शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत

 

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विलास लांडे यांना उमेदवारीचे संकेत,
– शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता

पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एकीकडे आढळराव पाटील यांच्याविरुद्ध दंड थोपटून तयार असलेले मंगलदास बांदल यांनी उमेदवारी जाहीर केलेली असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत अलीकडच्या राजकीय घडामोडींवरून आणि मतदारसंघात त्यांच्या वाढत्या संपर्कावरून मिळत आहेत. राजकीय वर्तुळातही या चर्चेला पुष्टी मिळत आहे. ‘पक्षाने तिकीट दिले तर लढणार’ अशी प्रतिक्रिया लांडे यांनी याबाबत बोलताना प्रसारमाध्यमांना दिली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमांना लांडे हजेरी लावत आहेत. तसेच त्यांचे समर्थक त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करून सोशल मीडियावर पोस्ट टाकत आहेत. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. एका पक्षाचे असले तरी त्यांच्यात सख्य नव्हते. मात्र लांडे यांनी पुढाकार घेऊन त्यांची भेट घेतल्याने दिलजमाईसाठी त्यांचे प्रयत्न चालल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशीही त्यांनी जमवून घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर त्या दोघांमध्ये विधानसभा व लोकसभा अशी वाटणी झाल्याचे बोलले जात होते.

त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्याने लोकसभेसाठी त्यांना हिरवा कंदील मिळाल्याची शक्यता वर्तविली जात आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी इन्कार केला. उमेदवारीसाठी मी गुडघ्याला बाशिंग बांधलेले नाही, पक्षश्रेष्ठींशी चर्चाही नाही, पण पक्षाने तिकीट दिले तर लढणार, असे सांगितले. मतदारसंघात पक्षाचे आणि माझे काम चांगले आहे, एका निवडणुकीचा अनुभवही आता गाठीला असल्याने अडचण येणार नाही, असे ते म्हणाले.

दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की लांडे आणि आम्ही भेटलो. आम्ही एकाच पक्षाचे आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद होते, पण आमच्यात काही मारामारी झालेली नव्हती. त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत मात्र माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही. पण आढळरावांना या मतदारसंघात नकारात्मक वातावरण आहे, त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारास मिळेल, असा दावा मोहिते यांनी केला आहे.

Read more...
Open chat