अखेर मीना खोऱ्यातील १२ गावातील शेतकऱ्यांच्या पाणी संघर्षाला यश


नारायणगाव | वडज धरणातून सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाला अनेक दिवस उलटून गेले असल्याने मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाण्या अभावी हाल होत होते. याच अनुषंगाने बुधवार दि. ३० जानेवारी रोजी तालुक्यातील बारा गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पाठबंधारे विभाग नारायणगाव येथे निवेदने देत आदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालय आवारात उपस्थित होते. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, तसेच युवा नेते अमित बेनके हे देखील उपस्थित होते. आज दोन दिवसांची मुदत संपल्याने शेतकरी ठिय्या आंदोलन करण्याकरीता पाटबंधारे विभाग कार्यालय कुकडी कॉलनी येथे पोहचले, परंतु याच वेळी ग्रामस्थांच्या विनंतीची दखल घेऊन येत्या अर्ध्या तासांत पाणी सोडण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता मांडे यांनी सांगितले.

काही वेळातच पाणीही सोडण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी जल्लोष करत, या संघर्षात शेतकऱ्यांसोबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी, उपस्थित असणाऱ्या अतुल बेनके यांना खांद्यावर उचलून घेत ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ आशा घोषणा दिल्या, या वेळी सामाजिक कार्यकर्ते जे. एल. वाबळे, जयहिंद उद्योग समूहाचे तात्यासाहेब गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, सुरज वाजगे, राहुल गावडे, पप्पू नायकोडी तसेच १२ गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचे व पत्रकारांचेही आभार मानले.

Read more...
Open chat