पुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे
पुणे – मुंबई दरम्यानच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करा – खा. अमोल कोल्हे
सजग वेब टिम, पुणे
पुणे| राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय कार्यालयात वेळेत पोहोचता यावे यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. पियुष गोयल यांच्याकडे केली.
महाराष्ट्र शासनाने नुकताच कार्यालयीन कामकाजासाठी ५ दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेमध्ये सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. असा बदल करण्यात आला. या बदलामुळे पुण्याहून मुंबईला दैनंदिन प्रवास करणाऱ्या शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे दैनंदिन वेळापत्रक गैरसोयीचे ठरले. परिणामी शासकीय कर्मचारी व अधिकारी आपल्या कार्यालयात वेळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांना ‘लेटमार्क’ला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुण्याहून सुटणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करणारे निवेदन पुणे व पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले होते.
खासदार डॉ. कोल्हे यांनी याची तत्काळ दखल घेऊन संसद अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वे मंत्री श्री. पियुष गोयल यांची भेट घेऊन रेल्वे वेळापत्रक बदलण्याची मागणी करणारे पत्र दिले. यावेळी रेल्वे मंत्री श्री. गोयल यांनी मुंबई उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक पाहून या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.