आमदार सोनवणे आपलं ठेवतात झाकून अन दुसऱ्याचं पाहतात वाकून – भाऊसाहेब देवाडे

नारायणगाव | दि १३ जानेवारी २०१९ रोजी वारुळवाडी-गुंजाळवाडी रस्त्याचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रास्तारोको नंतर, युवानेते अतुल बेनके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नारायणगाव येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी या कारवाई विरोधात आपल्या तीव्र भावना या व्यक्त केल्या आहेत.

“कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे ही लोकशाहीची गळचेपी”
– अलका फुलपगार (उपनगराध्यक्ष, जुन्नर नगरपरिषद)

दाखल झालेले गुन्हे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. – पांडुरंग पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका अध्यक्ष)

पोलीस प्रशासनाने केलेल्या या कारवाई मागे राजकीय हस्तक्षेप
– शरदराव लेंडे (जिल्हा परिषद गटनेते)

या भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

“सदर रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत.हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.या रास्ता रोकोमुळे उपमार्ग असणाऱ्या या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा अर्धा ते एक तास खोळंबा झाल्याने आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले, परंतु अनेक महिने नव्हे तर वर्ष अपूर्ण असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे किती वाहतूक खोळंबा झाला अन कित्येक जीव गेले? मग याला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनावर गुन्हे का दाखल होऊ नये?” असा खडा सवाल गुंजाळवाडी गावचे ग्रामस्थ विकास दरेकर यांनी उपस्थित केला.

“आमदार आपलं ठेवतात झाकून अन दुसऱ्याचं पाहतात वाकून” अशी जळजळीत टीका या वेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे यांनी केली.

” कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलने करावीत” अस वक्तव्य आमदार शरद सोनवणे यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना केलं होतं. तसेच “अतुल बेनके म्हणजे उतावळा नवरा अन गुढग्याला बाशिंग”अशी टीकाही त्यांनी बेनके यांच्यावर केली होती.

सध्या जुन्नर तालुक्यात रास्ता रोको आणि दाखल झालेले गुन्हे हा चर्चेचा विषय बनला आहे. या आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याचे काम मात्र सुरू झाले असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Read more...
Open chat