अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत
अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव (ता ११) | सध्या कोरोना विषाणूमुळे एकीकडे जगभर पसरलेला हाहाकार तर दुसरीकडे या सर्व गंभीर परिस्थितीतही धैर्याने, धाडसाने आपलं कर्तव्य पार पाडणारे आरोग्य कर्मचारी. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर सलग सात दिवस उपचार आणि त्यानंतर सात दिवसांचा विलगिकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर घरी आलेल्या आपल्या अधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून स्वागत केले. पतीराजाने केलेल्या या स्वागताने परिचारिका सविता वाजगे भारावून गेल्या.
सविता या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या सून आहेत. कळंब (ता. आंबेगाव) हे त्यांचे माहेर आहे. गेली २४ वर्षे पुण्यातील ससून रुग्णालयात
अधिपरिचारिका म्हणून त्या कार्यरत आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेचा कालावधी उरकून त्या पुणे येथे चिंचवडला राहत्या घरी आल्या. त्यावेळी पती शेखर वाजगे हे दारातच ताट घेऊन उभे असल्याचे पाहून त्या आनंदाने भारावून गेल्या. आजच्या जगभरातील या संकटकाळी आपल्या पत्नी व आईला कर्तव्य बजावण्यासाठी धैर्य आणि सकारात्मकता दाखवून भक्कमपणे पाठिंबा देणारे पती शेखर वाजगे आणि मुलगा आदित्य वाजगे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. आपल्या पतीने औक्षण करून केलेलं स्वागत पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही असे त्यांनी सांगितले.
Leave a Reply