मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय

सजग वेब टिम, जुन्नर

मुंबई दि २१ |  कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील

बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे

राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read more...

लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का – शरद पवार

लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का – शरद पवार

शरद पवारांनी पंतप्रधानांशी राज्यातील अनेक प्रश्नांबाबत केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार शरद पवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद.

सजग वेब टिम, जुन्नर

मुंबई दि. ८ एप्रिल | देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे बर्‍याच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे यासह अन्य विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.

यावेळी प्रामुख्याने खालील गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

कोरोनानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्रशासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्रसरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा अशी मागणीही शरद पवार यांनी केली.

ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्रसरकारने घ्यावी अशी विनंतीही शरद पवार यांनी केली.

कोरोनाचे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही असेही शरद पवार म्हणाले.

समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन शरद पवार यांनी केले.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांगला संवाद आयोजित केला. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले शिवाय ही जागतिक समस्या असल्याने सर्व राजकीय पक्ष आपले उचित सहकार्य देतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

Read more...

नाम फाऊंडेशन कडून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीस प्रत्येकी ५० लाखांची मदत

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान सहायता निधीसाठीही फाऊंडेशन तर्फे ५० लाख रुपयांची मदत दिली आहे. या विषयी ची मााहिती अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विटर द्वारे कळवली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे. https://t.co/ZlWliTc4rO

Read more...

पुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे

पुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे| राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय कार्यालयात वेळेत पोहोचता यावे यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल यांच्याकडे केली.

महाराष्ट्र शासनाने नुकताच कार्यालयीन कामकाजासाठी ५ दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेमध्ये सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. असा बदल करण्यात आला. या बदलामुळे पुण्याहून मुंबईला दैनंदिन प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे दैनंदिन वेळापत्रक गैरसोयीचे ठरले. परिणामी शासकीय कर्मचारी व अधिकारी आपल्या कार्यालयात वेळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांना ‘लेटमार्क’ला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुण्याहून सुटणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करणारे निवेदन पुणे व पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले होते.

खासदार डॉ. कोल्हे यांनी याची तत्काळ दखल घेऊन संसद अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे मंत्री श्री. पियुष गोयल यांची भेट घेऊन रेल्वे वेळापत्रक बदलण्याची मागणी करणारे पत्र दिले. यावेळी रेल्वे मंत्री श्री. गोयल यांनी मुंबई उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक पाहून या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Read more...

राज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक! घणाघाती भाषण.

राज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक! घणाघाती भाषण.

राज ठाकरेंच्या भाषणातील २९ महत्वाचे मुद्दे

सजग वेब टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी रोखठोक मतं मांडली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील २९ महत्त्वाचे मुद्दे :

१) मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे लोकसभेच्या २ जागा मागितल्या, २ जागा मागितल्या. लोकसभेचं काय हे मी नंतर तुम्हाला सांगेन – राज ठाकरे

२) लोकांची स्मरणशक्ती कमी असते, अगदी वर्तमानपत्रातील लोकांना देखील आठवड्यापूर्वी काय घडलं हे आठवत नसतं. लोकांनी विसरून जावं हीच भाजप सरकारची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय काय करून ठेवलंय,ह्याची आठवण करून द्यायची आहे – राज ठाकरे

३) मी कोल्हापूरला जे बोललो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या फुटत होत्या. नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली लावारीस मुलं वाट्टेल ते पसरवत होती. – राज ठाकरे

४) अनेक रिकामटेकडे युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान मध्ये घुसलं पाहिजे अशा गप्पा सुरु होत्या, आणि हे बोलणारे कोण तर दिवाळीत फटाके फुटले तर घाबरणारी ही लोकं आणि निघाले युद्धाच्या गप्पा करायला – राज ठाकरे

५) अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवन ह्या मासिकावर १००० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ह्यांची मुलं. अजित डोवालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला?हा देशद्रोही नाही? – राज ठाकरे

६) नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले? – राज ठाकरे

७) २७ डिसेंबर ला अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत? – राज ठाकरे

८) पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान मारले गेले, आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे? – राज ठाकरे

९) २०१५ ला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय काय करू शकते ह्याचा मला अंदाज आहे. राम मंदिरावरून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला, – राज ठाकरे

१०) पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का? – राज ठाकरे

११) पुलवामा नंतर मोदी हसत खेळत शांतता पुरस्कार घ्यायला गेले होते. नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये जाऊन कशी भारतीयांची वाट लावली हे सांगणारं भाषण करून आले – राज ठाकरे

१२) सैन्याचं एक वैशिष्ट्य आहे की सैन्याला दिलेलं काम ते शांतपणे आणि चोखपणे करून येतात. सैनिक लढाई जिंकतात किंवा हरतात, ते फक्त योग्य माहितीच्या आधारावर. भारतीय हवाई दलाने त्यांचं काम उत्कृष्टपणे पूर्ण केलं. – राज ठाकरे

१३) ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेताय असं म्हणून की राफेल विमान असती तर परिस्थिती वेगळी असती. राफेल घ्या किंवा घेऊ नका, अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचं उत्तर द्या – राज ठाकरे

१४ ) काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे? काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का? – राज ठाकरे

१५)मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत? – राज ठाकरे

१६) मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल – राज ठाकरे

१७) राफेल व्यवहाराची कागदपत्र चोरीला जात आहेत, आधी सरकार मान्य करतं की चोरीला गेले, आणि आता म्हणाले कॉपी चोरीला गेली. आणि हिंदू वर्तमानपत्राच्या एन राम हे रोज त्या कागदपत्रातून गौप्य्स्फोट करत आहेत. आज त्यांच्यावर चोरीचा आळ घेत आहेत – राज ठाकरे

१८) भारतीय जनता पक्षाचं नशीब बघा, आज त्यांच्यावर ‘राम’ आणि हिंदू’ उलटला – राज ठाकरे

१९)२५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाझ शरीफ ह्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे ७ दिवसांत पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. पुढे ३ महिन्यात ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या – राज ठाकरे

२०)उरी हल्ल्यानंतर उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या, गुरुदासपूर हल्ल्यानंतर १० दिवसात दिल्ली निवडणुका झाल्या – राज ठाकरे

२१) डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला? आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर? आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते? – राज ठाकरे

२२) ट्रोल करताना जर नीट टीका केली तर ठीक आहे पण उगाच शिव्या द्यायला लागले तर ट्रोलिंग करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा – राज ठाकरे

२३) राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं – राज ठाकरे

२४)राम आणि हिंदू अंगावर आला, द हिंदू वर्तमानपत्राचा दाखला देत राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला – राज ठाकरे

२५) 25 डिसेंबर 2015 ला नवाज शरीफला केक भरवला, पुढच्या 7 दिवसात 2 जानेवारीला पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला. केक बादला का? – राज ठाकरे

२६) मुद्द्याला मुद्दा असेल तर चालेल, थोडासा विरोध चालेल, पण आपल्याला शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारायचं – राज ठाकरे

२७) देशातील पत्रकाराला धोक्याची दिवस, गंमत म्हणून नव्हे तर गांभिर्याने घ्या – राज ठाकरे

२८)आपल्या पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, इतरांशी नव्हे, दोन देतो का , तीन देतो का असे करत नाही, तसे करायला मी काही प्रकाश आंबेडकर नाहीय – राज ठाकरे

२९ ) लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो सांगेन, तो तुमच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल, आचारसंहिता लागली की आपण भेटूच – राज ठाकरे

Read more...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी

मंत्रिमंडळ बैठक निर्णय (२९/०१/२०१९)

1. लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता.

2. गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय.

3. उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास मंजुरी.

4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल 15 टक्के मार्जिन मनी देण्याचा निर्णय.

5. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता.

6. औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जमिनी वगळून) अधिमुल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार.

7. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषि महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.

8. मुंबई शहरात अतिरिक्त 5625 सीसीटीव्ही बसविण्यासाठी येणाऱ्या 323 कोटी खर्चास मान्यता. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या वाढीव खर्चासही सुधारित मान्यता.

