डीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई
सुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम)
बेल्हे | बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर महामार्गावर एक नाही दोन नाही जवळजवळ दहा ते बारा डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला तो गुळूंचवाडी येथील एका लग्नाच्या मांडवडहाळ्यांच्या मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट चालू होता व त्यापुढे तरुणांची अलोट गर्दी नाचत होती. वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता याचवेळी कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर बेल्हे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि डीजेचा आवाज अचानक शांत झाला पण यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच ते सहा डीजेच्या गाड्या पलायन करण्यात यशस्वी झाल्या असून पोलीस कारवाईत सहा गाड्या सापडल्या असून त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होते त्यांचा स्वतःचाही एक डीजे या कारवाईत सापडला आहे आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः एक किर्तनकार असून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम करतात.
सध्या लग्नसराई त्यातच असणाऱ्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला टाळता येत नाही,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध,रुग्ण व सध्या चालू दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून याचे काहीही सोयरसुतक डीजेचालक व वधू-वर पक्षाला नसते.स्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते.यावेळी झालेल्या कारवाईमध्ये अक्षय आशिर्वाद पवार,एम एच-०४-सीजी-३७७० (रा.गुळूंचवाडी),दगडू भाऊ येलमार,एम एच-०४-सीजी-३१५३ (रा.खापरवाडी,आळे),संतोष हरिष राठोड,एम एच-१४-एफ-५७७४(रा.आळे),गणेश दिनकर औटी,(७०९टेंपो) रा.गुंजाळवाडी,बाळासाहेब विठ्ठल चव्हाण,एम एच-१६-क्यू-११५५(रा.वडगाव आनंद),ऋषीकेश संतोष हुलावळे,एम एच-१२-डीजी-३११४ या सहाही डीजेचालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे व संदीप फड हे करीत आहेत,जुन्नर तालुक्यातील डीजेवरील सर्वात मोठी कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याने केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,न्यायालयाची डीजे वाजविण्यावर मनाई असतानाही भयानक आवाजाच्या नवनवीन सिस्टीम्स कोणाच्या आशिर्वादाने चालतात हाही एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो.