मंचर उपजिल्हा रुग्णालयाला दिले ०५ पल्स ऑक्सिमिटर व ०५ इन्फ्रारेड थर्मामिटर भेट

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला दिले ०५ पल्स ऑक्सिमिटर व ०५ इन्फ्रारेड थर्मामिटर भेट

सजग वेब टीम, आंबेगाव

मंचर ता.१०| आंबेगाव तालुक्यातील सजग नागरिक व व्यापारी बांधवांच्या वतीने मंचर उपजिल्हा रुग्णालयाला ०५ पल्स ऑक्सिमिटर व ०५ इन्फ्रारेड थर्मामिटर भेट देण्यात आले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांदारणी पाटील, शल्य चिकित्सक डॉ. नितीन देवमाणे, डॉ.आरती भारती, डॉ.मंगेश निरहाळी, डॉ.विकास वाघ, डॉ. सुजाता वर्पे यांनी या वस्तूंचा स्वीकार केला. तालुक्यातील सजग नागरिक व व्यापारी बांधवांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात उद्योजक अजय घुले व पत्रकार सचिन तोडकर यावेळी उपस्थित होते.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेल्या प्लस ऑक्सिमिटर व इन्फ्रारेड थर्मामिटर चा उपयोग या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्रातील कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील सजग नागरिक व व्यापारी बांधवांच्या माध्यमातून मंचर उपजिल्हा रुग्णालय मदत अभियानाद्वारे लोकवर्गणी गोळा करण्यात येत आहे. या लोकवर्गणीतून प्राथमिक टप्प्यात मंचर उपजिल्हा रुग्णालयाला ०५ प्लस ऑक्सिमिटर व ०५ थर्मामिटर भेट देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे चार लाख रुपयांचे मल्टिप्यारा हॉस्पिटल ऑक्सिजन मॉनिटर भेट देण्यात येणार आहेत. अशी माहिती या मदत अभियानाचे समन्वयक सचिन तोडकर यांनी दिली.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १०० बेड चे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहे. या उपचार केंद्राला सर्वच वस्तू शासकीय फंडातून मिळणे अशक्य आहे. त्यामुळे ज्या वस्तू उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक आहेत मात्र त्या शासन स्तरावर लवकर उपलब्ध होणार नाहीत आशा वस्तू लोकवर्गणीतून उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही लोकवर्गणी गोळा करत असून तालुक्यातील सजग नागरिक व व्यापारी बांधवांनी या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन यावेळी उद्योजक अजय घुले यांनी केले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला ०५ प्लस ऑक्सिमिटर व ०५ इन्फ्रारेड थर्मामिटर उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.चंदाराणी पाटील यांनी तालुक्यातील देणगीदार सजग नागरिक व व्यापारी बांधवांचे आभार मानले.

Read more...

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – अजित पवार

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – अजित पवार

मुंबई, (दि.२५)| देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’ला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात ७५ ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Read more...

… अन्यथा मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर ; डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक

. . .अन्यथा मुंबईत मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर

डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक

छावा क्रांतिवीर सेना प्रणिक पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ व मार्गदर्शन मेळावा संपन्न

कळंब | छावा क्रांतिवीर संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित पुणे जिल्हा साउंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनचा तालुका कमिटी पदग्रहण समारंभ व मान्यवर मार्गदर्शन मेळावा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, केंद्रिय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, संपर्कप्रमुख क्रांतीनाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर, पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष अनिल पाटील, खजिनदार सागर सुतार, साई उंद्रे, सचिव अमोल आमले, सल्लागार अॅड.सुनिल अोव्हाळ, यांसह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर म्हणाले की, साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मुंबईत मातोश्रीच्या दारात आंदोलन करु असे सांगत मागण्या मान्य करणे शक्य नसेल तर सरकारने साऊंड मालकांचे साहित्य विकत घेऊन कर्ज माफ करावे असा इशारा सरकारला दिला.

तांत्रिक गोष्टींचा विचार करून सरकारने योग्य ते नियमांना अनुसरून सरकारने परवानगी द्यावी असे मनोगत राजु देवकर यांनी व्यक्त केले.

