‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके
‘आंबा’ पिकाची विमा मुदत ३० जून पर्यंत करावी – आ.अतुल बेनके
– “निसर्ग” वादळ आढावा बैठक
सजग वेब टिम, जुन्नर
पुणे | “निसर्ग” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी, विविध खात्याचे प्रमुख अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील सर्व खासदार, आमदार यांच्यासोबत कौन्सिल हॉल, पुणे येथे आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत आमदार बेनके यांनी जुन्नर तालुक्यातील संपुर्ण आढावा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर त्यांनी काही प्रमुख मागण्याही या बैठकीत मांडल्या.
– पीकविमाबाबत एक पत्र उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले होते.
त्यात प्रामुख्याने आंबा पिकाबाबत एक महत्वाची मागणी करण्यात आली होती. जुन्नर तालुक्यातील आंबा हा जून मध्ये म्हणजे थोडा उशिरा चालू होतो त्यामुळे आंबा या पीकाची विम्याची मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. हि मागणी आजच्या बैठकीत शासनाने मान्य करून त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे
– तसेच या वादळाच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यासाठी एक अतिरिक्त केरोसीन टँकर ची मागणी करण्यात आली आहे.
– आदिवासी भागातील बाळहिरडा या पिकाचाही नुकसान भरपाईसाठीच्या पिकांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.
– आदिवासी भागातील आणि इतर भागातील घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते लवकरात लवकर सादर करावेत, घर खासगी असो किंवा सरकारी पंचनामा झाले असेल तर ते मदतीस पात्र असेल असे बेनके यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
अशा नैसर्गिक आपत्तीवेळी राज्य शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना शासनाकडून तातडीने मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिले आहे.