9. वर्ष 2015 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2015 च्या अधिनियमातील तरतुदी लागू होण्यासाठी सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 66 मध्ये सुधारणा.

Read more...

ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक पानसे यांना समर्थकाने लिहीले भावनिक पत्र; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

 

अभिजीत, मित्रा, तू चुकलास!

प्रिय अभिजीत,

“माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदासह शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतल्या चाणक्यांनी तुला भाविसेचा अध्यक्ष बनवलं. पुढे आदित्य ठाकरे यांची युवा सेना अध्यक्षपदी निवड झाल्याच्या मागे-पुढे हळूहळू भाविसे ही संघटनाच निष्प्रभावी करून गायब केली गेली आणि तुला शिवसेनेच्या चित्रपट सेनेचं अध्यक्षपदही भूषवण्याचा मान मिळाला. पण, तुझं खरं कर्तृत्व दिसलं ते ‘रेगे’ सिनेमाच्या दिग्दर्शनात. खरोखरच, ‘रेगे’ हा एक अप्रतिम सिनेमा होता आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून तुझं नाव मराठी सिनेसृष्टीत अत्यंत आदराने घेतलं जाऊ लागलं.

शिवसेना नेते, खासदार, दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमाचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी तू स्वीकारलीस, तेव्हाच खरंतर माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात पाल चुकचुकली होती. तू शिवसेनेतून बाहेर पडलास तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुला जवळ केलं आणि तुला तोच मानसन्मान दिला, जो काही काळ का होईना पण, तुला शिवसेनेत असताना मिळत होता. इतकंच कशाला, तुला मनसेचं नेतेपदही दिलं गेलं, जे आजवर भल्याभल्यांच्याही वाट्याला आलेलं नाही. असो. सांगायचा मुद्दा हाच की, मनसेचा एक नेता शिवसेनेच्या एका नेत्याची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन करतो, याचं आम्हा सर्वांना कौतुकच होतं.
दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीही तुझ्या या निर्णयाला कधी आडकाठी केली नाही. याची दोन प्रमुख कारणं असावीत.

एक, राज ठाकरे हे स्वत: एक कलावंत आहेत, आणि सिनेमावरचं त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. त्याबाबत तुलाच काय, कुणालाच काही नव्याने सांगायची आवश्यकता नाही.

पण दुसरं कारण अधिक महत्वाचं आहे. तू जो सिनेमा दिग्दर्शित करत होतास, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जीवन-कार्यावरचा सिनेमा होता, आणि बाळासाहेब म्हणजे राजसाहेबांचे दैवत, जणू प्राणच.

या दोन कारणांमुळेच एक दिग्दर्शक म्हणून तुझ्या कामात मनसेकडून कोणताही हस्तक्षेप केला गेला नाही, तुझ्या या नव्या जबाबदारीला विरोध केला गेला नाही, उलट, तू बाळासाहेबांचा सिनेमा दिग्दर्शित करतोयस, याचा सर्वच मराठी माणसांप्रमाणे मनसेतल्या प्रत्येकालाही अभिमानच वाटत होता.

असं असतानाही गेल्या काही दिवसांत माझ्यासारख्या अनेकांना काही गोष्टी खटकत होत्या. पण उगाच चांगल्या कामात अडथळा नको, म्हणून त्या गोष्टी आम्ही कधी चव्हाट्यावर मांडल्या नाहीत. ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन करताना, मग ती टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘बॉम्बे टाइम्स’ पुरवणीतील पेड पब्लिसिटी असो किंवा मराठी-हिंदी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांमधील ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन असो, तू कुठेच आम्हाला दिसला नाहीस. एकाही वृत्तवाहिनीत, वर्तमानपत्रात एक दिग्दर्शक म्हणून तुझी मुलाखत दिसली नाही. बघावं तिथे, सिनेमाचे निर्माते-संजय राऊत! विषय सिनेमातील ‘ठाकरें’साठी वापरण्यात आलेल्या आवाजाचा असो किंवा म्यूझिक लांच पार्टीचा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला निर्माता हजर!!
असं कधी कुठे असतं का?
तो बिचारा नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा प्रत्येक मुलाखतीत एखाद्या पढवलेल्या पोपटाप्रमाणे प्रत्येक उत्तरात ‘राऊतसाब’, ‘राऊतसर’ अशा घोषणा देताना दिसला.

