पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी खा. अमोल कोल्हे यांची माहिती

पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी खा. अमोल कोल्हे यांची माहिती

सजग वेब टिम, पुणे

पुणे | पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे.

गेल्या वर्षभरापासून रेल्वे मंत्रालयाकडे पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे डीपीआरला मंजुरी मिळावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून डॉ. कोल्हे प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करीत होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात त्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केला होता. या प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले आणि २ जून रोजी या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने (रेल्वे बोर्ड) मंजुरी दिली.

रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळताच खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी वेळ मागितली होती. मात्र बुधवारी निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि. ४ रोजी) वेळ दिली. त्याबरोबर डॉ. कोल्हे यांनी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल यांना सादरीकरणाच्या तयारीनिशी मंत्रालयात येण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी साडेतीन वाजता श्री. जैस्वाल यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव, खासदार डॉ. कोल्हे आदी उपस्थित होते.

सुमारे तासभर चाललेल्या या सादरीकरणा दरम्यान वित्त, नियोजन आणि परिवहन या तीनही विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी प्रकल्पासाठी येणारा खर्च व अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा केली. त्यांच्या शंकांचे श्री. जैस्वाल यांनी निराकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाच्या सर्व बाजू समजावून घेऊन आवश्यक सूचना केल्या. तसेच आपण या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले.

या बैठकीमुळे गेल्या २५ वर्षांपासून जुन्नर, आंबेगाव, खेडसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने पाहिलेले स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १५ वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता फक्त रेल्वे प्रकल्प होणार हे ऐकत होती. पण ती प्रत्यक्षात रुळावर केव्हा धावणार हा विषय लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला होता. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आपण निवडून आल्यावर पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. वर्षभरापासून डॉ. कोल्हे गेली अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

या संदर्भात बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, आजचे प्रकल्पाचे सादरीकरण अतिशय प्रभावी झाले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह परिवहन, वित्त व नियोजन या तीनही विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून राज्य सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी मी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार असून मतदारसंघातील जनतेचं हे स्वप्न नक्की पूर्ण करु असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read more...

खा. अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठानची आदिवासी भागातील लोकांना मदत

खा. अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांना मदत

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. नारायणगाव याठिकाणीही आज खा. डॉ अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने गरजू आणि उपेक्षित नागरिकांना मदत कार्यक्रम देण्यात आली. जुन्नर तालुक्यातील आदिवासी आणि मावळ भागातील ६६३ गरजू कुटुंबियांना किराणा माल आणि जिवनावश्यक वस्तू डॉ कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या कार्याचा नारळ वाढविण्यात आला.

यावेळी शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नर चे आमदार अतुल बेनके, नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, नारायणगाव चे ग्रामसेवक नाईकडे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे यांच्यासह कोल्हे मळ्यातील विविध कार्यकर्ते आणि जगदंब प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

शिवसेनेतील नाराजांचा आणि सोनवणेंच्या जातीयवादी प्रचाराचा आढळरावांना फटका – अतुल बेनके

 

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव : जुन्नर विधानसभा मतदार संघातून शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार मतांची आघाडी निश्‍चित मिळेल.असा विश्‍वास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी व्यक्त केला आहे.

जुन्नर तालुका हा कोल्हे यांचा तालुका असल्याने येथून ते किती मताधिक्य घेणार यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. जुन्नरमधून त्यांना मोठी आघाडी भेटली तर ते चांगली लढत देऊ शकतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांना तरी त्यांनाच आघाडी मिळेल, याचा विश्वास वाटतो आहे.

बेनके म्हणाले, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जुन्नर तालुक्‍यात नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली होती. प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस व मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने सहभागी झाले होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्योजक असल्याने या भागात तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील,शेती पूरक व्यवसाय सुरू करतील या भावनेने मतदारांनी मागील तीन निवडणुकीत आढळराव पाटील यांना मोठ्या विश्‍वासाने संधी दिली होती. मात्र शेती, सिंचन, सहकार, दळणवळण या सर्व आघाडीवर खासदार आढळराव पाटील अपयशी ठरले.

निवडणुकीच्या तोंडावर खासदार आढळराव पाटील यांच्या पुढाकारामुळे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महामार्गाचे काम अपूर्ण असताना आमदार सोनवणे यांनी चाळकवाडी येथे टोल सुरू करुण टोलचा झोल केला. यामुळे शिवनसेच्या गटनेत्या अशा बुचके यांच्या नाराज समर्थकांच्या नाराजीचा फटका आढळराव पाटील यांना बसणार आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आमदार सोनवणे यांनी तालुक्‍यात जातीयवादी प्रचार सुरू केला. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना महिला, युवती व तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक प्रचारात खासदार आढळराव पाटील व शिवसेनेचे नेते डॉ.कोल्हे यांच्यावर खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका केली.मात्र डॉ.कोल्हे यांनी सुसंस्कृतपणे प्रचार केला.ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी वर्गणी काढून डॉ. कोल्हे यांना मदत केली, असे बेनके यांनी सांगितले.

