ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलचा सलग सहाव्या वर्षी १००% निकाल

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलचा सलग सहाव्या वर्षी १००% निकाल

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव येथील ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी संचलित ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीतील सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून सलग सहाव्या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे अशी माहिती संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व खजिनदार गौरी बेनके व प्राचार्य उषा मूर्ती यांनी दिली आहे.

इयत्ता १०वी च्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे गुण पुढीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक – हर्ष संदीप गुंजाळ (९६%),
द्वितीय क्रमांक – तनिष्का गणेश तेली (९५.८ %),
तृतीय क्रमांक – ओम संजय गुंजाळ (९४.६%).

इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी व त्यांचे गुण पुढील प्रमाणे –

प्रथम क्रमांक – रेवती संजय दुराफे (८२.४६%),
द्वितीय क्रमांक – प्रथमेश शैलेश गायकवाड (८१.६९ %),
तृतीय क्रमांक – प्रतिक्षा रमेश गाडेकर (७६.४६%)

यावर्षी शाळेचे एकूण ४० विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेस बसले होते. यातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून आठ विद्यार्थ्यांनी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांनी ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे. ब्लुमिंगडेल शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशात सर्व शिक्षकांचा आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाने तसेच दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सर्वगुणसंपन्न आणि आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे उद्दिष्ट्य आहे असे मत संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके यांनी व्यक्त केले. सध्याच्या बदलत्या शैक्षणिक स्वरुपात आपला विद्यार्थी कसा अग्रेसर राहील याकडे संस्थेचे नेहमी लक्ष असते असेही गौरी बेनके यावेळी सांगितले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक अध्यापन प्रणाली, उच्च शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण प्रभावी केले जात आहे.

Read more...

परिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – राजू शेट्टी

परिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – राजू शेट्टी

सजग वेब टीम, कोल्हापूर

कोल्हापूर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या यावर्षीच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी परत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे केली.
राज्यातील एका शिवाजी विद्यापीठाच्या अतंर्गत 3 जिल्ह्यातील एकूण 279 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयाकडून लॉकडाऊन पुर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी परिक्षा फी घेतलेली आहे. या सर्व महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 13.50 कोटी रूपये परिक्षा फी आपल्या विद्यापीठाकडे जमा झालेली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये असे लाखो विद्यार्थी असून त्या विद्यार्थ्यांची फी माफ होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर, कामगार, तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेची मुले आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने सध्या सर्वत्र मंदीची लाट सुरू आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या आहेत. परिक्षाच रद्द झाल्याने राज्यातील सदर परिक्षेची जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले कि फी परत करण्याबाबत शासन सकारात्मक असून विद्यार्थांना परिक्षा फी परत देण्यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास त्याच फीमध्ये पुढील वर्षीच्या परिक्षा घेतले जातील अशी ग्वाही दिली.

Read more...

जुन्नरच्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम

जुन्नरच्या आदिवासी भागातील ऋतुजा राज्यशास्त्रात राज्यात प्रथम

सजग टीम, जुन्नर

 

 जुन्नर | शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा सोमतवाडी या शाळेची उज्वल यशाची व निकालाची परंपरा गेल्या दहा वर्षापासून अबाधित आहे याआधी सलग तीन वर्ष इयत्ता बारावी चा निकाल शंभर टक्के लागलेला असून यावर्षीचा निकाल 97:72 टक्के लागला आहे.

या शाळेत जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ऋतुजा संपत लांडे या विद्यार्थीनीने १२ वीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवत जुन्नरचे नाव राज्यात चमकवले आहे.

या यशाबद्दल आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व प्रकल्प अधिकारी पंढुरे साहेब यांनी वैयक्तिकरित्या ऋतुजा व शिक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, नुकताच इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेच्या निकालात ऋतुजा लांडे हिने राज्यशास्त्र या विषयामध्ये राज्यात दुसरा तर आदिवासी विकास विभाग मध्ये प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. हालाखीच्या परिस्थितीत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरांमधून तिचे कौतुक होत आहे.

जुन्नर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असणारे आदिवासी वस्तीचे घाटघर हे ऋतुजाचे गाव. आई संजाबाई व वडील संपत लांडे हे शेती करतात जेमतेम असणारी शेती हेच उत्पन्नाचे साधन आई वडिलांचे शिक्षण फारसे झाले नाही. पण आपल्या मुलीने शिकून मोठं व्हावं ही त्यांची इच्छा. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे तिने सोनं केल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

ऋतुजाने प्राथमिक शिक्षण घाटघर येथील जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर पुढील शिक्षणसाठी आदिवासी आश्रम शाळा जुन्नर येथे प्रवेश घेतला. याठिकाणी ऋतुजाला आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे, वर्ग शिक्षक एस. एस. भारती यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तर राज्यशास्त्र विषयाचे शिक्षक गणेश गोडसे यांचा देखील तिच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे ऋतुजाने “सजग टाईम्स न्यूज”शी बोलताना सांगितले.

ऋतुजाला कायद्याची आवड असून तिला विधितज्ञ होऊन महिलांमध्ये कायद्याविषयी असणारे अज्ञान याबद्दल जनजागृती करायची असल्याचेही तिने सांगितले.

ऋतुजाच्या यशामध्ये जुन्नर आंबेगावचे प्रांताधिकारी व आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र डुडी, सहायक शिक्षण प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, अधीक्षिका ए.के.राजपूत, बी.डी.आमटे, व्ही.डी.साबळे, पूर्व अधिक्षिका ए.टी.पवार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Read more...
Open chat