विज्ञान आणि कल्पना विश्वाची सांगड घालणारा ‘उन्मत्त’

सहसा शाळा म्हटलं की आपल्याला आठवतं किंवा डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे गृहपाठ, कविता, निबंध , पायऱ्यापायऱ्यांची मोठी मोठी गणितं ! पुस्तकी ज्ञानातून गंभीर धडे घेत आपण माध्यमिक शिक्षणाचा सोपस्कार पूर्ण करत असतो. पण एखादा असामान्य विद्यार्थी प्रिझम मधून पसरणाऱ्या सप्तरंगात हरवून जातो आणि रंग, रेषा, आकार ,प्रकाशाशी जिव्हाळ्याचं नातं जोडतो. शालेय जीवनापासूनच छायाचित्रण कला छंद म्हणून जोपासणारा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचा सुपुत्र इंद्रनील नुकते आज चित्रपटविश्वात आपलं विशेष स्थान निर्माण करतो आहे.

विज्ञान आणि कल्पना विश्वाची सांगड घालणारा ‘उन्मत्त’ हा आगळावेगळा सायफाय जॉनर चा मराठी सिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अर्थात चलतछायाचित्रण इंद्रनीलने केले आहे. औपचारिक शिक्षणात कधीच न रमलेल्या इंद्रनील चा कल कायम पुस्तकाबाहेरील अवांतर गोष्टींमध्येच होता. कराटे, किकबॉक्सिंग, स्केटिंग, रायफल शूटिंग, बाईक रायडिंग अशा साहसी आणि वेगवान खेळांमध्ये हा रमणारा विद्यार्थी त्याच्या कलात्मक नजरेतून चालत्या बोलत्या आकृत्या कॅमेऱ्यात टिपण्याची संधी शोधत होता. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याला एक संधी मिळाली. धुळे येथे बालभवन द्वारा आयोजित फोटोग्राफीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत त्याने आशिष भट्टाचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली कॅमेऱ्याशी आपलं नातं जोडून घेतलं. मयूर शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या उदय तोरवणे सरांनी इंद्रनीलला कायम प्रोत्साहनच दिलं. औपचारिक शिक्षण घेण्याचा आग्रह आई-वडिलांनी केला मात्र इंद्रनीलच्या सृजनशीलतेला कधीच रोखलं नाही.
स्थिरचित्रण करत असतानाच सिनेमाचेही वेड भिनत गेलं आणि त्याच अभ्यासाचे वेध लागले.. शालेय शिक्षण संपलं आणि पुढे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. तिथे काही सूर गवसेना. मग पुन्हा औपचारिक उच्च माध्यमिक शिक्षण … पुढे बीसीए पदवी.. त्याच्यातला कलावंत अस्वस्थ होऊन मनातलं कवडसे पकडायला पुणे मुक्कामी आला. लाईववायर्स संस्थेत फिल्म मेकिंग चे प्रशिक्षण घेतले. त्यादरम्यान डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या सिनेमाच्या महत्वपूर्ण बाबींचा सखोल अभ्यास केला. आणि ‘कॅमेरा रोलिंग… ऍक्शन’ असा अनोखा प्रवास सुरू झाला.. वेगवेगळ्या प्रयोगांमधून शिकता शिकता काही शॉर्ट फिल्म्स, कॉर्पोरेट फिल्म्स , जाहिरातींसाठी सिनेमॅटोग्राफी केली. FTII मध्ये सलग दोन वर्षे असिस्टंट म्हणून काम केलं.
‘ब्लू जीन ब्लू’ या नितीन महाजन दिग्दर्शित सिनेमाच्या निमित्ताने चित्रपट सृष्टीत डीओपी म्हणून पहिलं पाऊल टाकलं . आणि आता उन्मत्त हा विज्ञान आणि कल्पना विश्वाची सफर घडवणारा Sci Fi चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. श्वास रोखून धरायला लावणारा छाया-प्रकाशाचा उत्तम खेळ, अंधार, भय, विज्ञानाधिष्ठित तरीही अकल्पित चित्रं घनगंभीर शैलीतून आपल्या समोर येत आहेत.. स्लीप पॅरालिसिस या मनोवस्थेभोवती गुंफलेल्या या कथेत प्रत्येक दृश्य परिणामकारक घडवण्यासाठी ची इंद्रनील ची आणि स्वराजची धडपड या सिनेमाला उच्च सिनेमॅटिक व्हॅल्यू देणारी ठरते. कुशलतेने रचलेल्या नियंत्रित वातावरणात अनिश्चिततेला असं वाढवलं – फुलवलं गेलं आहे की या सिनेमॅटिक मांडणीचं कौतुक शब्दातीत होऊन जातं. कमी प्रकाशात शूट केलेला हा गडद छटेचा सिनेमा कधी थरारक भयपट ही वाटतो. गोडगुलाबी गोष्टींचा लवलेश ही नसलेला उन्मत्त भरपूर व्हिज्युअल इफेक्ट्सच्या आधारे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाटेवरून आगळ्या वेगळ्या कल्पना विश्वाची सफर घडवतो. मराठी चित्रपट विश्वातला हा अभिनव प्रयोग आहे.
