‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याच्या खा. कोल्हे यांच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद

‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याच्या खा. कोल्हे यांच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद

सजग वेब टीम, पुणे 

पुणे | पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यात आदिवासी क्षेत्रात विशेषतः भिमाशंकर अभयारण्यात अनेक दुर्मिळ व औषधी वनस्पती आहेत. या वनौषधींचे जतन करण्याबरोबरच लागवड आणि संशोधन करण्यासाठी बराच वाव आहे. त्यामुळे लोकसभेत प्रवेश केल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात भिमाशंकर अभयारण्यालगत ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच लॉकडाऊन काळात (दि. १९ मे रोजी) या संदर्भात आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना रीतसर पत्र पाठवले होते.

डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) यांच्या रिजनल कम फॅसिलिटेशन केंद्र (RCFC), मध्य विभाग यांना राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य वन संशोधन संस्था (SFRC), पोलीपठार, जबलपूर, मध्यप्रदेश यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी डॉ. कोल्हे यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रा’च्या मागणीबाबत केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले असून पुढील काळात आपण या ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रा’च्या उभारणीसाठीचा सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.

Read more...

सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मिळणे हा महिलांचा अधिकार – निकिता गोरे

सॅनिटरी पॅड्सचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यासाठी औरंगाबादच्या कन्येचा न्यायालयात लढा

सजग आरोग्य

“सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स कर सवलतीत व स्वस्त दरात मिळावेत जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांना देखिल ते वापरता येतील”

मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनासाठी आवश्यक सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मिळणे हा महिलांचा अधिकार आहे, त्यामुळे भारतात आणि जगभर “सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स कर सवलतीत व स्वस्त दरात मिळावेत जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांना देखिल ते वापरता येतील” अशी मागणी होत असते. कोरोना पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर देशभर श्रमिक/श्रमिक कुटुंबातील महिला शहरीभागाकडून त्यांच्या मूळगावी चालतं जातं होत्या,
“काही महिलांना पाळीतर आलीच असेल, त्यांच्या कडे मध्यम वर्गीयां सारखे सॅनिटरी पॅड तर नसतीलच, त्या आपल्या तयारीने काही जुने फडके घेऊन निघाल्या असतील. पाळी मध्ये सतत चालण्याचा त्यांचा हा त्रास किती वेदनादायी असेल ? फडंक बदलायला कुठे आडोसाही मिळत नसेल ? अशा परिस्थितीत त्या मैलो चालत आहेत, ही स्थिती स्त्रीसाठी फार अस्वस्थ करणारी असते, याचा आरोग्यावरही परिणाम होतो. योनीत संक्रमनाचीही शक्यता असते” यासर्व प्रश्नांकडे संवेदनशील स्त्री म्हणून पाहतांना काय करता येईल ? याविचारा सोबत, मे २०२० ला आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, यांत “सॅनिटरी नॅपकिन्सना अत्यावश्यक वस्तू घोषीत करून रेशनिंग दुकांनमध्ये अत्यावश्यक वस्तूंसोबत पुरवठा करण्याचे आदेश मिळावेत, जेणेकरूण ग्रामीण व आदिवासी भागांतील गरीब महिलांना उपलब्ध होतील”

‘मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन’ या अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या विषया बाबती स्कॉटलंड या देशाने मात्र जगासमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. स्कॉटलंड जगातील पहिला देश आहे ज्याने, सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मोफत देण्याबाबत दि.२३ एप्रिल २०१९ रोजी स्कॉटिश पार्लमेंटमध्ये यासाठी “पिरिएड्स प्रॉडक्ट प्रोव्हिजन” बिल मांडल. हे बिल त्वरीत संमत होऊन त्याची अंमलबजावणी प्रक्रिया देखिल, स्कॉटलंड मधील सार्वजनिक ठिकाण जसं की, शाळा-कॉलेज, सिनेमागृह, बस स्टँड, रेल्वेस्टेशनस इत्याद ठिकाणी वेन्डिंग मशिन्स द्वारे उपलब्ध करून झाली आहे. आपल्या देशात देखिल अशाच धोरणाची मांडणी होऊन-योग्य अंमलबजावणी होईल तो समस्थ भारतीय महिलांसाठी सुदिन म्हणावा लागेल.

निकीता गोरे, औरंगाबाद.

Read more...

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे सहवासितही पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई, दि.१० | पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ५९१ प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

Read more...
Open chat