सोशल मीडियावर आमदार बेनके यांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
सोशल मीडियावर आमदार बेनके यांची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
सजग वेब टीम, जुन्नर
आळेफाटा | आमदार अतुल बेनके यांचे विषयी सोशल मिडीयावर कोरोना चाचणी व राजकिय द्वेषातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल माजी आमदार शरद सोनवणे यांचे समर्थक व कार्यकर्ते सुशांत दरेकर यांच्यावर आळेफाटा पोलीस स्टेशन याठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी विजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक आरोग्य परिस्थितीवर भाष्य करून बेनके परिवार व कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्याने दरेकर विरोधात आळेफाटा पोलिसांकडून स्टेशन येथे भा. द. वि. कलम 501, 504, 505(1)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आमदार बेनके समर्थक ठिकठिकाणी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी विजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:हून नजीकच्या पोलीस स्टेशनला जावून तक्रार देण्यासंबंधीची भूमिका घेतली असून, आमदारांविषयी केलेली बदनामीकारक वक्तव्ये त्यामुळे गटागटात निर्माण होणारी तेढ यामुळे सामाजिक अशांतता पसरू शकते यांची प्रांत अधिकारी व पोलिसांनी वेळीच दखल घेवूव उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कुऱ्हाडे यांनी केली आहे.