समर्थ इन्स्टिट्यूट व टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा.लि.यांच्यात तिसरा सामंजस्य करार

सजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे व टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दुसरा व महाराष्ट्र राज्यातील तिसरा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीच्या माध्यमातून समर्थ शैक्षणिक संकुलात ऑटोमोबाईल बॉडी रिपेअर व ऑटोमोबाईल पेंट रिपेअर हे एक एक वर्षाचे दोन अभ्यासक्रम प्रशिक्षण व तांत्रिक शिक्षण विभाग,एन सी व्ही टी दिल्ली सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहेत.या अभ्यासक्रमांना प्रत्येकी २१ याप्रमाणे ४२ विद्यार्थी प्रवेशित झालेले होते.
अद्ययावत प्रशिक्षण उपकरणे, प्रशिक्षण सामग्री,साधने, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन इत्यादी सर्व प्रकारच्या सुविधा या विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि कुशल व सक्षम होण्यासाठी प्रशिक्षित करणे हे आमच्या संस्थेचे ब्रीद आहे असे शॉ टोयोटा पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पालवनकर यांनी सांगितले.
सदरच्या कॅम्पस ड्राइव्ह मध्ये २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या विद्यार्थ्यांना संपत हाडवळे व स्वप्नील कवडे यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा.लि.चे पश्चिम विभाग ट्रेनिंग हेड प्रदीप दत्त गुप्ता,बिक्रम वर्मा आदी उपस्थित होते.या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व सातत्यपूर्ण काम हाच यशाचा गाभा असून त्याचे उदात्तीकरण व अंमलबजावणी यापुढेही अशीच वृद्धींगतपणे होवोत अशा सदिच्छा दिल्या.
Read more...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळाल्या रोजगाराच्या संधी

सजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद)

बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांची संख्या आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे.तांत्रिक ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल, मुख्य विषयाबाबतचे सखोल ज्ञान,प्रात्यक्षिक ज्ञान व्यवहारिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा विचार करूनच कंपनी विद्यार्थ्यांची निवड करत असल्याचे किला कंपनीचे अधिकारी म्हणाले.समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकत असलेल्या कौस्तुभ चव्हाण याची इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये टेक्निशियन अँपरेंटीस म्हणून तर सुशांत हाडवळे याची जे.कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मुंबई मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड झाल्याची तसेच २.२० लाखाचे वार्षिक पॅकेज सदर विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी दिली.

कॅम्पस ड्राइव्ह २०१९ अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील आकाश ढोबळे,पवन शिंदे,अक्षय दुश्मन, पल्लवी गुंजाळ,बाबू शिंदे व सौरभ कुटे यांची तर समर्थ इंजिनिअरिंग च्या सिव्हील विभागातून ओंकार शिंदे व अनंत करंडे यांची द किला कोटिंग कंपनी मुंबई मध्ये निवड करण्यात आली.टाटा मोटर्स पिंपरी चिंचवड मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील धनेश भोर व तुषार पवार यांची निवड झाली असून २.५ लाख वार्षिक पॅकेज त्यांना देण्यात येणार असल्याचे प्राचार्य अनिल कपिले यांनी सांगितले.

निवड झाल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Read more...

समर्थ शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या स्मृतीस अभिवादन.

सजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांची शिदोरी आणि कार्याबद्दल माहिती देताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले की स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद समजून बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष उभा करणारे कर्मवीर हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे,मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे,निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे यासाठी प्रयत्न केला.सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी,शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे हि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे,तर समता,बंधुता, श्रमप्रतिष्ठा,सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
कर्मवीरांच्या पुण्य स्मृतीस अभिवादन करून आपल्या समर्थ शैक्षणिक संस्थेमार्फत समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणरूपी खतपाणी घालून उद्धारासाठी प्रयत्न करू असा विश्वास यावेळी सर्व शिक्षकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा.संजय कंधार यांनी मानले.
Read more...

डीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई

सुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम)

बेल्हे |  बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर महामार्गावर एक नाही दोन नाही जवळजवळ दहा ते बारा डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला तो गुळूंचवाडी येथील एका लग्नाच्या मांडवडहाळ्यांच्या मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट चालू होता व त्यापुढे तरुणांची अलोट गर्दी नाचत होती. वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता याचवेळी कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर बेल्हे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि डीजेचा आवाज अचानक शांत झाला पण यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच ते सहा डीजेच्या गाड्या पलायन करण्यात यशस्वी झाल्या असून पोलीस कारवाईत सहा गाड्या सापडल्या असून त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होते त्यांचा स्वतःचाही एक डीजे या कारवाईत सापडला आहे आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः एक किर्तनकार असून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम करतात.