Read more...

खेड तालुक्यातून अमोल कोल्हेंना ३० हजाराचे लिड : दिलीप मोहिते पाटील

 

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्यातून ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. महिला, तरुण, माळी समाज आणि इतर मागासवर्गीयांची बहुतांश मते राष्ट्रवादीला मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.

आम्ही तालुक्याच्या गावागावात प्रचार केला, शंभर ते सव्वाशे कोपरसभा आणि नऊ-दहा मोठ्या सभा घेतल्या. सर्वठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधी लोकांच्या सभांना गर्दी होत नव्हती. त्यांची उद्धव ठाकरेंची सभाही फ्लॉप झाली. पंतप्रधान मोदींची हवाही कुठे दिसली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना तालुक्यात सभाही घेता आली नाही. शेवटच्या दिवशी राजगुरूनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या रॅलीला दोनशे लोकही नव्हते. याउलट त्याच दिवशी डॉ. कोल्हेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र डॉ. कोल्हे यांना सर्वठिकाणी उदंड प्रतिसाद मिळणारा यावरून तालुक्यात त्यांना ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मला वाटतो, असे मोहिते म्हणाले.

आम्ही नेत्यांनी गावागावात प्रचार केला, मात्र गावातील कार्यकर्त्यांना गावातच ठाण मंडून बसण्यास सांगितले होते. आम्ही गावात गेल्यावर खासदारांनी तुमच्या गावात काय काम केले ? आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का ? एवढे दोन प्रश्न आवर्जून विचारायचो. त्यांची उत्तरे बहुतांशवेळा नकारार्थी यायची. त्यावर मग त्यांना मत कशासाठी द्यायचे असा प्रश्न विचारल्यावर लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती यायची आम्हाला सकारात्मक वातावरण तयार व्हायचे. याउलट नोटबंदी, जीएसटी, बैलगाडा शर्यती आणि खोट्या आश्वासनांमुळे विरोधी बाजूंवर लोकांचा राग दिसत होता. शिवसेना आणि भाजपचे लोक एकमेकांबरोबर प्रचंड भांडत होते आणि त्यानंतर अचानक गळ्यात गळे घालू लागले हेही लोकांना पटले नाही, त्यामुळे तालुक्यात आम्हाला मताधिक्य निश्चित असल्याचे असेही मोहिते यांनी सांगितले.

Read more...

जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचा कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर – शिरोली गावचा जुन्नर तालुक्याचा भूमीपुत्र म्हणून डाॅ अमोल कोल्हे यांना गावबैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोली गावाने एकत्र येऊन गावची बैठक घेऊन एकजुटीने कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहिर केला आहे. याआधी नारायणगाव, वारूळवाडी या गावांनीही कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकजुटीने काम करत असल्याचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसत आहे हे आघाडीसाठी आशादायक म्हणावं लागेल.

Read more...

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड
अमोल कोल्हेंचा जुन्नर तालुका प्रचार दौऱ्याला जुन्नरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी काल आपल्या घरच्या तालुक्यात प्रचार दौरा केला. नारायणगाव येथून ग्रामदैवतांचे दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात झाली. हनुमान मंदिर ते बस स्टॅन्ड अशी पदयात्रा काढून लोकांच्या गाठीभेटी घेत या प्रचार दौऱ्याची सुरवात झाली बस स्टॅन्ड वर छोटीशी घेतलेली सभा पै. मंगलदास बांदल यांच्या वक्तृत्वाने गाजली.

नारायणगाव नंतर बोरी, पिंपळवंडी, ओतूर, उंचखडक, डिंगोरे , ओझर असा प्रवास करत या प्रचार यातत्रेचा ओझर याठिकाणी समारोप करण्यार आला. या यात्रे दरम्यान अमोल कोल्हे यांना जनतेचा मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व असा होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

तत्पूर्वी बांदल यांनी नारायणगाव, ओतूर याठिकाणी बोलताना विद्यमान खासदार आढळराव यांच्यावर विमानतळ, रेल्वे, बैलगाडा,पुणे नाशिक हायवे, ट्रॅफिक या मुद्द्यांवरून तुफान टिका केली. तसेच शिवसेना अंर्तगत असलेल्या वातावरणाचाही थेट उल्लेख त्यांनी यावेळी केला. शरद पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करणारे आढळराव पाटील यांना सत्तेचा गर्व झाला आहे. हडपसर , भोसरी, शिरूर, खेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बांदल यांनी यावेळी बोलून दाखवली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस हि अतुलदादा बेनके यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे काम करत आहे सर्व कार्यकर्त्यांनी या सर्वांच्या मागे उभे राहावे. तसेच अतुल बेनके यांच्या मध्ये आता वल्लभशेठ बेनके दिसायला लागलेत.

