छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; महाराजांच्या जन्मस्थळी येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते, महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य आज मला मिळाले असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले.

किल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल कोश्यारी हे आज सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले. गडाच्या पहिल्या दरवाजापासून ते शिवजन्मस्थळापर्यंत ते न थकता चालत गेले. यावेळी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर राज्यपालांसोबत होते.

गडावर जाताना आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन राज्यपालांनी देवीची आरती सुद्धा केली. यावेळी गडावर पायी जाताना एक वेगळी ऊर्जा मिळते असे सांगताना “शिवाजी महाराज यहा पैदल आये थे तो हम भी पैदल आये” असंही ते म्हणाले.

किल्ल्यावर सर्वच राजकारण्यांनी पायीच आलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

“शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी असलेल्या श्रद्धेमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो,” असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यपालांनी गडावरील विविध पुरातन वास्तू व किल्ले संवर्धनाची माहिती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली व शिवकुंज येथे जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेत राज्यपाल नतमस्तक झाले.

याप्रसंगी शिवकुंज इमारतीजवळ राज्यपालांच्या हस्ते पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

या दरम्यान जुन्नर तालुक्याच्या वतीने आमदार अतुल बेनके यांनी शिवछत्रपतींची मूर्ती देऊन राज्यपालांचा आदर सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी मावळा पगडी घालून व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार केला.

Read more...
Open chat