जि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

पश्चिम भागात नवीन युवा चेहरा राजकारणात येणार?

सजग राजकीय – (स्वप्निल ढवळे, मुख्य संपादक)

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पाडळी निरगुडे गटाचे जि.प.सदस्य देवराम लांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. देवराम लांडे हे याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सध्या शिवसेना या सर्व पक्षांकडून विविध निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. मागील वर्षीही शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते पद, जिल्हा नियोजन समिती सदस्य पद आदी विषयांवरून लांडे यांनी व समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.

जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा काही नेम नसतो. येत्या काळात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात मोर्चे बांधणी करत आहे. याआधीही लांडे यांच्या बाबत पक्ष पातळीवर देखील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी विविध नेत्यांशी चर्चा घडल्या आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यातच दिवाळीच्या काळात लांडे यांनी घेतलेल्या नवीन वाहनाची पूजा देखील आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी लांडे यांचा मुलगा अमोल लांडे हा देखील उपस्थित होता. यावरून देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी चांगलीच जवळीक साधून आहेत हे स्पष्ट होत आहे परंतु ते काय निर्णय घेतात हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

आमदार वल्लभ बेनके यांच्या काळातही देवराम लांडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. सध्या लांडे यांचा मुलगा अमोल हा आदिवासी भागातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे. विविध गावातील सरपंच आणि कार्यकर्ते घेऊन ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील अशीही चर्चा आहे. आगामी काळात देवराम लांडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आमदार अतुल बेनके व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read more...

देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके 

देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके

सजग टाईम्स न्यूज, जुन्नर

खोडद | “सध्या पर्यटनाच्या संधी मोठ्या आहेत.जुन्नर तालुक्याला निसर्गसंपदेचं वरदान मिळालेलं आहे.निसर्गसंपदेचा हा वारसा जपत यातूनच स्थानिक नागरिकांच्या उज्वल भविष्याचा विचार करून देशातील पर्यटकांना जुन्नर तालुक्यात येण्याची ओढ लागेल व देशातील पर्यटकांसाठी आदर्श असे ठरेल असे पर्यटनजुन्नर तालुक्यात निर्माण करणार आहोत.पर्यावरण व पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सोबत घेऊन हे काम केले जाईल.”असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.

या संस्थेमार्फत जुन्नर तालुक्यातील १४२ गावांचा जैवविविधता सर्वेक्षणाचा (नोंदवही)  पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात दुरुस्ती करणार आहोत.या कामासाठी जुन्नर तालुक्यातील निसर्गमित्र,पर्यावरणप्रेमी,वनस्पती अभ्यासक, सर्पमित्र, दुर्गसंवर्धक आदींची मदत घेतली जाणार आहे.या नियोजनासाठी आयोजित बैठकीत आमदार जुन्नरचे अतुल बेनके बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब देवाडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे अध्यक्ष डी.के.वळसे,जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज खोत,जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती ढोबळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार विनायक खोत यांनी व्यक्त केले.

यावेळी  आमदार बेनके म्हणाले की, “पर्यटन वाढलं पाहिजे, पण निसर्गाच्या ऱ्हास झाला नाही पाहिजे.पर्यटक मुक्कामी राहण्यासाठी येथे येतील तसेच पर्यटकांचा  कल कशाकडे आहे ही बाब लक्षात घेऊन  जुन्नर पर्यटनाच्या बाबतीत बिझनेस मॉडेल तयार केलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास मान्यता देखील दिली आहे. शिवनेरीवर रोप वे, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प हे प्रकल्प बांधा आणि हस्तांतरित करा या तत्वावर केले जाणार आहेत.केवळ महाराष्ट्रच तर नाही देशातल्या प्रत्येक पर्यटकाला जुन्नरला येण्याची ओढ लागेल अशाप्रकारचा प्रकल्प केला जाणार आहे.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून वडज धरणाच्या शेजारी केली जाणार आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून त्याचे लवकरच सादर केला जाईल.”

     “आदिवासी भागात हेल्थ टूरिझम हा १०० कोटींचा  प्रकल्प असून निसर्गोपचार आणि अन्य बाबींचा यात समावेश असणार आहे.शिवनेरी रोपवेचा सुमारे ७० कोटींचा प्रकल्प आहे.बीओटी तत्वावर हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी शासन खर्च करणार आहे.जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिक वसाहती व कारखानदारी आली नाही. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प हा आपल्यासाठी एकप्रकारे वरदानच ठरला आहे,यामुळे आपल्या तालुक्याचं वातावरण अत्यंत शुद्ध व स्वच्छ राहिले आहे.या तालुक्यातील निसर्गसंपदा देखील अबाधित राहिली आहे.”

