जुन्नर भूमिअभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

 

 

मनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम)

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील जुन्नर येथे असणारे उपअधीक्षक भूमि अभिलेख या कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट झाला असून येथील काम एजंट असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर लक्ष्मी देवीची कृपा दृष्टी असल्याने येथे सोन्याचा धूर निघत आहे.

तालुक्यामध्ये सध्या जमिनीला चांगला भाव आल्याने जो तो आपापल्या जमिनीच्या हद्दी निश्चित करण्यासाठी जमिनीची मोजणी ,गट नकाशा, योजनापत्रक ,फळणीबाराचा उतारा , जाबजबाब नकला,प्रॉपर्टी कार्ड व नकाशे आदी करून घेत आहेत.
त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करतात, त्यावेळी त्या अर्जाची कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा सांगितले जाते की, तुम्ही कागदपत्रे नेण्यास आलेच नाहीत, परंतु अधिकाऱ्यांनी कागदपत्रे काढलेलीच नसतात, परंतु तोच अर्ज जर एजन्टमार्फत आला तर लगेच त्याची दखल घेतली जाते व संबंधित अधिकाऱ्याकडून त्या एजन्ट मार्फत अर्जदाराला रक्कम सांगितली जाते आणि ती रक्कम मिळाल्यानंतर संबंधित अर्जदाराचे काम केले जाते.

परंतु हे काम करण्याअगोदर हे अधिकारी अर्जदाराला खासदार,आमदार यांचे पत्र आणण्यास सांगतात ,कारण वरिष्ठ अधिकारी यांनी विचारले हे काम तात्काळ का केले तर त्यानां सांगितले जाते की, खासदार,आमदारांनी पत्र दिले होते म्हणून हे काम केले.

गटनकाशा, फाळणीबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड व नकाशे शोधण्यासाठी कार्यलयामध्ये कर्मचारी असून सुद्धा ऑफिसशी संबंधित नसलेले एजन्ट नागरिक हे शोधण्याचे काम करताना दिसतात त्यामुळे येथे असणारी सरकारी कागदपत्रे गहाळ होत असलेल्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे.
या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? अशी नागरिकांमधून विचारणा होत आहे.
कार्यलयातील संबधीत अधिकारी खासगी सर्वेअरमार्फत जमिनीची मोजणी करून घेतात व सर्वेअरला परत एक विशिष्ट रक्कम त्या शेतकऱ्याला देण्यास सांगतात ,या कार्यालयातून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यांची चौकशी करा सगळीकडे एकच उत्तर ते म्हणजे संबंधित अधिकारी मोजणी करण्यासाठी गेले आहेत.
जर अधिकारी तालुक्यतील जमिनीची मोजणी प्रामाणिकपणे करत असतील तर नागरिकांच्या जमिनी बाबत च्या तक्रारिंचे निवारण का होत नाही?
हा प्रश्न उपस्थित होतो वरिष्ठ कार्यलयाकडे याबात लेखी निवेदन, तक्रार झाली तर त्यावर फक्त चर्चा केली जाते.
परंतु परिस्थिती जैसे थें राहते येथील संबधिंत अधिकारी इतके निर्भय झाले आहेत की ते नागरिकांना सांगतात की ,”होऊन होऊन काय होईल माझी बदली होईल ” याशिवाय दुसरे काय होईल असे उत्तर देण्यासही कचरत नाहीत व भिंतीवर लावलेले नियम व कायदा दाखवितात परंतु कार्यालयातील हेच कर्मचारी नियम व कायदा पाळत नाहीत.

एकंदरीत कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देण्यास कोणीही वाली राहिला नाही अशी परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात निर्माण झाली आहे.

Read more...
Open chat