महाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर – डॉ.सच्चिदानंद शेवडे (साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला)
बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)
राजगुरूनगर | तत्त्वज्ञ, इतिहासकार, कवी, क्रांतिकारक, देशभक्त, साहित्यिक, पत्रकार अशी एकाच मानवी शरीरात असलेली प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाची विविध रूपे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेली असून ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत सावरकर एक झंझावात या विषयावर बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक शांताराम घुमटकर, अॅड. मुकुंदराव आवटे, बाळासाहेब सांडभोर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा.जी.जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, राष्ट्र हेच सावरकरांचे जीवनमूल्य होते. त्यामुळे त्यांचे साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या जीवनातील निवडक प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती दिली.
सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीबद्दल बोलताना त्यांनी मराठी भाषेला सावरकरांनी नव्या शब्दांची देणगी दिली असून रत्नागिरीच्या स्थानबध्दतेच्या काळात अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली. त्यांच्यामुळेच महापौर, प्रशाला, प्राचार्य, दिग्दर्शन, संकलन, निर्माता असे अनेक शब्द मराठीत रूढ झाल्याचे ते म्हणाले.
स्वतंत्र भारतात आपण क्रांतिकारकांची उपेक्षा केल्याचे सांगून महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना जाणीवपूर्वक गुंतवण्यात आल्याचे ते म्हणाले.
तारूण्य हे वयावर किंवा केसाच्या रंगावर न ठरता ते त्या त्या व्यक्तीच्या उर्जेवर ठरायला हवे असे सांगून आपण मुलांना पराक्रमाचा इतिहास शिकवत नसल्याने मुलांमध्ये राष्ट्राबद्दलची उर्मी कमी झाली आहे. त्यामुळेच लष्करात अधिकाऱ्यांच्या हजारो जागा रिक्त असल्याचे ते म्हणाले. आपण जातीपातीच्या पलिकडे जाऊन मी भारतीय आहे अशी आपली पहिली ओळख निर्माण करायला हवी.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सावरकरांचे इंग्लडमधील निवासस्थान असलेले इंडिया हाऊस ताब्यात गेऊन तेथे त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय बोऱ्हाडे यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. कैलास सोनावणे यांनी तर आभार कु. अक्षय कोळेकर याने मानले.