दुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले – खा.अशोक चव्हाण

दुष्काळ निवारण करण्यात सरकारचे नियोजन पूर्णपणे ढेपाळले! – खा.अशोक चव्हाण

मुंबई | राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची अनुपलब्धी राज्यभर जनतेच्या जीवावर उठली आहे. याचाच परिणाम दुष्काळी भागातून स्थलांतर वाढण्यात झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आक्रोषाला सामोरे जावे लागले, यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. पण सरकारी पातळीवर मात्र दुष्काळाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही असे चित्र आहे.

दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का? केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली?असा संतप्त सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे, राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, पाण्याची समस्या जशी उग्र बनली आहे, तशीच रोजगाराची समस्याही आहे. सरकारचे नियोजन नसल्यामुळेच सामान्य जनतेला त्याची मोठी झळ बसत आहे. हे पाहता दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

Read more...

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी

 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (१५/०१/२०१९)

1. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ करण्याचा निर्णय.

2. इतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मागणीनुसार एकूण 36 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता.

3. इतर मागासप्रवर्गातील मुलींसाठी सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास मान्यता.

4. राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार देण्यासाठी योजना.

5. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष 10 लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार.

6. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार.

7. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 25 हजार रुपयांपर्यंतच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा एक लाख रुपये करण्याचा निर्णय.

8. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास पुढील तीन वर्षामध्ये 250 कोटी रुपयांचे सहायक अनुदान उपलब्ध करण्यात येणार.

9. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळास पुढील तीन वर्षामध्ये 300 कोटी रुपयांचे सहायक अनुदान उपलब्ध करण्यात येणार.

10. केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ‌जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबविणार.

11. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) नंदुरबार व वाशिम या दोन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मॉडेल डिग्री कॉलेज स्थापण्यास मंजुरी.

12. म्हाडा आणि सिडकोच्या जमिनीवरील रहिवाशांना तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा विकास व वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दराने अकृषिक दराची आकारणी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यास मान्यता.

13. शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत किशोरवयीन मुलींकरिता सुधारित योजना (SAG-Scheme for Adolescent Girls) राबविण्यात येणार. योजनेच्या लाभात बदल करून प्रतिदिन पाच ऐवजी साडेनऊ रूपये इतक्या वाढीस मंजुरी.

Read more...
Open chat