अतुल बेनके, (आमदार,जुन्नर तालुका)

“जुन्नर तालुक्यात पर्यावरण व पर्यटनासाठी काम करणारे लोक सर्वसामान्य असून केवळ निसर्गाप्रति असलेल्या तळमळीने पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी काम करत आहेत.जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहिर झाल्यामुळे तालुक्याचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा ,पर्यावरणीय बदल व जैवविविधता , लेखन , कृषि इ.अनेक अंगाने त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे म्हणून या सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत आसणा-या तालुक्यातील  अभ्यासकांना एकाच व्यासपीठावर दर १५ दिवसांतून एकदा एकत्र करुन चर्चा घडत रहावी जेणेकरून तालुक्याचा अधिक तपशिलवार अभ्यास होण्यास मदत होइल या उद्देशाने ‘जुन्नरी कट्टा’  सुरु केला आहे.”असेही श्री.अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

Read more...

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई (दि.२३) | आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्यचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद चे अध्यक्ष आविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, शरद कला प्रतिष्ठान चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,अभिनेते सुशांत शेलारआदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकरांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाटय सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी  शासन सकारात्मक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी तमाशा सम्राज्ञी “विठाबाई नारायणगावकर” यांच्या नावाने कल्याणकारी आर्थिक विकास महामंडळ करावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

Read more...

जुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके

जुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | आज कोरोना संसर्गातून बाहेर पडल्यावर प्रथमच आमदार अतुल बेनके यांनी दैनंदिन कामकाजास सुरवात केली. नारायणगाव याठिकाणी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड आदी अधिकाऱ्यांसमवेत आमदार बेनके यांनी आज आढावा बैठक घेतली. जुन्नर तालुक्यातील कोविड १९ च्या परिस्थिती व उपाययोजनांबाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली.

जुन्नर तालुक्यात कोविड १९ संदर्भात लेण्याद्री व ओझर येथील सेंटर अंतर्गत ७०० बेड्स कार्यरत आहेत. यामध्ये येत्या काही दिवसात आणखी २५० बेड्स वाढविण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली आहे .

तालुक्यात सध्या महाराष्ट्र शासन, खासगी रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय व इतर संस्था यांच्या वतीने जवळपास १३१ ऑक्सिजन बेड्स कार्यान्वित केले आहेत. यासंदर्भात आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याची तपशीलवार माहिती उद्या उपलब्ध होईल.
तसेच चालू असलेल्या कोविड सेंटर्स मधील व्यवस्थापन, जेवण, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर विषयांसंदर्भात ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून यात सातत्यपूर्ण काम कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या पेशंट्सना प्लाझ्मा ची आवश्यकता आहे त्यासाठी एक हेल्पलाईन उपलब्ध केली जाईल. अनेक समाजसेवी संस्था यासाठी खूप चांगलं काम करत आहेत लायन्स क्लब हि संस्थाही प्लाझ्मादानासाठी चांगला कार्यक्रम राबविणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आमदार अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

ज्या व्यक्ती कोविड १९ मधून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढाकार घ्यावा व इतर रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात सहभागी व्हा प्रशासनाला सहकार्य करा. सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कुणीही आजार लपवून ठेवू नका. स्वच्छता राखा व मास्कचा वापर करा असे आवाहन बेनके यांनी यावेळी केले.

Read more...

वडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन 

वडगाव कांदळीत ‘ग्रामभवन’ चे आ.अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन 

७६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन

वडगाव कांदळी | येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी सर्व सुखसोयींनी सुसज्ज अशा ७६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘ग्रामभवन ‘ या इमारतीचे उद्घाटन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषदेचे गटनेते शरदराव लेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली खंडागळे, पंचायत समिती सदस्य शाम माळी, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, रघुनाथ लेंडे, अशोक सोनवणे, अशोक बढे, सरपंच माधुरीताई निलख, उपसरपंच संजय खेडकर, ग्रामपंचायत सदस्या उल्का पाचपुते, धोंडीभाऊ मुटके, सीमा पाचपुते, समीर भोर, मनिषा पवार, विनायक लांडगे, शोभा पाचपुते, नाथा नरवडे, शाईन तांबोळी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी एम. बी.वाघे, सचिन निलख , प्रा.श्रीकांत पाचपुते, माजी सरपंच माऊली निलख, रामदासशेठ पवार यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून हा सोहळा पार पडला.

‘ग्रामभवन’ या इमारतीसाठी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे गटनेते शरदराव लेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांच्या सहकार्यातून या इमारतीसाठी जिल्हा नियोजन आयोग, १४ वा वित्त आयोग, लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायत निधी यामधून ७६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले की, वडगाव कांदळी च्या विकासाकरता कोणताही निधी कमी पडू देणार नाही.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत पाचपुते यांनी केले.

Read more...

