कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण व तपासण्या वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण व तपासण्या वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

सजग वेब टीम,  पुणे

पुणे(दि.१०) | पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही श्री पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे शक्य होईल. टाळेबंदीच्‍या शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे योग्य अंतर राखणे, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रीत करून अधिक काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री पवार यांनी दिल्या.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहर तसेच लगतच्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात तसेच ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. कोरोना चाचणीसाठी स्‍राव नमुना घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी विलंब होणार नाही, याची दक्षता घ्या तसेच घरोघरी जावून करण्यात येत असलेले सर्वेक्षण वाढविण्यासोबतच यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना करून झोपडपट्टी क्षेत्रातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री मेहता यांनी दिल्या.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोना वाढीचा दर, बरे होण्याचा दर, मृत्यू दर याचा अंदाज घेत जुलैअखेर अपेक्षित असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यादृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठीचे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळत आहे, त्या संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून शहरानजीकच्या गावातील वाढता संसर्ग विचारात घेत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Read more...

सारथी संस्थेला उद्याच्या उद्याच ८ कोटींची मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल

‘सारथी’साठी सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’ राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई, (दि.१०) | मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’ला उद्याच तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन 2020-30’ हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.

‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे सांगून यापुढच्या काळात ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला इतर मागासवर्गीय विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विचार मांडले. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ‘सारथी’संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदने, पत्रे, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे, त्यांचा एकत्रित विचार करुन सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरीत मिळावे यासाठी उद्याच 8 कोटी रुपये ‘सारथी’ला उपलब्ध करुन दिले जातील. ‘तारादूत’ यांना दोन महिन्यांचा प्रलंबित निधी तात्काळ दिला जाईल. मराठा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणारी ‘सारथी’ आणि आर्थिक विकासासाठी काम करणारे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेण्यात येईल. याचाच अर्थ या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे घेतली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करुन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला  आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘सारथी’च्या आगामी वाटचालीबद्दल म्हणाले की, ‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेकडून होणारा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. दर दोन महिन्यांनी कामाचा आढावा घेऊन, आलेल्या नवीन सूचना, कल्पना विचारात घेऊन वाटचालीची पुढची दिशा निश्चित करण्यात येईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. ‘सारथी’ची नाहक बदनामी करण्याचे प्रकार थांबवावेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही उपमुख्यमंत्र्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल तसेच या दोन्ही संस्थांची जबाबदारी स्विकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपतीं संभाजीराजेंनी निमंत्रणाचा स्विकार करुन बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Read more...

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – अजित पवार

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयाने शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई | राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलिस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल

याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Read more...

राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देणार

सजग वेब टीम, पुणे

पुणे | पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पालिकेतील विराेधीपक्ष नेते दिलीप बराटे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित हाेते.

राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्यासाठी लाेकांना 5 ते 10 किलाेमीटर पायपीट करावी लागत आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे तर अनेक ठिकाणी पाण्याअभावी प्राणी-पक्षांचा मृत्यू झाला आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याचे दाैरे करण्यास सांगितले आहे. तसेच दुष्काळ निवारण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती देखील निवडणूक आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी केली हाेती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दुष्काळी भागाचा दाैरा करीत असून दुष्काळाचा आढावा घेत आहेत. आज पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सर्व 39 नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार असे आठ लाख रुपये दुष्काळ निवारण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. याबाबत दिलीप बराटे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परीस्थिती आहे. 72 च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ माेठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मदत करणे आवश्यक आहे. पवार साहेब तसेच सुप्रियाताईंनी दुष्काळ निवारण ही सरकारबराेबरच आपली ही जबाबदारी असून दुष्काळ निवरणासाठी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची सुरुवात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Read more...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आल्यावर बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार आल्यावर बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ
– आ. अजित पवार


भाजप सरकार परत एकदा मनुवाद आणु पाहत आहे
– आ. छगन भुजबळ

मंचर | डॉ आनंद तेलतु़बंडे यांना वारंवार अटक केली जात आहे. ज्यांच्या घरात घरात पुस्तके सापडली त्या लोकांना अटक केली जात आहे पण डोंबवलीमध्ये कुलकर्णी यांच्या घरात शस्त्रसाठा सापडला त्याला तात्काळ सुटकेचा मार्ग दाखवण्यात आला. हे सरकार परत एकदा मनुवाद आणू पाहत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी मंचर येथील निर्धार परिवर्तनाच्या सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज मंचरमध्ये दाखल झाली.

