बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

सजग वेब टीम , मुंबई

मुंबई | बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. शिरूर लोकसभेची निवडणूक बैलगाडा शर्यत व वाहतूक कोंडी या प्रश्नांवरून गाजली होती. खा.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती.

आज झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैलगाडा शर्यतबंदी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले आहे तसेच त्यासाठी खासदार व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे विचारात घ्या. महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी सुनावणी लवकर व्हावी यासाठी चर्चा करू. तसेच या संदर्भात नियमित बैठका घेऊन सुनावणी बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल असेही केदार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाची वेगवेगळ्या राज्यांबाबत घेत असलेली भूमिका अन्यायकारक 

राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या बाजूने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यामध्ये शर्यतबंदीमुळे खिल्लारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भूमिका मांडावी. त्याचबरोबर आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट होत आहे, ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे याबाबी ठामपणे मांडल्या पाहिजेत असे सांगितले. त्याचबरोबर एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबाबत सर्वोच्च न्यायालय घेत असलेली भूमिका अन्यायकारक आहे हेही ठासून मांडले पाहिजे असे मत डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

Read more...

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद – खासदार डॉ. अमोल कोल्हे

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद – खासदार डॉ. अमोल कोल्हे

जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्या वतीने कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा किट वाटप आणि प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान

नारायणगाव | जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीने तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीआरोग्य सुरक्षा किट उपलब्ध करून दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे असे मनोगत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
रघुकुल मंगल कार्यालय नारायणगाव येथे जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार ‘ वितरण आणि ‘आरोग्य किट वाटप’ कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके जि.प.सदस्य पांडुरंग पवार,सरपंच योगेश पाटे तहसीलदार हनुमंत कोळेकर,सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम,गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे,एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, मुस्लिम समितीचे अध्यक्ष सादिक आतार, उपाध्यक्ष समद इनामदार, सचिव मेहबूब काझी, सहसचिव अशफाक पटेल, सदस्य मुबारक तांबोळी, हाजी रज्जाक कुरेशी, आरिफ आतार, रईस मणियार, रऊफ खान,हाजी कदिर मोमीन, रऊफ इनामदार, अजीम तिरंदाज, रिजवान पटेल, वाजिद इनामदार, सलीम पटेल, रफिक शेख, फिरोज पठाण, फकीर आतार,नसीर अहमद, अजीम इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

‘ चांगले रस्ते,वीज, पाणी नागरिकांना पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच आहे परंतु कर्तृत्व करून दाखवायचे असेल तर अद्यावत हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था उभ्या कराव्या लागतील,मुस्लिम सेवा समितीने सुचविलेल्या विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाजाच्या विविध कामांसाठी लवकरच तालुकास्तरीय बैठक बोलावली जाईल असे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांना मान्यवरांच्या हस्ते ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नारायणगाव कोविड सेंटरच्या आरोग्य कर्मचारी यांचाही यावेळी आरोग्य सुरक्षा किट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती सचिव मेहबूब काझी यांनी केले, सूत्रसंचालन सहसचिव अशफाक पटेल यांनी केले व आभार फकीर आतार यांनी मानले.

Read more...

खा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश, फॅबीफ्लूची किंमत केली कमी

खा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश, फॅबीफ्लू गोळी मिळणार ७५ रुपयांत

सजग वेब टीम, पुणे

पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ‘FABIFLU’च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन ७५ रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

देशभरात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच एका गोळीची किंमत रु. १०३ यानुसार १४ दिवसांच्या उपचारासाठी रु.१२,५०० इतका दर निश्चित केला होता.

ग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी दि. २४ जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कोविड उपाययोजनेबाबतच्या आढावा बैठकीत ग्लेनमार्कच्या दाव्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी डॉ. कोल्हे यांनी Fabiflu या गोळीची रु. १०३ ही किंमत अवास्तव असून भारतातील गरीब, निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर ग्लेनमार्कने केलेली चाचणी प्रोटोकॉल समरीनुसार को-मॉर्बिड परिस्थितीत Fabifluचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेली नसल्याकडे डॉ. कोल्हे यांनी सर्वांचे‌ लक्ष वेधले होते.

डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच औषधाची किंमत कमी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागरुकतेबद्दल वैद्यकीय व्यवसायातील जाणकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.

या संदर्भात डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, कोविड-१९च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशाप्रकारे दावे वा जाहिराती करून सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ग्लेनमार्कने Fabiflu या गोळीची किंमत ७५ रुपये केल्याने या लढ्याला पहिलं यश मिळाले असून पुढील काळात सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि उपचाराचा खर्च आवाक्यात राहावा यासाठीचा आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read more...
Open chat