पुणे जिल्ह्यात ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पुणे – जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. ३४ गावे आणि ३७९ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे सव्वा लाख लोकसंख्या तहानलेली असून, त्यांना ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक १८ टॅंकर बारामती तालुक्‍यात सुरू आहेत.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ५९ टॅंकरपैकी ११ शासकीय, तर उर्वरित ४८ खासगी टॅंकर आहेत. गतवर्षी एप्रिल महिना सुरू होईपर्यंत जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू झाला नव्हता. यंदा काही गावांना पावसाळ्यात देखील टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. परिणामी, यंदा जिल्ह्यात बारमाही टॅंकर सुरू राहणार आहेत. हवेली, भोर, वेल्हे, मावळ आणि मुळशी या तालुक्‍यांत आतापर्यंत एकाही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासलेली नाही. त्यामुळे या तालुक्‍यात अद्यापपर्यंत एकही टॅंकर सुरू करावा लागलेला नाही.

टॅंकरने पाणीपुरवठा केली जाणारी तालुकानिहाय गावे आणि वाड्या-वस्त्यांची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात टॅंकरची संख्या) – बारामती : १४ गावे व १५१ वाड्या (१८ टॅंकर). आंबेगाव : पाच गावे, २३ वाड्या (७). दौंड : ४ गावे, ६३ वाड्या (७). इंदापूर : एक वाडी (१). जुन्नर : २ गावे, ३७ वाड्या (३). खेड : २ गावे, २९ वाड्या (३). पुरंदर : २ गावे, १८ वाड्या (३). शिरूर : ६ गावे, ५७ वाड्या (१७). लोकसंख्येनुसार टॅंकरची संख्या पुढीलप्रमाणे ः आंबेगाव : ११ हजार ६२४, बारामती : ३५ हजार ४३६, दौंड : १२ हजार ३८८, जुन्नर : सात हजार ५९०, खेड : सहा हजार ३९४, पुरंदर : तीन हजार ८४६, शिरूर : ३७ हजार ४४९.

जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने, काही गावांना भर पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधीची पुरेशी तरतूद केली आहे. यासाठी जिल्ह्याचा सुमारे ६६ कोटींचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे टंचाई निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
– विश्‍वास देवकाते, जिल्हा परिषद अध्यक्ष, पुणे

Read more...
Open chat