यावेळी साऊड सिस्टिम व लाईट असोसिएशनकडुन तहसिलदार जुन्नर, उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर, विविध पोलिस स्टेशन यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात अाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर यांनी दिली.

कोविड लाॅकडाऊन तसेच डिजेबंदीमुळे साऊंड सिस्टिम व लाईट मालकांवर व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली अाहे. त्यामुळे शासनाने साऊंड व लाईट मालकांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, कर्ज माफ करावे, डिजे वाजवण्यास नियमात परवानगी द्यावी यांसह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या असुन शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन पुकारुन रस्त्यावर उतरु असा इशाराही छावा क्रांतिवीर सेना व साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशन कडुन देण्यात आला आहे.

यानिमित्तानं पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनचे संघटक गुड्डु भांबुरे, पिंटु इलेक्ट्राॅनिकचे राजु देवकर, जिल्हा संचालक योगेश पाटील, निकेश मोरे, अमोल आमले, जुन्नर तालुकाध्यक्ष रोहित भुमकर, आंबेगाव तालुकाध्यक्ष अमोल मोरडे, खेड तालुकाध्यक्ष गणेश पाटोळे, यांसह छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी, सदस्य व पुणे जिल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका साउंड सिस्टिम असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार अॅड.सुनिल अोव्हाळ, सुत्रसंचालन गणेश मोढवे तर आभार जिल्हा संघटक गुड्डु भांबुरे यांनी मानले.

Read more...

देवेंद्रभाईंच्या मदतीचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव !

‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ देवेंद्र भाई शहा यांच्या मदतीचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव !

माझ्या परिचयातील एक कुटुंब कोरोनाग्रस्त झाले. वडील मुंबईतून छोट्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर नाईलाजाने पहारेकरी म्हणून नोकरी करत आहेत. मुलगी उच्चशिक्षित परंतु घटस्फोटीत तिने आवटे कॉलेजात काही दिवस काम केलेले होते म्हणून ओळख झालेली, आई घरकाम करणारी. अशा कुटुंबाला रोजीरोटीसाठी नाईलाजाने बाहेर पडावे लागत असल्याने कोरोनाने गाठले.

” गरिबाला या प्रसंगी पैशापेक्षाही धैर्याची गरज असते, त्या मुलीला धीराने संकटाचा सामना करायला सांगा, बाकी अडचणी पाहायला मी आहेच “

– देवेंद्र शहा

त्यातील मुलीची हालत अत्यंत वाईट झाली. तिला रेम्डेसेव्हीर इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय दिसेना. बाहेर जगात ही इंजेक्शन काळ्या बाजारात अत्यंत पाच सात पटीने पस्तीस चाळीस हजाराला मिळत असल्याचे ऐकले होते. त्यामुळे अत्यंत भीती वाटली. या मुलीला सहा इंजेक्शन घ्यायला सांगून दोन दिवस उलटलेले होते. परिस्थिती वाईट होत असताना तशात मला ही बाब १९ ऑगस्टला कळली. एका हितचिंतकाने मला गोवर्धन डेअरीचे देवेंद्र भाई शहा यांचा मोबाईल क्रमांक दिला.

माझी आणि शहा साहेबांची कोणतीही पूर्वओळख नसताना मी भीत भीत रात्री १० वाजता देवेंद्रभाईंना फोन केला. त्यांनी अतिशय प्रेमाने वस्तुस्थिती समजावून घेतली. मला माहिती घेऊन तुमच्याशी पुन्हा बोलतो म्हणून फोन बंद केला. रात्री १२ च्या दरम्यान देवेंद्रभाईंचा फोन आला त्यांनी पेशंटची सर्व माहिती काढून ठेवली होती. तसेच उद्या म्हणजे २० ऑगस्टला इंजेक्शन मिळवून देतो असा शब्द दिला. मला हायसे वाटले. एका इंजेक्शनचे पैसे मी व माझा सहकारी प्रा. मुठे देतो असे सांगितले होते.