बैलगाडा शर्यत चालू करणार असे आश्वासन इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र अजूनही बैलगाडा शर्यत चालू झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेत बसवा आम्ही बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ, कायद्यात काय तरतूद करायची आहे ते आम्ही बघू तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार यांनी मंचर येथील परिवर्तन यात्रेत केले. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांसाठी आ. दिलीप वळसे पाटील यांनी खासगी कारखाना काढाला. गेली पाच वर्षे सांगितले जात आहे इथे रेल्वे येणार, विमान येणार पण कधी येणार हे सांगत नाही यामुळे तुम्हा लोकांचेच नुकसान होत आहे. तुम्ही वेगळे लोक निवडून देता म्हणून हे नुकसान होत आहे. इथे साधे रस्ते नीट नाही आम्ही सरकारमध्ये आलो तर इथले रस्ते नीट करू. नाही केले तर अजित पवारला पुन्हा इथे येऊ देऊ नका असे आव्हान अजितदादा पवार यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले आहे त्यांच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पत्र पाठवले आहे.. उपोषणासाठी शुभेच्छा पत्र ..? असा सवाल देखील आ. अजित पवार यांनी विचारला
आज जर शरद पवार साहेब देशाच्या राजकारणात असते आणि शेतकऱ्यांची लेकरं राज्याचा कारभार पाहत असती तर तुमच्यावर ही वेळ आली नसती असे मत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस झाले. त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. हे सरकार असंवेदनशील आहे अशी टीका आ. धनंजय मुंडे यांनी केली
मंचर मध्ये झालेल्या परिवर्तन यात्रेला माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी आपण अतिशय भाग्यवान आहोत शरद पवार यांनी या भागासाठी कधीच काही कमी पडू दिले नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेसाठी काही हजार कोटींची तरतूद केली आहे, मात्र गेल्या वर्षी एक रुपया खर्च केला नाही. मंचरच्या एसटी डेपोचे बांधकाम आघाडी सरकारच्या काळात झाले मात्र पाच वर्षात या सरकारला तिथे एक एसटीही सुरू करता आली नाही अशी टीका देखील वळसे पाटील यांनी केली. भाजप सरकार जर तुमच्यासाठी धावून येत नसेल तर या सरकारला घरी पाठवण्याची व्यवस्था करा.
विधानसभा निवडणुकीत तुम्ही जसा पाठिंबा दिला तसा पाठिंबा येत्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा द्या, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी मंचरच्या जनतेला केले
माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या भाषणात या भागात रेल्वे सुरू करण्याची घोषणा भाजपाने केली होती मात्र लोकांना अजूनही रेल्वे मिळाली नाही. अजितदादा पवार यांनी या भागात मोठेमोठे उड्डाणपूल बनवले, मुला मुलींचे वसतिगृह बनवले त्यामुळे खरी विकास हा आघाडी सरकारच्या काळात झाला असे मत व्यक्त केले.

Read more...

रात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)

रात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार

(श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)

Read more...

भाजप-सेनेच्या काळात शहरांची अवस्था बिकट झाली – कल्याणच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सरकारवर शरसंधान

कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले होते की, साडेसहा हजार कोटींचा आराखडा तयार आहे. आज तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला पण एक रुपयाही आला नाही. कल्याण-डोंबिवलीकरांना आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रचीती आली असेल. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, मात्र शहराच्या ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या मुख्यमंत्र्यांना सोडवता आल्या नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कल्याण येथील परिवर्तन सभेत केली. त्यामुळेच सरकारला उलथून टाकण्याची भावना आता संपूर्ण महाराष्ट्रात रुजू लागली आहे, असे मतदेखील पाटील यांनी व्यक्त केले.

 

कल्याण-डोंबिवली या शहरांची अवस्था भयंकर आहे. आम्ही नवी मुंबई, पिंपरी चिंचवड हे शहर उभे केले. ही शहरं उत्तम बनवली, पण ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांची भाजप-सेनेच्या सरकारने बिकट अवस्था करुन ठेवली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी परिवर्तन सभेत केली. कल्याण डोंबिवलीसाठी एमआयडीसीकडून पाणी घ्यावं लागत आहे. लोकांना इथे राहण्याची नीट व्यवस्था पाहिजे, रस्ते हवे, सबवे, स्कायवॉक हवे, पण भाजप सरकारने काहीच कामे केली नाहीत. लोकांचा भ्रमनिरास भाजप सरकारने केला आहे. म्हाडा, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको या संस्थांकडून समृद्धी महामार्गासाठी पैसे काढले जात आहेत. भाजपसरकार मतांवर डोळा ठेवून फक्त घोषणाबाजी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

हे वर्ष निवडणुकांचं आहे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. २o१४ सालीसुद्धा जनतेसमोर भाजप पर्याय म्हणून कधीच नव्हती, पण भाजपने लोकांसमोर गुजरातचे खोटे विकासाचे मॉडेल उभे केले. पंतप्रधान मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले. म्हणून भाजप सत्तेवर आलं. देशाच्या चौकीदाराच्या मनात आले आणि त्यांनी नोटा बंद करून टाकल्या. त्या नोटाबंदीमुळे आजही लोकांना झळ सहन करावी लागत आहे. नोटाबंदी मधून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लावून व्यापारी वर्गाला उद्ध्वस्त केले. त्यामुळे आता जनता जागी झाली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. आता परिवर्तन होण गरजेचे आहे. यासाठी आम्हाला संधी द्या. अजितदादांच्या नेतृत्वात इथले सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावून असा शब्द विरोधी पक्षनेता या नात्याने देतो असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी जनतेला दिले.

भाजर सरकारने जनतेच्या अपेक्षा पायदळी तुडवल्या आहेत. जनतेमध्ये निराशावादी भावना तयार झाली आहे, भाजप सरकारच्या कारभारामुळे जगात भारताची नाचक्की झाली, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण येथील सभेत केला. आज बेस्ट संपाचा ७ वा दिवस आहे. आमच्या नवी मुंबईत बसचे भाडे तीस रुपये असेल तर ठाण्यात साठ आहे. थेट तीस रुपये भाजप-सेनेचे सरकार स्वताःच्या घशात घालत आहे. पण जनतेच्या मागण्यांसाठी आता लढा उभारला पाहिजे, आम्हाला अटकेची भीती नाही, गरज असेल तर आम्हाला बोलवा, आम्ही वेळेप्रसंगी स्वताःला अटक करुन घेऊ, पण जनतेच्या मागण्या मांडू, अशी हमी गणेश नाईक यांनी दिली.

Read more...
Open chat