ग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी यांचे आंदोलन स्थगित, आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

ग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी यांचे आंदोलन स्थगित, आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

सजग वेब टीम, जुन्नर

राजुरी | अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने ऊर्जा विभागाच्या तसेच वनविभागाच्या संबंधित मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले होते. ग्राहक पंचायत चे प्रांत संघटक व महामंत्री बाळासाहेब औटी यांनी नेतृत्व केलेल्या या बेमुदत उपोषण आंदोलनाला आमदार अतुल बेनके यांनी राजुरी गावातील मुक्ताबाई माळावर जाऊन भेट दिली.

यावेळी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीज जोड देणे बाबत, वीज ग्राहकांना वीज बीलात सवलत मिळाली पाहिजे, वीजबील माफी संदर्भात कृषी संजीवनी योजना राबवावी, शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा मिळावा,
बिबट्या प्रवण क्षेत्रातील पथदिवे उभारणी विनाअट तात्काळ सुरू करावी. आणे सबस्टेशन कार्यान्वित करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे
यांसह अन्य विविध मागण्यांवर आमदार बेनके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या.

तसेच धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवाद साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक करण्याचे निश्चित केले आहे. या स्वरूपाचे पत्र बाळासाहेब औटी यांना यावेळी सुपुर्त करण्यात आले व त्याचे वाचन जि.प.सदस्य पांडुरंग पवार यांनी केले.

याप्रसंगी जि.प.सदस्य पांडुरंगजी पवार, पं. स. सदस्या अनघाताई घोडके, तहसिलदार हनुमंतजी कोळेकर, राजुरीचे सरपंच एम.डी.घंगाळे, वन विभागाचे प्रमुख अधिकारी, महावितरण विभागाचे नारखडे, आळेफाटा पोलिस स्टेशनचे पी. आय मुजावर, अशोकनाना घोडके, जयसिंग औटी, विजय कुऱ्हाडे, राजुरी गावचे ग्रामस्थ, , आंदोलनात सहभाग असणारे सर्व ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा

जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा

सजग वेब टीम, पुणे

पुणे (दि.१७) | सिंचन भवन पुणे येथे सोमवार (दि.१७) जुन्नर तालुक्यातील सिंचनाच्या प्रकल्पांसंबंधी आणि विविध प्रश्नांसंबंधी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अशोक घोडके हे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प, बुडीत बंधारे, के टी बंधारे, वितरीका साफसफाई व दुरूस्ती, कालवा पोटचाऱ्या पूर्ण करणे, प्रकल्पबाधितांचे प्रश्न या संबंधित अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यामध्ये खालील विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

– पिंपळगाव जोगा कालव्याची दुरूस्ती त्याचबरोबर शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पुल बांधणे, कालव्याच्या वितरीका व लघु वितरीका, नवीन आऊट लेट काढणे

– बेल्हे येथील प्रस्तावित एस्केप काम CR गेट चे काम त्वरीत सुरु करण्याबाबत कार्यकारी संचालक विलास राजपुत यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.

– नवीन पाणी परवान्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्व भागातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

– चिल्हेवाडी पाईप लाईनच्या आराखडा व लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सुचविण्यात आलेले सकारात्मक बदल मान्य केलेले आहेत. याबाबत काही तांत्रिकदृष्ट्या अडचणींवर मार्ग काढण्याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.

– पिंपळगाव जोगा कालवा व चिल्हेवाडी पाईप लाईन यांचे प्रलंबित भूसंपादनचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतचा कृती आराखडा बैठकीत तयार करण्यात आला.

– कुकडी डावा कालव्याच्या गळती थांबविणे, दुरुस्ती करणे, झाडे झुडपे काढणे, दळणवळणाला सोईकरता काही ठिकाणी पुल बांधणे CR गेट स्थापन करणे या सर्व बाबींना मान्यता देण्यात आल्या.

– लोकसहभागातून मनरेगा योजनेची जोड घेऊन संपूर्ण कालव्याच्या दुतर्फा सुशोभिकरण करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे ठरले.

– माणिकडोह धरणातील ८ पैकी ३ बुडीत बंधाऱ्यांच्याबाबत प्राधान्याने तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये चावंड, जळवंडी व अंजनावळे या बंधाऱ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने घेण्यात येणार आहेत.

– रामजेवाडीच्या आऊट लेट च्या कामासाठी व निरगुडे, बेलसर कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार अतुल बेनके यांनी रु ६० लक्ष रु. निधी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

– ओतूर येथील वाघदरा लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्ती चा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे

आजच्या बैठकीमुळे तालुक्यातील सिंचनाच्या कामांना गती मिळणार असून,
जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू असे आमदार अतुल बेनके यांनी या बैठकीबाबत बोलताना सांगितले आहे.