सध्या लग्नसराई त्यातच असणाऱ्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला टाळता येत नाही,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध,रुग्ण व सध्या चालू दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून याचे काहीही सोयरसुतक डीजेचालक व वधू-वर पक्षाला नसते.स्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते.यावेळी झालेल्या कारवाईमध्ये अक्षय आशिर्वाद पवार,एम एच-०४-सीजी-३७७० (रा.गुळूंचवाडी),दगडू भाऊ येलमार,एम एच-०४-सीजी-३१५३ (रा.खापरवाडी,आळे),संतोष हरिष राठोड,एम एच-१४-एफ-५७७४(रा.आळे),गणेश दिनकर औटी,(७०९टेंपो) रा.गुंजाळवाडी,बाळासाहेब विठ्ठल चव्हाण,एम एच-१६-क्यू-११५५(रा.वडगाव आनंद),ऋषीकेश संतोष हुलावळे,एम एच-१२-डीजी-३११४ या सहाही डीजेचालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे व संदीप फड हे करीत आहेत,जुन्नर तालुक्यातील डीजेवरील सर्वात मोठी कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याने केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,न्यायालयाची डीजे वाजविण्यावर मनाई असतानाही भयानक आवाजाच्या नवनवीन सिस्टीम्स कोणाच्या आशिर्वादाने चालतात हाही एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

Read more...

बेल्हे परिसरात ऊसाला आगीचे सत्र; दिड एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी

सुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम)

बेल्हे | जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात  यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत असून असलेल्या जेमतेम पाण्यावर आपापली पिके जगविण्याची धडपड करत असून कल्याण-नगर महामार्गावरील गुंजाळवाडीच्या (बेल्हे ) शिवारात दत्तात्रय सखाराम गुंजाळ यांचा दिड एकर उस आगीच्या भक्षस्थानी पडला असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून अर्धवट ओढलेल्या विडी, सिगारेट किंवा आगपेटीच्या काडीमुळे लागलेल्या आगीमध्ये ऐन दुष्काळात जगविलेला व त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून काही आडाखे बांधलेले असतानाच   दिड एकर उस जळून खाक झाला यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने व जवळपास पाण्याची काहीही सोय नसल्याने आगीने रौद्र स्वरुप धारण केले व संपूर्ण उस आगीच्या भक्षस्थानी पडला,याचवेळी कारखान्याचे ऊसतोड कामगार ऊस तोडण्याचे करत होते, तसेच या आगीमुळे शेजारीच असणाऱ्या राजेंद्र गंगाधर गुंजाळ या शेतक-याच्या द्राक्ष बागेतील ५००झाडांना या आगीची झळ पोहोचली असून चालू हंगामासह नवीन झाडांच्या लागवडीसह जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले,या आगीचे कारणही अज्ञात असल्याचे समजते.या अचानक लागलेल्या आगीचा पंचनामा बेल्हे महसूल कार्यालयाने केला.

Read more...

लग्नातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळासाठी १५ हजारांची मदत

सुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम)

बेल्हे | बांगरवाडी(ता.जुन्नर) येथील प्रमोद बांगर यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नामधील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक संस्था व बांगरवाडी येथील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोरांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत केली. त्यांनी  १५ हजार रुपयांची मदत तीन सामाजिक संस्थांना केली. बांगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांगरवाडी विकास पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रमोद बांगर यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपत राजुरी व आळे येथील निराधार वृद्धांसाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या अन्नपूर्णा संस्थेला प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली तसेच स्वतःच्या बांगरवाडी गावातील  निसर्गाचा अमूल्य ठेवा असणारा राष्ट्रीय पक्षी मोरांच्या चारा व पाण्याच्या व्यवस्थेसाठी पाच हजार रुपयांची मदत केली.या त्यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले व ईतरांनीही यापासून बोध घेण्याची गरज आहे अशी चर्चा बांगरवाडी परिसरात चालू आहे.

Read more...
Open chat