चित्रपट हे संवादाचे माध्यम आहे. यात महत्वपूर्ण भूमिका बजावते; ती सिनेमॅटोग्राफी! यालाच ‘डायरेक्टर ऑफ फोटाग्राफी’ असंही म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम महत्त्वाची असते. यासाठीचं संयोजन, प्रकाश योजना आणि अर्थातच कॅमेऱ्यातून जे काही निवेदन केलं जातं, त्यात कस लागतो; तो सिनेमॅटोग्राफरचा! म्हणजेच दिग्दर्शकाला जे काही अभिप्रेत आहे ते सिनेमॅटोग्राफर पडद्यावर मांडतो. याचाच अर्थ प्रेक्षक चित्रपटात जे काही पाहतात; त्यात कल्पकता असते, ती सिनेमॅटोग्राफरची!
असं हे वेगळ्या धाटणीचं; पण कल्पकतेचं क्षेत्र निवडून स्वतःच्या आवडीलाच व्यवसाय म्हणून स्वीकारताना इंद्रनीलला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करत त्यातून प्रभावी कलाकृती उभी करण्यासाठी सतत ज्ञान संपादित करत राहणं गरजेचं ठरतं. “उन्मत्त सिनेमाचं काम करताना ‘जुगाड’ करण्याची प्रवृत्ती अनेक ठिकाणी कामी आली. स्कूबा किट शिवाय अंडरवॉटर शूट – पाण्याखालील दृश्य चित्रीत करणं आव्हानात्मक काम होतं. लो बजेट सिनेमा असला तरीही आतापर्यंतच्या प्रयोगांमधून अनुभवातून अनेकविध धाडसी प्रयोग शूट दरम्यान करता आले. दिग्दर्शक महेश राजमाने यांच्या मनस्वी स्वभावामुळे मुक्त पद्धतीने काम करता आलं. सतत उत्साही स्वभावाच्या राजमाने सरांनी वेगवेगळ्या प्रयोगांना कायम प्रोत्साहनच दिले. याचाच परिणाम म्हणून आर्थिक समस्यांवर मात करत दर्जेदार काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. संपूर्ण टीमचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं. ”
धुळे ते चित्रपटसृष्टी वाया पुणे हा एका बंडखोर विद्यार्थ्याचा प्रवास आगामी पिढीसाठी आशेचा किरण ठरू शकतो. सतत पुस्तकी अभ्यासाचा धोशा लावणाऱ्या शिक्षणपद्धतीवर इंद्रनील टीकाच करतो. स्वतःचं पॅशन मनापासून जगणारा हा अवलिया म्हणतो की “टक्के बिक्के काही नसतं.. केवळ औपचारिक शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे…. मीे जे करतोय ते मनापासून करतो. यातही खूप अभ्यास आहे. मी सतत शिकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असतो.”
” सिनेसृष्टीच्या मृगजळाच्या दिशेने धावताना आई वडीलांनी माझ्यावर दाखवलेला संपूर्ण विश्वास आणि त्यांचा खंबीर पाठिंबा महत्वपूर्ण ठरला .”
” ‘ब्लू जीन ब्लू’ चा प्रवास खूप समाधान कारक होता, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने भारावून गेलो होतो. उन्मत्त ला ही असाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.” – इंद्रनील.
ब्लू जीन ब्लू आणि उन्मत्त हे दोन्हीही वेगळय़ा जॉनरचे चित्रपट! एक तरुणाचं अस्वस्थ जीवन दाखवणारा , तर दुसरा विज्ञान आणि कल्पना विश्वाची सफर घडवणारा. साहजिकच यातील फ्रेम अन् फ्रेम वेगळी. पण यातून दिसते ती इंद्रनील ची कल्पकता!
अभ्यासू वृत्तीचा इंद्रनील चित्रपटसृष्टीत पदार्पण करतानाच दर्जेदार कलाकृती आपल्यासमोर ठेवतो. आणि यामुळेच प्रेक्षक आणि सिनेसृष्टीही इंद्रनील कडून मोठ्या अपेक्षा ठेवणार हे नक्की!.
उन्मत्त च्या निमित्ताने सिनेमॅटोग्राफर इंद्रनील नुकते ची सिनेसृष्टीमधील ही अनोखी सुरुवात चर्चेचा विषय ठरतेय यात शंका नाही.
उन्मत्त हा सिनेमा इंद्रनील च्या सिनेमॅटोग्राफी कारकिर्दीतला महत्वपूर्ण टप्पा यशस्वी ठरो याच सदिच्छा.

शब्दांकन – अमृता प्रकाश.

Read more...
Open chat