परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...

जोरदार शक्तीप्रदर्शन करत बांदल यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी केली जाहीर

जुन्नर । किल्ले शिवनेरीवर छत्रपतींच्या जन्मस्थानी आणि शिवाईदेवी मंदिर, ओझर च्या विघ्नहर देवस्थान तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील महत्वाच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी  हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करत शिरूर तालुक्याचे नेते मंगलदास बांदल यांनी आज जुन्नर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिरूर लोकसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. जुन्नर याठिकाणी भव्य सभा घेत बांदल यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यातआला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला हार घालून हजारो समर्थकांच्या गर्दीतून लोकांना हात मिळवत बांदल हे सपत्नीक आपल्या प्रचारसभेच्या ठिकाणी पोहोचले.

प्रचार सभेत बोलताना बांदल यांनी सध्याचे खासदार आढळराव पाटील यांच्यावर चौफेर आणि तुफान टिका केली. आता सूर्याजी होऊन गडाचे दोर कापावे लागणार आहेत आता माघार नाही असे उद्गार काढत त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. जुन्नर येथील सामाजिक आणि राजकीय आणि विविध क्षेत्रात संबंध असलेल्या विविध कुटुंबीयांची आणि विशेष व्यक्तींची या सभेला उपस्थिती होती यावेळी त्यांनी परदेशी कुटुंबियांची,माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत रघतवान आणि विविध कार्यकर्त्यांची विशेष स्तुती केली.  माजी खासदार निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतीचे स्मरण करत त्यांनी माजी आमदार कृष्णराव मुंढे, झांबरशेठ तांबे, शिवाजीराव काळे, किसनराव बाणखेले, माजी गृहराज्यमंत्री बापुसाहेब थिटे यांच्या स्मृतीचे स्मरण आणि आठवणी बांदल यांनी काढल्या.

खासदार आढळराव पाटील यांच्यांवर टीका करताना पैलवान बांदल यांनी तुफान फटकेबाजी केली. आम्ही सर्वच मराठे आहोत खासदारांना गर्व झालेला आहे, जॉर्ज फर्नांडीस यांनी केलेल्या सका पाटलांच्या पराभवाची आठवण करून दिली. आजपर्यंत कुणी जातीचा भेटला नाही पण आता भेटलाय. शिवाई देवीचा आशिर्वाद घेऊन रणांगणात उतरलोय नाही पराभूत केले तर जातीचा बांदल सांगणार नाही. तुम मुझे वोट दो मी तुम्हांला खासदार काय असतो दाखवतो. जे केलं ते केलं जे नाही केलं ते नाही केलं हि भूमिका घ्या उगाच लोकांसमोर म्हणायचे विमानतळ झालेच पाहिजे आणि लोक गेलेलं की वेगळी भूमिका घ्यायची. पुणे नाशिक रेल्वे आणि विमानतळाच्या मुद्द्यांवरूनही आढळराव पाटील यांच्यांवर बांदल यांनी  तुफान टिका केली.

या लोकसभा मतदार संघातील कुठलाच आमदार निवडून येत नाही मग हे खासदार होतातच कसे हि गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे. सगळ्यानांच गाडायचं आणि स्वतः मोठं व्हायचं अशी भूमिका खासदारांची आहे. खेड सोडलं तर हडपसर,शिरूर,भोसरी, जुन्नर, आंबेगाव याठिकाणी शिवसेनेचा आमदार का नाही. शिरूर लोकसभा मतदार संघालाच दृष्ट लागली आहे आता लिंबू उतरवून टाकण्याची गरज आहे अशी टिका बांदल यांनी  यावेळी बोलताना केली.

बांदल यांच्या भाषणाचा आवेश आणि जमलेली हजारोंची गर्दी आणि गाडयांची भलीमोठी  रॅली या सर्व वातावरण निर्मिती वरून त्यांनी लोकसभेसाठी जोरदार तयार केली आहे असंच म्हणावं लागेल. बांदल आता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेतात कि अपक्ष उभे राहतात  हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read more...

मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभेसाठी तयारी?

 

जुन्नर | शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध कोण लढणार ? याची चर्चा सध्या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील हेही म्हणावा तितका रस घेईनात त्यातच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेलं स्वतः उभे राहण्याविषयी चे वक्तव्य यामुळे शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटलांना आव्हान देणारा उमेदवार कोण? याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात.

दुसऱ्या बाजूला शिरूर तालुक्याचे नेते मंगलदास बांदल यांनी मात्र गेल्या वर्षी पासून जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील विविध पक्षांच्या विविध नेत्यांच्या संपर्कात राहत विविध कार्यक्रमांना लावलेली उपस्थिती हि त्यांच्या लोकसभा लढण्याच्या भूमिकेबद्दल सर्वांना भुवया उंचावायला लावण्यासारखी आहे.

आज बांदल यांनी जुन्नर तालुक्यातील माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निवासस्थानी जाऊन बेनके यांची भेट घेत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आर्वी याठिकाणी एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाला बांदल यांनी लावलेली उपस्थिती तसेच वाढदिवसाचं औचित्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्र ठिकाणी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याच्या बातम्या या सर्व गोष्टी त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट संकेत देत आहे असंच म्हणावं लागेल.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गाडीत बसून सर्वांनाच धक्का देत राजकीय डाव टाकण्यात तरबेज असलेले पैलवान बांदल मात्र सध्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत देत आहेत याबाबत विविध पक्षांचे कार्यकर्तेही चर्चा करत आहेत. बांदल यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शोध मोहिमेला काही दिवसांत उत्तर भेटण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये.

Read more...
Open chat