 

नारायणगाव येथे स्टॅन्ड जवळ झालेल्या सभेत नारायणगाव च्या उद्याच्या शिवजयंती चे आमंत्रण देत गावची शिवजयंती आहे डॉक्टर तुम्हीही उपस्थित राहा डॉ अमोल कोल्हे यांना आमंत्रित केले. त्याचवेळी मागे आपल्या कार्यकर्त्यांसह उभ्या असलेल्या सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या क्षणी मात्र संपूर्ण सभेचे वातावरण च बदलून गेले. या सभेनंतर सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांनी डॉ अमोल कोल्हे यांना मारलेली मिठी आणि सरपंचांनी गावच्या उमेदवाराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे काल नारायणगाव मध्येच राजकीय धुळवडीला सुरुवात झाली.

प्रचार सभांना मिळत असलेल्या उस्फुर्त प्रतिसाद पाहता जुन्नरकर जनता घरच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभी राहील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच बांदल यांच्या वक्तृत्वाने सभांचे वातावरण रंगत असून कार्यकर्तेही उत्साहात प्रचार करत आहेत. भाजप च्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आढळराव यांनी कायम सापत्न वागणूक दिलेली आहे त्यामुळे भाजप च्या आमदारांना कार्यकर्त्यांना दुखवू नका ते आपलेच आहेत तसेच खेडचे आमदार सुरेश गोरे हे अमोल कोल्हे यांच्यामुळेच आमदार झाले त्यामुळे तेही आपल्याच बरोबर आहेत असे भुवया उंचावणारे राजकीय वक्तव्य करत त्यांनी काल च्या सभांमध्ये मोठे खुलासे केले.

ओतूर याठिकाणी झालेल्या सभेत जुन्नरकरांचा स्वभाव हा दिलदार असून मोठ्या मनाची प्रेमळ माणसं याठिकाणी राहतात. पोटतिडकीने सांगतो एकदा फक्त सर्वांनी ठरवा आणि समस्त जुन्नरकरांनी शपथ घेऊन आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहन बांदल यांनी यावेळी केले.

Read more...

मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची – विलास लांडे

सजग वेब टीम, राजगुरूनगर

चाकण | शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित चाकण येथील सभेत ते बोलत होते. या सभेसाठी विलास लांडे आणि मंगलदास बांदल हे दोन्ही उमेदवारी न भेटल्याने नाराज नेते यावेळी उपस्थित होेते.

सभेत विलास लांडे यांचे भाषण सुरू असताना बांदल आले त्यावेळी लांडे म्हणाले की या बांदल बसा. आता आपल्याला बसायचे आहे. लांडे असे म्हणताच उपस्थित नागरिकांत एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोहिते पाटलांचे आणि आम्हा दोघांचे मनोमिलन झाले आहे. या निवडणुकीत साहेबांच्या विचारांना ताकद द्यायची आहे. ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करणारा पहिला मंत्री म्हणजे पवार साहेब आहेत. १५ वर्षात काही काम नाही. विमानतळ नाही. रेल्वे नाही. सीएसआर निधी देखील  स्वतःच्या शाळेसाठी नेला अशी टिका आढळराव पाटील यांच्यावर त्यांनी केली. मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन लांडे यांनी यावेळी केले.

Read more...

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही: अजित पवार

पुणे : “शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्यांनी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती शिरूरसाठी होणाऱ्या प्रचारात दिसून येईल” असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून शिरुर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरुर मतदारसंघात उभे होते. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीकडून शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विलास लांडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे शिरुर मतदार संघात कोल्हेंविरोधात बॅनरबाजी करुन नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार अशी भूमिका लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न लांडे यांनी केला.

या प्रकारावरुन राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असल्याची चर्चा सुरु होती. याचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होऊ शकतो. याबाबत अजित पवार यांनी विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन सर्वांची समजूत घातली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी, कामाला लागा असा आदेश दिला असून लांडे यांनी देखील ”पक्ष जे काम देईल ते मी करणार” अशी भुमिका स्पष्ट केली.

Read more...

राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित

सजग वेब टीम

राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित

मुंबई | शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्रसिद्ध अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार छगन भुजबळ, आमदार अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, नवाब मलिक यांच्यासह पक्षातील अनेक नेते उपस्थित होते.

या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेची उमेदवारी हि डॉ. अमोल कोल्हे यांनाच देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. याच पार्श्वभूमीवर येत्या ५ मार्च पासून डॉ. अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघाच्या संपर्क दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार आहेत व या सभांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी आपल्याला ठिकाणच्या होणाऱ्या सभेची जबाबदारी घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व घटना पाहता डॉ.कोल्हे यांच्या उमेदवारी संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा व्हायची फक्त बाकी आहे असच म्हणावे लागेल.

Read more...
Open chat