ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट


ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीसह ग्रामविकासावर झाला संवाद

कोल्हापूर ( दि.२४ ) | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभराच्या चर्चेत या दोघांनी ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर चर्चा केली. लोकसहभागातून ग्रामविकास या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या दोघांनीही पुन्हा भेटण्याचे ठरविले आहे.

या भेटीत अण्णा हजारे यांनी मंत्री श्री मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या नवीन कायदा झाला . त्यासंदर्भात दोनच दिवसापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खाजगी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री श्री मुश्रीफ यांनीही पत्र लिहून अण्णा हजारे यांना लवकरच आपली भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्र लिहिले होते.

त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधन संपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले.

चौकट…
अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरण…..
या भेटीत अण्णा हजारे यांनी खाजगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान; कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हा कायदा करावा लागल्याचे श्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबीबाबत मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat