ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक

स्वप्निल ढवळे, सजग टाईम्स न्यूज

नारायणगाव | नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित पाचव्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल समिट २०२० चे ऑनलाईन आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये भारत व इतर देशातील शैक्षणिक तज्ञांनी व्हर्च्युअली आपली मते मांडली. या समिटमध्ये नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल स्कूलच्या प्राचार्या उषा मूर्ती यांनाही वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मुलांचा अवघ्या वय वर्षे चार पासूनच शैक्षणिकच नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा वसा घेऊन काही नाविन्यपूर्ण उपक्रम जसे कम्युनिकेटीव लँग्वेज प्रोग्रॅम, सर्कल टाईम, फॅमिली सपोर्ट बिल्डींग अॅक्टिविटीज, कल्चरल अॅक्टिविटी, मुलांच्या गरजेप्रमाणे व अभ्यासक्रमानुसार पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी उपक्रम प्राचार्या उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुरू करण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण प्राचार्या उषा मूर्ती यांनी ऑनलाईन व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे केले. या उपक्रमांचे भरभरून कौतुक या समिटमध्ये करण्यात आले व ब्लूमिंगडेल प्री स्कूल ला बेस्ट स्कूल इन इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह टेक्निक इनिशिएटीव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार मिळविण्यात शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांनी विविध उपक्रमांच्या संकल्पनेला सत्यात उतरवले व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांच्यामधील संवादाला एक नवी ओळख करून दिली असे उषा मुर्ती यांनी सांगितले.

नवनवीन उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके या मोलाचे सहकार्य व साथ देत असतात. त्यांच्या सहयोगाने व पुढाकाराने हे उपक्रम यशस्वीपणे पार पाडता येतात असेही मूर्ती यावेळी म्हणाल्या.

कोविड-१९ च्या संकटकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा लॉकडाऊन सुरु असताना मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित व्हर्च्युअल ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा दूरदर्शी निर्णय अवघ्या १५ दिवसातच ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मॅनेजमेंट व प्राचार्यांनी घेतला. आज पर्यंत त्याचे नियमित व यशस्वी नियोजन सुरू आहे. अगदी नर्सरी पासून इयत्ता १२वी पर्यंतचे क्लासेस सुरू करण्याकरिता सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालकांना सुद्धा वेळोवेळी माहिती व गरज पडल्यास ट्रेनिंग देऊन त्यांनाही नवीन ऑनलाइन शिक्षण पद्धती आत्मसात करण्यास ब्लूमिंगडेलचे प्रयत्न सुरू आहेत व त्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे अशी माहिती प्राचार्य मूर्ती यांनी ग्लोबल समिटमध्ये दिली.

आदर्श विद्यार्थी घडविणे या ध्येयाचे पुन्हा उच्चारण करत गौरी बेनके यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाच्या सहयोगाचे कौतुक केले. ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यास शाळा नेहमीच अग्रेसर राहील. शैक्षणिक पद्धतीचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले तरीही ब्लूमिंगडेल पूर्णपणे हे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य रित्या घडवत राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ही ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या जागतिक पुरस्काराचा उल्लेखनीय सन्मान केला व विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे ध्यासपूर्ण कार्य संस्था नेहमीच करते असे ही मत त्यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

आदर्श विद्यार्थी घडविणे हे ध्येय समोर ठेवून संस्थेचे सर्व कर्मचारी, संचालक व व्यवस्थापन कार्यरत आहे व संस्थेच्या प्रगतीबाबत समाधानी आहोत असे गौरी बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाच्या सहयोगाचे कौतुक यावेळी त्यांनी केले. नवनवीन उपक्रम व आदर्श विद्यार्थी घडविण्यात शाळा नेहमीच अग्रेसर राहील. शैक्षणिक पद्धतीचे बदलते स्वरूप काळानुसार कितीही बदलले तरीही ब्लूमिंगडेल हे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने घडवत राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ही ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या जागतिक पुरस्काराबद्दल उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या कर्मचारी, शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले आहे. बदलत्या काळात नव्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे ध्येय समोर ठेवून संस्था नेहमीच कार्यरत राहील असे मत त्यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

Read more...

कार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना

कार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव (दि.२५) | कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करत एक विवाह सोहळा नुकताच हिवरे तर्फे नारायणगाव याठिकाणी पार पडला. या सोहळ्यातील वधूसह १२ रुग्णांचे निदान कोरोना पॉझिटिव्ह आले आणि यापैकी वधूची आजी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत नारायणगाव पोलिसांनी वर पिता सह्याद्री भिसे आणि ओसारा हॉटेल चे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत नारायणगांव पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा १३ऑगस्ट रोजी हिवरे तर्फे नारायणगांव येथील ओसारा हॉटेल येथे झाला. भिसे हे येडगांव येथील शेतकरी व नारायणगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी राजकीय कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कोरोनाबाधित असलेली वधूची आजी उपस्थित होती. त्यांचे उपचार सुरु असतांना पुण्यात निधन झाले. त्यानंतर वधूसह लग्नसोहळ्यातील दोन्ही कुटुंबातील अकरा जणांचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोशल मिडियावर सध्या या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

समाज माध्यमांवर झालेल्या या चर्चेची व माहितीची शहानिशा करत नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी हॉटेल ओसारा येथे जाऊन चौकशी केली असता. त्यात उपस्थितांच्या यादीत कोरोना बाधित व्यक्तींचे नावे आढळून आले. त्यामुळे कार्यमालक भिसे आणि ओसारा होटेलचे मालक यांचेवर गुन्हा रजिस्टर २५८/२०२०भारतीय दंड विधान कलम १८८,२६९,२७० कलमान्वये कोविड -१९ उपाययोजना २०२० नियम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Read more...

यंदा आरोग्य उत्सव; नारायणगाव च्या श्री नवनाथ तरुण मिञ मंडळाचा उपक्रम

यंदा आरोग्य उत्सव नारायणगाव च्या श्री नवनाथ तरुण मिञ मंडळाचा उपक्रम

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | सध्या कोविड१९ चे संकट सर्वच उत्सवांच्या मानगुटीवर बसले आहे. नागरिकांना प्रत्येक उत्सव साजरा करताना प्रशासकीय नियम आणि अटी पाळाव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही कोरोनामुळे अनेक नियमांच्या विळख्यात अडकला आहे. तरीही घरोघरी आणि सामाजिक पातळीवर हा उत्सव युवक युवतींनी प्रशासकीय नियम पाळून खबरदारी घेऊन साजरा करण्याचे ठरविले आहे.

नारायणगाव च्या श्री नवनाथ तरुण मित्र मंडळाने यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

मंडळाच्या या आरोग्य उत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व कार्यकर्ते सँनिटायझर आणि मास्कची पँकींग करण्यात व स्वच्छता किटस् बनविण्यात मग्न आहेत. या किट्स चे वाटप मंडळाचे देणगीदार, सभासद, ढोल वादक, आसपासची गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते यांना देण्यात येणार आहेत. तसेच मंडळाच्या शेवटच्या घटकापर्यंत या आरोग्य विषयक वस्तू पोहचल्या जाणार आहे. आजच्या दिवसांत या स्वच्छता किट्स ची गरज ओळखून या वर्षीचा गणेश उत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते ऋषि वाजगे यांनी दिली आहे.

Read more...

नारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन

नारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | अकोले तालुक्यातील राजुर येथील ८५ वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले यांच्या नारायणगाव शाखेचा शुभारंभ अमित बेनके, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उद्योजक विनायक कर्पे, पन्हाळे पेढ्याचे प्रमुख अभिजित पन्हाळे यांच्या हस्ते संपन्न झाला. नारायणगाव येथे सुदिप व अक्षय सुनिल कसाबे यांनी या व्यावसायाची शाखा सुरु केली आहे.

या उद्घाटन प्रसंगी संतोष दांगट, अनिताताई कसाबे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, जयेश कोकणे, अतुल आहेर, संजय बढे, राजेश कोल्हे, भावेश डोंगरे, विकास कोल्हे, ईश्वर पाटे, अॅड.कुलदिप नलावडे, प्रा.अशफाक पटेल, अक्षय कसाबे, विविध उद्योजक, ग्रामपंचायत सदस्य यांसह मित्र परिवार उपस्थित होते.

नारायणगाव व वारुळवाडी परिसरातील ग्राहकांसाठी पेढ्याची घरपोच डिलिव्हरी दिली जाणार असुन ग्राहकांनी आवर्जुन या सेवेचा लाभ घ्यावा तसेच एकदा नारायणगाव बसस्थानका समोरील असणार्‍या पेढा सेंटरला भेट द्यावी व पेढ्याची गोडी चाखावी असे आवाहनही सुदिप कसाबे यांनी केले आहे.

Read more...

नारायणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल

नारायणगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी पुणे अँटीकरप्शन ब्युरोने कारवाई केली आहे. काल रात्री हि कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व न्यायालयात लवकर दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पाच लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन केशव घोडे पाटील व पोलिस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. “एसीबी”चे पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घोडे पाटील व हांडे यांनी तक्रारदाराकडे सात ऑगस्ट रोजी पाच लाख रूपयांची लाच मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला हा प्रकार अयोग्य वाटला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी “एसीबी”कडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन दोघाविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. तर पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर पर्यवेक्षण अधिकारी आहेत.

Read more...

वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा.अमोल कोल्हे

वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद ही ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन वास्तू गावच्या तसेच तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी व नावलौकीक वाढविणारी आहे.असे गौरवोदगार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले . वारूळवाडी येथे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामसंसद वारूळवाडी या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

यावेळी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,सभापती ऍड संजय काळे,जि. प.सदस्या आशा बुचके,पांडुरंग पवार,सरपंच जयश्री बनकर,उपसरपंच सचिन वारुळे,रमेश भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ,उद्योजक संजय वारुळे,बाजार समिती संचालक विपुल फुलसुंदर ग्रामसेवक विद्याधर मुळूक जालिंदर कोल्हे,जंगल कोल्हे,राजेंद्र मेहेर,रवी साळुंके,अविनाश घोलप व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे,विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनीही भेट दिली .

उत्तर पुणे जिल्हात सर्वात मोठी आणि अद्यावत सुविधा असलेली १५ हजार ८०० स्क्वे. फुटाची ही ग्रामपंचायत इमारत असून या ग्रामपंचायतीमध्ये स्वागतकक्ष,सरपंच,ग्रामसेवक,अतिथी कक्ष,अभिलेख कक्ष,वाचनालय अशा सुविधा आहेत,तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वारूळवाडी ग्रामपंचायत ओळखली जाणार आहे अशी माहिती संजय वारुळे आणि उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली .

याप्रसंगी उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल स्थापत्य अभियंता रवी साळुंखे व अविनाश घोलप यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ व आरोग्य सेवक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेहेर यांनी केले तर जंगल कोल्हे यांनी आभार मानले.

दरम्यान जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचा पुणे याठिकाणी कोरोना उपचारा दरम्यान निधन झाल्याने हा उद्घाटन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करीत अवघ्या २० मिनिटांत हा कार्यक्रम साजरा करून सर्व प्रमुख उपस्थितांच्या वतीने दशरथ पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Read more...

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद – खासदार डॉ. अमोल कोल्हे

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद – खासदार डॉ. अमोल कोल्हे

जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्या वतीने कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सुरक्षा किट वाटप आणि प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मान

नारायणगाव | जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीने तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीआरोग्य सुरक्षा किट उपलब्ध करून दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे असे मनोगत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
रघुकुल मंगल कार्यालय नारायणगाव येथे जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार ‘ वितरण आणि ‘आरोग्य किट वाटप’ कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके जि.प.सदस्य पांडुरंग पवार,सरपंच योगेश पाटे तहसीलदार हनुमंत कोळेकर,सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम,गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे,एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, मुस्लिम समितीचे अध्यक्ष सादिक आतार, उपाध्यक्ष समद इनामदार, सचिव मेहबूब काझी, सहसचिव अशफाक पटेल, सदस्य मुबारक तांबोळी, हाजी रज्जाक कुरेशी, आरिफ आतार, रईस मणियार, रऊफ खान,हाजी कदिर मोमीन, रऊफ इनामदार, अजीम तिरंदाज, रिजवान पटेल, वाजिद इनामदार, सलीम पटेल, रफिक शेख, फिरोज पठाण, फकीर आतार,नसीर अहमद, अजीम इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

‘ चांगले रस्ते,वीज, पाणी नागरिकांना पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच आहे परंतु कर्तृत्व करून दाखवायचे असेल तर अद्यावत हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था उभ्या कराव्या लागतील,मुस्लिम सेवा समितीने सुचविलेल्या विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाजाच्या विविध कामांसाठी लवकरच तालुकास्तरीय बैठक बोलावली जाईल असे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांना मान्यवरांच्या हस्ते ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नारायणगाव कोविड सेंटरच्या आरोग्य कर्मचारी यांचाही यावेळी आरोग्य सुरक्षा किट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती सचिव मेहबूब काझी यांनी केले, सूत्रसंचालन सहसचिव अशफाक पटेल यांनी केले व आभार फकीर आतार यांनी मानले.

Read more...

नारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात

नारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात

नारायणगाव कोविड सेंटरमधून पहिला रुग्ण कोरोनामुक्त डाॅक्टरांनी आनंद व्यक्त करत गुलाबपुष्प देऊन केले डिस्चार्ज

नारायणगाव | नारायणगाव कोविड सेंटरमधून वैष्णवधाम येथील ४९ वर्षाच्या महिला संजीवनी निवृत्ती पवार यांच्यावर ११ दिवस चांगल्या पद्धतीने उपचार करुन कोरोनामुक्त केले. आज नारायणगाव कोविड सेंटरमधील पहिल्या रुग्णाला ठणठणीत बरे करुन डाॅक्टरांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन डिस्चार्ज करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये शासकीय डाॅक्टरांसह जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे खाजगी डाॅक्टरही याठिकाणी सेवा देत आहेत.

यानिमित्तानं पवार आजींनी खंबीरपणे कोरोनाला समोरे जा घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगत कोविड सेंटरचे डाॅक्टर, नर्सेस व सर्व कर्मचारी यांचे आभार मानले.

यानिमित्तानं डाॅ.प्रसाद शिंदे, डाॅ.योगेश आगम, डाॅ.मिलिंद घोरपडे, डाॅ.अभिजित काळे, डाॅ.शशांक, डाॅ.ऋषिकेश रासने, डाॅ.लहु खैरे, वाजगे सिस्टर, पाडेकर सिस्टर, राजवाडे सिस्टर, कुटे सिस्टर, काळे सिस्टर, क्षिरसागर सिस्टर यांसह ईतरही डाॅक्टर, नर्से व कर्मचारी उपस्थित होते.

Read more...

अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क

उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले मास्कचे वाटप

नारायणगाव | नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांचे विश्वासू सहकारी अनिल खैरे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.

यानिमित्तानं नारायणगाव खोडद रोड येथे जवळपास १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना काळात कार्यरत असणार्‍या सेवकांना २०० मास्कचे सरपंच योगेश पाटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईड फवारणी, अर्सेनिक गोळ्यांचे वाटप यांसह ग्रामपंचायत व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यामातुन राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमात अनिल खैरे हे सक्रिय पुढाकार घेत अाहेत. सध्या कोरोना पार्श्वभुमीवर सामाजिक जबाबदारी अोळखुन त्यांनी वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने हार, तुरे, फ्लेक्स यावर अनावश्यक खर्च करु नये असे आवाहनही मित्र परिवाराला केले होते. त्यानुसार मित्र परिवाराने खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक उपक्रम राबवले यानिमित्तानं त्यांचे वर्गमित्र लक्ष्मी ऑटो स्पेअर्स चे मालक विशाल अडसरे यांनी ग्रामपंचायतला २०० मास्क भेट दिले.

यावेळी विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, कुसुमताई शिरसाठ, राजेश बाप्ते, भाऊ मुळे, धर्मेंद्र गुंजाळ अजित वाजगे, ईश्वर पाटे, अजय पाटे, जयेश कोकणे, जालिंदर खैरे, नंदू अडसरे यांसह अनिल खैरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

Read more...

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलचा सलग सहाव्या वर्षी १००% निकाल

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलचा सलग सहाव्या वर्षी १००% निकाल

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव येथील ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी संचलित ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीतील सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून सलग सहाव्या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे अशी माहिती संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व खजिनदार गौरी बेनके व प्राचार्य उषा मूर्ती यांनी दिली आहे.

इयत्ता १०वी च्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक – हर्ष संदीप गुंजाळ (९६%),
द्वितीय क्रमांक – तनिष्का गणेश तेली (९५.८ %),
तृतीय क्रमांक – ओम संजय गुंजाळ (९४.६%).

इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे गुण पुढील प्रमाणे –

प्रथम क्रमांक – रेवती संजय दुराफे (८२.४६%),
द्वितीय क्रमांक – प्रथमेश शैलेश गायकवाड (८१.६९ %),
तृतीय क्रमांक – प्रतिक्षा रमेश गाडेकर (७६.४६%)

यावर्षी शाळेचे एकूण ४० विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसले होते. यातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून आठ विद्यार्थ्यांनी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांनी ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे. ब्लुमिंगडेल शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशात सर्व शिक्षकांचा आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाने तसेच दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सर्वगुणसंपन्न आणि आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे उद्दिष्ट्य आहे असे मत संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके यांनी व्यक्त केले. सध्याच्या बदलत्या शैक्षणिक स्वरुपात आपला विद्यार्थी कसा अग्रेसर राहील याकडे संस्थेचे नेहमी लक्ष असते असेही गौरी बेनके यावेळी सांगितले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक अध्यापन प्रणाली, उच्च शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण प्रभावी केले जात आहे.

Read more...
Open chat