शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिववंदना
मनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम)
जुन्नर | छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १९) शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्माचा मुख्य सोहळा सकाळी ९ वाजता होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
विविध कार्यक्रमांमध्ये सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा होणार आहे. यानंतर पालखी मिरवणूक होणार असून, सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानाच्या वास्तुमध्ये पारंपरिक पाळणा सोहळा होणार आहे. यानंतर १० वाजता मान्यवर शिवकुंज इमारतीमधील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. या वेळी आदिवासी समाज प्रबोधिनीचे तळेश्वर पारंपरिक लोककला पथक कला सादर करणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर जाहीर सभा ओझर येथे होणार असून, या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, आमदार शरद सोनवणे यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवनेरीवरील संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत पर्यटकांना इतिहासाबरोबर जुन्नर तालुक्याची सातवाहनकालीन माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य शासनाकडे २००७ साली केली आहे. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन, संग्रहालयाचा सविस्तर प्रकल्प सादर केला. या वेळी संग्रहालयासाठी ५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले आहे. या संग्रहालयाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस या निमित्ताने करण्याची शक्यता आहे.