देवेंद्रभाईंच्या मदतीचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव !

‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ देवेंद्र भाई शहा यांच्या मदतीचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव !

माझ्या परिचयातील एक कुटुंब कोरोनाग्रस्त झाले. वडील मुंबईतून छोट्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर नाईलाजाने पहारेकरी म्हणून नोकरी करत आहेत. मुलगी उच्चशिक्षित परंतु घटस्फोटीत तिने आवटे कॉलेजात काही दिवस काम केलेले होते म्हणून ओळख झालेली, आई घरकाम करणारी. अशा कुटुंबाला रोजीरोटीसाठी नाईलाजाने बाहेर पडावे लागत असल्याने कोरोनाने गाठले.

” गरिबाला या प्रसंगी पैशापेक्षाही धैर्याची गरज असते, त्या मुलीला धीराने संकटाचा सामना करायला सांगा, बाकी अडचणी पाहायला मी आहेच “

– देवेंद्र शहा

त्यातील मुलीची हालत अत्यंत वाईट झाली. तिला रेम्डेसेव्हीर इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय दिसेना. बाहेर जगात ही इंजेक्शन काळ्या बाजारात अत्यंत पाच सात पटीने पस्तीस चाळीस हजाराला मिळत असल्याचे ऐकले होते. त्यामुळे अत्यंत भीती वाटली. या मुलीला सहा इंजेक्शन घ्यायला सांगून दोन दिवस उलटलेले होते. परिस्थिती वाईट होत असताना तशात मला ही बाब १९ ऑगस्टला कळली. एका हितचिंतकाने मला गोवर्धन डेअरीचे देवेंद्र भाई शहा यांचा मोबाईल क्रमांक दिला.

माझी आणि शहा साहेबांची कोणतीही पूर्वओळख नसताना मी भीत भीत रात्री १० वाजता देवेंद्रभाईंना फोन केला. त्यांनी अतिशय प्रेमाने वस्तुस्थिती समजावून घेतली. मला माहिती घेऊन तुमच्याशी पुन्हा बोलतो म्हणून फोन बंद केला. रात्री १२ च्या दरम्यान देवेंद्रभाईंचा फोन आला त्यांनी पेशंटची सर्व माहिती काढून ठेवली होती. तसेच उद्या म्हणजे २० ऑगस्टला इंजेक्शन मिळवून देतो असा शब्द दिला. मला हायसे वाटले. एका इंजेक्शनचे पैसे मी व माझा सहकारी प्रा. मुठे देतो असे सांगितले होते.

देवेंद्रभाईंच्या स्वीय साहाय्यक कालेकर ताईंनी फोनवर येऊन पेशंटची कागदपत्रे घेतली. स्थानिक बाजारात मिळत असलेली दोन इंजेक्शन घ्यायची ठरले. तथापि देवेंद्रभाईंनी पुण्यात माणसे पाठवून निम्म्या किमतीत इंजेक्शन्स मिळवायची तयारी केली. दोन माणसे दिवसभर पुण्यात गाडी घेऊन बिगर अन्नपाण्याची फिरत होती, लांबलचक रांगेत उभी होती. रात्री अकराच्या दरम्यान कालेकर ताईंचा फोन आला पराग डेअरीच्या गेटवर लोक इंजेक्शन घेऊन आलेत. मला अगदी भरून आले. तिथे पोहोचलो तर साक्षात देवेंद्रभाई इंजेक्शन्स घेऊन उभे होते. एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचा धनी ओळखदेख नसणाऱ्यासाठी ‘दानवीराची’ भूमिका करत होते. माझ्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्या रात्री ती इंजेक्शन्स भीमाशंकर हॉस्पिटलला पोहोच केली. शहा साहेब म्हणाले ‘गरिबाला या प्रसंगी पैशापेक्षाही धैर्याची गरज असते, त्या मुलीला धीराने संकटाचा सामना करायला सांगा, बाकी अडचणी पाहायला मी आहेच’ त्यांचे शब्द कानात वाजत राहिले. अगदी साधेपणाने भेटून संवाद करणारे दानशूर व्यक्तित्व मी आज जवळून पाहत होतो. गोरगरिबांच्या साठी सदैव हात मोकळा ठेवणाऱ्या देवेंद्र भाई शहा व सर्व परिवारास उदंड आयुरारोग्य चिंतितो. धन्यवाद ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती’

– प्रा. संतोष पवार
मराठी विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर

Read more...
Open chat