खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचा गैरवापर – खा. आढळराव पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई देवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविक भक्तांसाठी खासदार निधितून मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या सांस्कुतिक सभामंडपाचे मंगल कार्यालय करून त्याद्वारे व्यवसाय सुरू केल्याचा गंभीर प्रकार देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांनी केला आहे. या प्रकरणाची खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.
कनेरसर येथील यमाई देवीच्या उत्सव काळात राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून सात ते आठ वर्षापुर्वी या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले होते.परंतु गेल्या काही महिन्यांपासून येमाई देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांनी “खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून” असा उल्लेख असलेला नाम फलक कुठल्याही परवानगशिवाय काढून टाकला असून त्या जागी “श्री कुलस्वामिनी गार्डन मंगल कार्यालय” असा फलक लावून सांस्कृतिक व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. या बाबत खासदार आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.
शासकीय निधीतून बांधलेल्या सभागृहाचा वापर व्यवसायासाठी करणे हा नियमभंग आहे. त्यामुळे नियमभंग केलेल्या विश्वस्त मोहन दौंडकर यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मंगल कार्यालयाचा नामफलक हटवून तिथे खासदार स्थानिक विकास निधीचा असा नामफलक पुन्हा लावण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसापासून यमाई देवस्थानच्या गैरव्यवहार प्रकरणी वाद विवाद चालू असतानाच देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांच्याविरुद्ध आढळराव पाटील यांनी केलेल्या तक्रार यासंदर्भात आता जिल्हाधिकारी संबंधितावर कुठली कारवाई करणार हीच चर्चा खेड तालुक्यात आहे.