शाश्वत संस्थेच्या विधायक कामाला समाजधुरितांनी भौतिक हातभार लावावा – बाळासाहेब कानडे

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

आजच्या काळात शिकलेले पालक आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून धडपडतात,पण शिक्षणाचा गंधही नसलेल्या कातकरी पालकांच्या मुलांना शाळेत आणणे व टिकवणे हे जोखमीचे कार्य शाश्वत संस्था विधायक कार्य मनोभावे करते,त्यांच्या या शैक्षणिक सामाजिक कार्यास समाजधुरीनांनी भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन हातभार लावावा .”असे प्रतिपादन राज्यपुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब कानडे गुरुजी यांनी केले.
शाश्वत संस्था मंचर संचालित आंबेगाव तालुक्यात आदिवासी डोंगरी भागातील वनदेव विद्यामंदिर आघाणे(ता. आंबेगाव) येथे ई-प्रशाला यांच्या सामाजिक-शैक्षणिक उत्तरदायित्व निधीतून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेला तीस हजार रुपये किंमतीचा एलईडी ई-लर्निंग प्रोजेक्टर संच प्रदान करण्यात आला.यावेळी कानडे गुरुजी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे ह्या होत्या.याप्रसंगी सानेगुरुजी कथामालेचे कार्यवाह चांगदेव पडवळ,विकास कानडे,संतोष थोरात,आदर्श शिक्षक मंगेश बुरुड,अरुण पारधी,विकास ठुबळ,अधिक्षक अक्षय खाडे,सुरेखा हेलम व विद्यार्थी उपस्थित होते.
शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे म्हणाल्या की ”आदरणीय कुसुम ताईंनी सुरु केलेले हे काम खूप इतरांना प्रेरणादायी आहे.या संचाचा फायदा शाळेतील ८८ विद्यार्थ्यांना होणार असून यामुळे आनंददायी शिक्षण मिळणार आहे.सर्व वर्ग विनाअनुदानित असून दानशूर देणगीदार व स्वंयसेवी संस्था यांच्या आर्थिक सहकार्यावर शाळा चालु आहे.
आदर्श शिक्षक मंगेश बुरुड म्हणाले,”आदिवासी भागातील विदयार्थ्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने ई-प्रशाला ठाणे यांनी ई-लर्निंग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिलेले योगदान खरोखरच प्रभावी व उल्लेखनीय आहे.आदिवासी,कातकरी जनतेसाठी कार्य करणारी शाश्वत संस्थेमुळे मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.
ई-लर्निंग प्रोजेक्टर संच मिळणेकामी ई-प्रशाला ठाणे टीमचे प्रमुख प्रमोद शिंदे,इंजिनियर दिपक वितमल यांच्याकडे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनिषा कानडे यांनी पाठपुरावा केला.यावेळी आदिवासी शाळेतील मुलांसाठी ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने खाऊ वाटप करून सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेछा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक विकास कानडे व आभार अरुण पारधी यांनी मानले.

Read more...
Open chat