देवेंद्रभाईंच्या स्वीय साहाय्यक कालेकर ताईंनी फोनवर येऊन पेशंटची कागदपत्रे घेतली. स्थानिक बाजारात मिळत असलेली दोन इंजेक्शन घ्यायची ठरले. तथापि देवेंद्रभाईंनी पुण्यात माणसे पाठवून निम्म्या किमतीत इंजेक्शन्स मिळवायची तयारी केली. दोन माणसे दिवसभर पुण्यात गाडी घेऊन बिगर अन्नपाण्याची फिरत होती, लांबलचक रांगेत उभी होती. रात्री अकराच्या दरम्यान कालेकर ताईंचा फोन आला पराग डेअरीच्या गेटवर लोक इंजेक्शन घेऊन आलेत. मला अगदी भरून आले. तिथे पोहोचलो तर साक्षात देवेंद्रभाई इंजेक्शन्स घेऊन उभे होते. एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचा धनी ओळखदेख नसणाऱ्यासाठी ‘दानवीराची’ भूमिका करत होते. माझ्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्या रात्री ती इंजेक्शन्स भीमाशंकर हॉस्पिटलला पोहोच केली. शहा साहेब म्हणाले ‘गरिबाला या प्रसंगी पैशापेक्षाही धैर्याची गरज असते, त्या मुलीला धीराने संकटाचा सामना करायला सांगा, बाकी अडचणी पाहायला मी आहेच’ त्यांचे शब्द कानात वाजत राहिले. अगदी साधेपणाने भेटून संवाद करणारे दानशूर व्यक्तित्व मी आज जवळून पाहत होतो. गोरगरिबांच्या साठी सदैव हात मोकळा ठेवणाऱ्या देवेंद्र भाई शहा व सर्व परिवारास उदंड आयुरारोग्य चिंतितो. धन्यवाद ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती’

– प्रा. संतोष पवार
मराठी विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर

Read more...

बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

सजग वेब टीम , मुंबई

मुंबई | बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. शिरूर लोकसभेची निवडणूक बैलगाडा शर्यत व वाहतूक कोंडी या प्रश्नांवरून गाजली होती. खा.अमोल कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती.

आज झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैलगाडा शर्यतबंदी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले आहे तसेच त्यासाठी खासदार व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे विचारात घ्या. महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी सुनावणी लवकर व्हावी यासाठी चर्चा करू. तसेच या संदर्भात नियमित बैठका घेऊन सुनावणी बाबतच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल असेही केदार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाची वेगवेगळ्या राज्यांबाबत घेत असलेली भूमिका अन्यायकारक 

राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या बाजूने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यामध्ये शर्यतबंदीमुळे खिल्लारी बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भूमिका मांडावी. त्याचबरोबर आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट होत आहे, ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे याबाबी ठामपणे मांडल्या पाहिजेत असे सांगितले. त्याचबरोबर एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबाबत सर्वोच्च न्यायालय घेत असलेली भूमिका अन्यायकारक आहे हेही ठासून मांडले पाहिजे असे मत डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

Read more...

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम

सजग वेब टीम, जुन्नर

पुणे दि.२६ | कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच मास्क घालून व सुरक्षित अंतराचे पालन करुन व प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेच्या सूचनांचे पालन करुनच बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
जुन्नर नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अतुक बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रमा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसिलदार हनुमंत कोळेकर, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री, नगर अभियंता विवेक देशमुख आदीसह लोकप्रतिनिधी, नागरिक, शांतता समितीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासोबतच काळजी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणाचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोविड सेंटरमध्ये जैव-वैद्यकीय कचरा, भोजन व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा तसेच उपचाराबाबत दक्षता घ्या. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
प्रतिबंधित क्षेत्रातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती तसेच बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. अशा तपासणीतून कोरोना संसर्गाचे लवकर निदान होवून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. तसेच कोरोना बाधित रुग्णाला घरी सोडल्यानंतर त्यांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरीत आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी दिले. तसेच येणाऱ्या कालावधीतील सण-उत्सव साजरे करताना कोरोना संसर्गाबाबत शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्गाबाबत नागरिकांनी दक्षता घेतली आहे. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची तालुक्याची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून यापुढील काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करताना सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी याबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. नागरिकांनी यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आभार नगराध्यक्ष शाम पांडे यांनी मानले.

Read more...
Open chat