बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
सजग वेब टीम , मुंबई
मुंबई | बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. शिरूर लोकसभेची निवडणूक बैलगाडा शर्यत व वाहतूक कोंडी या प्रश्नांवरून गाजली होती. खा.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती.
आज झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैलगाडा शर्यतबंदी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले आहे तसेच त्यासाठी खासदार व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे विचारात घ्या. महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी सुनावणी लवकर व्हावी यासाठी चर्चा करू. तसेच या संदर्भात नियमित बैठका घेऊन सुनावणी बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल असेही केदार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाची वेगवेगळ्या राज्यांबाबत घेत असलेली भूमिका अन्यायकारक
राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या बाजूने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यामध्ये शर्यतबंदीमुळे खिल्लारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भूमिका मांडावी. त्याचबरोबर आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट होत आहे, ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे याबाबी ठामपणे मांडल्या पाहिजेत असे सांगितले. त्याचबरोबर एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबाबत सर्वोच्च न्यायालय घेत असलेली भूमिका अन्यायकारक आहे हेही ठासून मांडले पाहिजे असे मत डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत व्यक्त केले.