नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालयास मान्यता
नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालयास मान्यता
सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून होणारी गर्दी कमी व्हावी,तसेच त्या त्या भागातील स्थानिक ठिकाणी रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत या हेतूने नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालय सुरू असून त्यास सहाय्यक निबंधक यांच्याकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती यशवंती मेश्राम यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील सहकारी तत्वावर सुरू होणारे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालय हे पहिले हॉस्पिटल आहे. सहकार व पणन खात्याचे उपआयुक्त डॉ.आनंद जोगदंड यांच्या संकल्पनेतून या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.या संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ.हनुमंतराव भोसले,सचिव डॉ.रामदास उदमले हे काम पाहणार आहेत.
सध्या कोरोना म्हणजेच कोविड 19 या रोगाने थैमान घातले आहे.कोरोना बाधीत रुग्णांना उपचार मिळावेत व शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा म्हणून कोरोना बाधीत रुग्णांना उपचार देण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सहकार तत्वावर हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढती लोकसंख्या पाहता व आरोग्य विभागात होत असलेले आर्थिक शोषण थांबविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.ग्रामीण भागातील सर्व गरीब व गरजूंना अत्यल्प दरात उपचार मिळावेत हा ही एक भाग आहे.
शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालय या संस्थेमार्फत सामाजिक रोग प्रतिबंधक,अंतर्गत सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविणे,केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम चालू ठेवणे.रुग्णालयांच्या बाबतीत प्रशिक्षित नर्सेसचा तुटवडा नेहमीच भासतो म्हणून रुग्णालयासबंधी पॅरामेडिकल स्टाफ करीता प्रशिक्षण केंद्र चालविणे, नर्सिंग कोर्सेस बी.पी.एन., ऍक्युप्रेशर थेरपी, स्वच्छता निरीक्षक, डी.एम.एल.टी.हॉस्पिटल मॅनेजमेंट, पब्लिक अनहेल्थ एज्युकेशन,नर्सिंग सेवक, प्रशिक्षण कोर्सेस सुरू करणे, एम.बी.बी.एस.डेंटल, फिजिओथेरपी कॉलेज या सारख्या वैद्यकीय शिक्षण संस्था चालविणे, नागरिकांना चांगले रुग्णालय, दवाखाना अध्यापन, शास्त्रीय, वैद्यकीय तसेच शल्यचिकित्सक मार्गाने योग्य आकारात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे,नागरिकांना शैक्षणिक सवलती मिळून देणे, आपले आरोग्य कसे ठेवावे याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे,समाजात आदर्श डॉक्टर निर्माण करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षण सुलभ व्हावे व त्याच्या प्रसारासाठी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे, संलग्न कारण घेणे, चालविणे व वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग चालविणे, वैद्यकीय साहित्याचे उत्पादन , खरेदी विक्री योग्य दराने करणे असे या संस्थेचे उद्दिष्ट आहेत.
Leave a Reply