मांजरवाडी जळीतकांड करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी


मुस्लिम समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

सजग वेब टीम, जुन्नर
मांजरवाडी|येथील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील सर्वसामान्य गरीब टपरीधारक रशीद तांबोळी (वय५५) यांच्यावर जून्या भांडणाचा राग मनात धरून मध्यरात्री सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने बोलावून अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत जुन्नर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष भेटून समाज शिष्टमंडळाद्वारे आरोपी ॠषीकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहीती अल्पसंख्यांक संनियंत्रण समितीचे सदस्य राजू ईनामदार व कादरीया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे अध्यक्ष अब्दूल रऊफ खान यांनी दिली.

यावेळी शिष्टमंडळ प्रतिनिधी म्हणून सादिक आतार,अकबरखान पठाण,मेहबूब काझी, अकबर बेग,मुबारक तांबोळी,एजाज चौधरी,गफूर तांबोळी, उस्मान तांबोळी,रज्जाक तांबोळी,अहमद सय्यद,जाकीर तांबोळी,शोएब तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव हजर होते.
तपासात कुठल्याही प्रकारची कमतरता न ठेवता आरोपींचे यापूर्वीच्या स्थानिक कायदेशीर नोंदी तपासून कठोर शिक्षेसाठी कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी शिष्ठमंडळाला दिले.
नारायणगाव पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जून घोडे पाटील यांनी कर्तव्यदक्षपणे तपासकरून तत्परतेने आरोपींना अटक केल्याबद्दल तसेच मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी सदभावनेने पीडीत रशीद तांबोळी यांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि मांजरवाडी ग्रामस्थांचे व्यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांसमोर आभार व्यक्त केले.


पवित्र रमजान महिण्याचे उपवास सुरू असताना रशीद तांबोळी यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याबद्दल सर्वत्र खेद व्यक्त होत आहे.तांबोळी यांना पुणे येथील सुर्या हाॅस्पिटल येथे दाखल केले आहे.मोठ्याप्रमाणात भाजल्यामुळे त्यांची तब्येत गंभीरच आहे. आर्थिक परीस्थिती अतिशय बिकट असल्याने सर्व समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी श्री.तांबोळी यांना आर्थिक मदत करावी असे आवाहन यावेळी जुन्नर तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आले.

Read more...
Open chat