या बैठकीला कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, संभाजी माने , कुकडी कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, सुचिता डुंबरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्रदीप पिंगट, सुरेश तिकोणे आदी मान्यवरही या बैठकिला उपस्थित होते.

Read more...

बाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा

बाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी हे वाढीव वीजबिले, कृषीपंप बिले आणि ऊर्जा विभागासंदर्भातील विविध मागण्यांसाठी राजुरी याठिकाणी आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला शेतकरी वर्गाचा आणि सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान शासनाने दोन दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशाराही उपोषणकर्ते औटी यांनी दिला आहे.

आमदार अतुल बेनके यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही मंत्र्यांनी चर्चेदरम्यान उपोषणातील मागण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. उद्या आमदार बेनके हे उपोषणस्थळी राजुरी याठिकाणी जाऊन औटी यांच्याशी उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

Read more...

छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; शिवनेरीवर येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व; महाराजांच्या जन्मस्थळी येण्याचे भाग्य लाभले – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते, महाराजांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य आज मला मिळाले असं प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी येथे केले.

किल्ले शिवनेरीवर जाऊन नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल कोश्यारी हे आज सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ले शिवनेरीवर पोहचले. गडाच्या पहिल्या दरवाजापासून ते शिवजन्मस्थळापर्यंत ते न थकता चालत गेले. यावेळी जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर राज्यपालांसोबत होते.

गडावर जाताना आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन राज्यपालांनी देवीची आरती सुद्धा केली. यावेळी गडावर पायी जाताना एक वेगळी ऊर्जा मिळते असे सांगताना “शिवाजी महाराज यहा पैदल आये थे तो हम भी पैदल आये” असंही ते म्हणाले.

किल्ल्यावर सर्वच राजकारण्यांनी पायीच आलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

“शिवनेरीवर येण्याअगोदर अनेक जण मला पाऊस आहे असं सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी असलेल्या श्रद्धेमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो,” असेही राज्यपाल कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यपालांनी गडावरील विविध पुरातन वास्तू व किल्ले संवर्धनाची माहिती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली व शिवकुंज येथे जिजाऊ आणि बाल शिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेत राज्यपाल नतमस्तक झाले.

याप्रसंगी शिवकुंज इमारतीजवळ राज्यपालांच्या हस्ते पिंपळवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

या दरम्यान जुन्नर तालुक्याच्या वतीने आमदार अतुल बेनके यांनी शिवछत्रपतींची मूर्ती देऊन राज्यपालांचा आदर सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी मावळा पगडी घालून व शाल देऊन राज्यपालांचा सत्कार केला.

Read more...

वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा.अमोल कोल्हे

वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद इमारत तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | वारूळवाडी येथील नूतन ग्रामसंसद ही ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन वास्तू गावच्या तसेच तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी व नावलौकीक वाढविणारी आहे.असे गौरवोदगार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले . वारूळवाडी येथे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामसंसद वारूळवाडी या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

यावेळी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे,सभापती ऍड संजय काळे,जि. प.सदस्या आशा बुचके,पांडुरंग पवार,सरपंच जयश्री बनकर,उपसरपंच सचिन वारुळे,रमेश भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ,उद्योजक संजय वारुळे,बाजार समिती संचालक विपुल फुलसुंदर ग्रामसेवक विद्याधर मुळूक जालिंदर कोल्हे,जंगल कोल्हे,राजेंद्र मेहेर,रवी साळुंके,अविनाश घोलप व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमास माजी आमदार शरद सोनवणे,विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनीही भेट दिली .

उत्तर पुणे जिल्हात सर्वात मोठी आणि अद्यावत सुविधा असलेली १५ हजार ८०० स्क्वे. फुटाची ही ग्रामपंचायत इमारत असून या ग्रामपंचायतीमध्ये स्वागतकक्ष,सरपंच,ग्रामसेवक,अतिथी कक्ष,अभिलेख कक्ष,वाचनालय अशा सुविधा आहेत,तालुक्यातील सर्वात मोठी असलेली वारूळवाडी ग्रामपंचायत ओळखली जाणार आहे अशी माहिती संजय वारुळे आणि उपसरपंच सचिन वारुळे यांनी दिली .

याप्रसंगी उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल स्थापत्य अभियंता रवी साळुंखे व अविनाश घोलप यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ वर्षा गुंजाळ व आरोग्य सेवक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेहेर यांनी केले तर जंगल कोल्हे यांनी आभार मानले.

दरम्यान जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचा पुणे याठिकाणी कोरोना उपचारा दरम्यान निधन झाल्याने हा उद्घाटन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करीत अवघ्या २० मिनिटांत हा कार्यक्रम साजरा करून सर्व प्रमुख उपस्थितांच्या वतीने दशरथ पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Read more...
Open chat