घ्यावा लागणार नाही, ते नातं हवं ज्यामधे मी पारदर्शक असू शकतो. असे नातं जे मिळवण्याकरीता आणि टिकावण्याकरीता मला माझ्या आवडीनिवडी बदलाव्या लागणार नाहीत.

मला असं नातं हवंय जिथे माझ्या आत्मप्रतिभेला ओरखडे पडत नाही, मला असं नातं हवं जिथे मी कोणीतरी वेगळाच असण्याची अपेक्षा केली जात नाही.

मला नातं हवं ते असं, जिथे मला स्वत्व पूर्ण पने अनुभवता येईल. अगदी मी माझ्या सोबत असतो त्या पेक्षा हि जास्त.

असं नातं ज्यात मला पुन्हा आईच्या गर्भात असल्यासारखं वाटेल, असं नातं ज्यात माझ्या अंतःकर्णाला अगदी नुकताच जन्माला आल्या सारखं वाटेल.

असं नातं हवंय…!

Read more...
Open chat