जि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

पश्चिम भागात नवीन युवा चेहरा राजकारणात येणार?

सजग राजकीय – (स्वप्निल ढवळे, मुख्य संपादक)

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पाडळी निरगुडे गटाचे जि.प.सदस्य देवराम लांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. देवराम लांडे हे याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सध्या शिवसेना या सर्व पक्षांकडून विविध निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. मागील वर्षीही शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते पद, जिल्हा नियोजन समिती सदस्य पद आदी विषयांवरून लांडे यांनी व समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.

जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा काही नेम नसतो. येत्या काळात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात मोर्चे बांधणी करत आहे. याआधीही लांडे यांच्या बाबत पक्ष पातळीवर देखील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी विविध नेत्यांशी चर्चा घडल्या आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यातच दिवाळीच्या काळात लांडे यांनी घेतलेल्या नवीन वाहनाची पूजा देखील आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी लांडे यांचा मुलगा अमोल लांडे हा देखील उपस्थित होता. यावरून देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी चांगलीच जवळीक साधून आहेत हे स्पष्ट होत आहे परंतु ते काय निर्णय घेतात हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

आमदार वल्लभ बेनके यांच्या काळातही देवराम लांडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. सध्या लांडे यांचा मुलगा अमोल हा आदिवासी भागातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे. विविध गावातील सरपंच आणि कार्यकर्ते घेऊन ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील अशीही चर्चा आहे. आगामी काळात देवराम लांडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आमदार अतुल बेनके व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read more...
Open chat