चांगुलपणाची लोकचळवळ उभी करण्याची गरज – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 

बाबाजी पवळे, राजगुरुनगर (सजग वेब टीम)

राजगुरुनगर – गरिबी, विषमता, भ्रष्ट्राचार, कुपोषण हे समाजाचे शत्रू असून त्याला आळा घालण्यासाठी स्वच्छता, शिस्त, परिश्रम यातून समाज व देशाची प्रगती करा. याच मूल्यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न करून युवकांनी आपली उर्जा विधायक कामांकडे वळवण्यासाठी चांगुलपणाची लोकचळवळ स्वत:पासून सुरु करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्रालयातील निवृत्त सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत प्रत्येक दिवस, नवा दिवस, नवी क्षितिजे या विषयावर बोलत होते. या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील,  संचालक  बाळासाहेब सांडभोर, अॅड. प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष  अॅड.  राजमाला  बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे स्वागत व सत्कार संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील  यांनी केले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलताना पुढे म्हणाले की आज शिक्षण गावोगावी पोचले असले तरी समाज परिवर्तांची चळवळ थांबली आहे. त्यासाठी   समाजाच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीत अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे पहिल्यांदा मनाची स्वच्छता करायला हवी. शिक्षणाला नाविन्याची जोड देऊन तंत्रज्ञानाचा वापर समाजजीवन संपन्न करण्यासाठी करायला हवा. समाजाच्या सर्व थरातील लोकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे. यासाठी प्रत्येकाच्या मनातील प्रेमाचे दिवे पेटवून चांगुलपणाची लोकचळवळ सुरु करणे गरजेचे आहे.

चांगल्या माणसांनी राजकारणापासून दूर राहणे हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण असून समाजसेवेची आस मनात असणारे कार्यकर्ते राजकारणात असावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी सामान्य लोक आणि राज्यकर्ते यांच्यातील विश्वास निर्देशांक किती त्यावर त्या देशाची प्रगती अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
पासपोर्टसारखी जटील वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोचविताना मागील एका वर्षात तीनशेच्या आसपास पासपोर्ट सेवा केंद्र देशात सुरु केली असून प्रत्येक लोकसभा मतदार संघात पासपोर्ट कार्यालय सुरु करायचे असून आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातही पासपोर्ट शिबीर आयोजित केले जाईल असे ते म्हणाले.
प्रशासनाची कार्यसंस्कृती ही जनतेशी संवादी असायला हवी. प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान ठेवावा. ज्या क्षेत्रात आपण आहोत तेथे चांगले करण्याचा प्रयत्न करावा. हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका अशी अपेक्षा व आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
साहेबराव बुट्टेपाटील यांच्या कार्याचा गौरव करून मी जरी काल परराष्ट्र सेवेतून निवृत्त असलो तरी त्यांच्या कर्मभूमीत मी सेवाप्रवृत्त होण्याचा संकल्प करीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वधर्म समभावाची, वसुंधरेच्या जतनाची आणि मानवी मूल्यांच्या जोपासानेची शपथ दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश जगताप यांनी व वक्त्यांचा परिचय डॉ. बी.डी.अनुसे यांनी तर आभार ऋग्वेद काळे याने मानले.

 

Read more...
Open chat