आजवर आम्ही असंख्य सिनेमांच्या प्रमोशनचे इव्हेंट पाहिले, बातम्या केल्या, पण असा ‘चमको’ निर्माता कधी पहायला मिळाला नव्हता. खरंतर सिनेमाच्या दुनियेत दिग्दर्शक हाच सिनेमाचा कॅप्टन मानला जातो. एक कलावंत म्हणून दिग्दर्शक हाच त्याने बनवलेल्या सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. सिनेमा काय आहे, तो बनवताना काय आव्हानं होती, ती कशी पेलली, प्रत्येकाने काय योगदान दिलं, अशा सगळ्या बाबींवर दिग्दर्शकच अधिकारवाणीने बोलत असतो. कारण, आपण बनवलेल्या सिनेमाचा आवाका प्रत्यक्षात काय आहे, याची कल्पना फक्त दिग्दर्शकालाच असू शकते. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस आम्ही बघतोय ते नेमकं याच्या उलट आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून तुझ्यासाठी काही जागाच ठेवण्यात आली नाही. ही बाब निश्चितच कुणासाठीही शोभनीय नाही.

अर्थात, मला याची पूर्ण कल्पना आहे की, ‘ठाकरे’ हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा काटेरी मुकुट तू घातलास तो फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. बाळासाहेब हे व्यक्तिमत्वच तसं होतं. पण दुर्दैवाने, सिनेमाच्या निर्मात्यांचा हेतू तुझ्या लक्षात आला नाही.
तुला एक चांगला चित्रपट बनवायचा होता, आणि त्यांना बनवायचा होता प्रचारपट!
त्यांचा अजेंडा फक्त आणि फक्त राजकीय होता.
त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ होता-आहे.
तुझ्यासारख्या हूशार दिग्दर्शकाला हे कळू नये, ही एक शोकांतिकाच म्हणायला हवी.
पण माणसं प्रेमात चूका करतात.
तशी तुझी ही चूक झाली असावी.

आता शेवटचा मुद्दा.

काल ठाकरे सिनेमाचा वरळीच्या एट्रिया मालमध्ये खास शो होता. या शोमध्ये तुला योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. एका बातमीत असं म्हटलंय की, तू उशीरा आलास म्हणून तुला जागा मिळाली नाही. या लोकांना कुणीतरी सांगायला हवं की, विशेष खेळांमध्ये प्रत्येकाच्या जागा आरक्षित असतात. तिथे कुणीही येऊन कुणाच्याही जागेवर बसत नाही. ती काही गल्लीतली प्रचारसभा नाही. असो.

थोडक्यात काय तर, दिग्दर्शकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही, अगदी निर्माताही नाही, कारण दिग्दर्शक हाच सिनेमामागचा मेंदू असतो.

पण, “खरी ताकद ही ५६ इंचाच्या छातीत नाही, तर माणसाच्या मेंदूत असते” असला टुकार प्रचारकी संवाद बाळासाहेबांच्या तोंडी घुसडणा-या निर्मात्याला हे सांगणार कोण?

मित्रा, हा सिनेमा स्वीकारून तू खरंच चुकलास, पण काल तुझा अपमान झाल्यानंतर सर्वजण फेसबुक-ट्विटरवर तुझ्या पाठिशी उभे राहिले.

काहीजणांनी तर हा सिनेमा आम्ही बघणारच नाही, असं जाहीरसुद्धा केलं. हे सगळं तुझ्यावरच्या प्रेमापोटीच. म्हणून तर #isupportabhijeetpanase या हॅशटॅगसह हजारो महाराष्ट्र सैनिक काल रात्रीपासून स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आता तूसुद्धा तुझ्या भावना व्यक्त कर.
आम्ही सर्वजण तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.

तुझा चाहता,
कीर्तिकुमार शिंदे.

Read more...
Open chat