शरद पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे- अमोल मुजुमदार

शरद पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे- अमोल मुजुमदार

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | मुंबईचा माजी कर्णधार आणि विक्रमवीर अमोल मुजुमदारने माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी क्रिकेटमध्ये अतिशय मोठे योगदान दिल्याचे भाष्य केले आहे. मुजुमदार महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in)फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये बोलत होता.

यावेळी एका चाहत्याने त्याला ‘शरद पवार क्रिकेटसोबत खूप वर्षांपासून जोडले आहेत, त्यांच्या काही आठवणी सांगाल का?’ असा प्रश्न विचारला.

याबद्दल मुजुमदारने उत्तर दिले की ‘मी एवढेच सांगेल पवार साहेबांनी बीसीसीआयमध्ये बरीच कामे केली. मला वाटते त्यांनी पेंशन स्किम सुरु केली. ही सर्वात मोठी गोष्ट आहे जी करून त्यांनी क्रिकेटची परतफेड केली आहे. जे २००३ सालाच्या अगोदर जेवढे क्रिकेटपटू खेळले त्यांना सर्वांना या योजनेमुळे पेंशन सुरू झाली. दर महिन्याला सगळ्यांना पेंशन मिळतात. या योजनेत क्रिकेटपटूंनी खेळलेल्या सामन्यांची संख्या विचारात घेऊन त्यांची विभागणी केली आहे.त्यानुसार त्यांना पेंशन मिळते. ही पवार साहेबांची क्रिकेटसाठीची सर्वात मोठी देण आहे, असे मला वाटते.”

शरद पवारांनी २००५ ते २००८ दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच २०१० ते २०१२ च्या काळात ते आयसीसीचे अध्यक्ष होते. ते जेव्हा बीसीसीआय अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी खेळाडू आणि पंचांसाठी पेंशन चालू केली होती. अमोलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण १७१ सामने खेळले असून त्यात ४८.१३च्या सरासरीने त्याने १११६७ धावा केल्या आहेत.

Read more...

मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल, परंतु काही अटींवर- अमोल मुजुमदार

मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल, परंतु काही अटींवर- अमोल मुजुमदार

सजग वेब टिम, मुंबई

मुुंबई | अनेक वर्षे मुंबईकडून क्रिकेट खेळलेल्या अमोल मुजुमदारने मुंबई क्रिकेटमध्ये योगदान देण्याची तयारी असल्याचे भाष्य केले आहे. महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये तो बोलत होता. यासाठी त्याने काही अटीही ठेवल्या आहेत.

मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार अनेक वर्षे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. अनेकदा त्याने मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यातही महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच मुंबई संघाचे नेतृत्वही त्याने केले.

महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये काही चाहत्यांनी त्याला ‘भविष्यात मुंबई संघाला कोचिंग करायची संधी मिळाली तर करशील का?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवातीला मुजुमदार म्हणाला, “जरुर काम करायला आवडेल. पण माझ्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या तर माझे दिलोजान मुंबईसाठी हाजिर असेल.”

“माझ्या डोक्यात या संघासाठी काही कल्पना आहेत. मला जर मुंबई क्रिकेट संघटना स्वातंत्र्य देणार असेल तर मला हे काम करायला नक्कीच आवडेल. मी या सेशनमध्ये सांगु इच्छितो की मला काम करताना मध्ये कुणी आडकाठी घालता कामा नये. प्रशासनाने टांग अडवायची नाही, एवढीच माझी अट आहे.” असे तो पुढे म्हणाला.

१९९३ -९४ च्या मोसमात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या मुजुमदारला २००८-०९ नंतर मुंबई संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो आसाम आणि आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळला. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १७१ सामन्यात ३० शतके आणि ६० अर्धशतकांसह ४८.१३ च्या सरासरीने १११६७ धावा केल्या आहेत. सध्या मुजुमदार आयपीएलमधील राजस्थान रॉसल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पहात आहे.

Read more...

राज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – अजित पवार

राज्य आर्थिकदृष्टया सक्षम करण्याची ग्वाही शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’
– वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

मुंबई दि. ६ | बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने अत्यंत सोपी, सुलभ अशी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणली असून बळीराजांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज यांची थकीत रक्कम माफ करण्यासाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
आज राज्याचा सन 2020-21 वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर विधानपरिषदेत वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

आर्थिक मंदी दूर होईल हा विश्वास
आज देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. राज्य कर्जबाजारी आहे किंवा राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नाही. तरीही येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योगक्षेत्राला चालना देऊन राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. हे सांगताना श्री. पवार यांनी दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता सादर करीत सांगितले. ‘असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,क्या कमी रह गई, देखो और सुधार करो.’

बळीराजासाठी 22 हजार कोटींची तरतूद
सन 2019-20 मध्ये 15 हजार कोटी आणि सन 2020-21मध्ये 7 हजार कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. 13 लाख 88 हजार 854 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 9 हजार 35 कोटी रुपयांची रक्कम यापूर्वी अदा करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही खरीप हंगाम संपण्यापूर्वी रक्कम वर्ग करण्यात येईल. शेतकऱ्यांनी 2015-16 ते 2018-19 या कालावधीत घेतलेले व दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत खात्यावरील मुद्दल व व्याज दोन लाख रुपयांहून अधिक नाही अशी थकीत व परतफेड न झालेली रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बळीराजाला चिंतामुक्त करण्यासाठी आणखी दोन योजना

शासन शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट करून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने यापूर्वीच ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणली आहे. आजच्या अर्थसंकल्पात आणखी दोन योजना घोषित करण्यात आल्या. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधील घेतलेल्या पीक कर्ज, पीक कर्जाचे पुनर्गठित केलेले कर्ज यांचे मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता योजना’ (One Time Settlement)आणली आहे. या योजनेनुसार दोन लाख रुपयांवरील त्यांच्या हिश्‌श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यावर शासनामार्फत दोन लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. तसेच सन 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. मात्र सन 2018-19 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.

आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून शेतकऱ्यांसाठी योजना
शेतीपंपासाठी उर्वरित महाराष्ट्रात नवीन वीज जोडण्या देण्यात येणार आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पुढील 5 वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे एकूण 5 लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. या योजनेसाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून येत्या 5 वर्षात यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सन 2020-21 या वर्षासाठी 670 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

शिवभोजन थाळी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सहा महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या येाजनेत प्रत्येक केंद्रावर दररोज 500 जणांना भोजन उपलब्ध करुन देण्यात येत असून आता या योजनेअंतर्गत लाभार्थींची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. या योजनेसाठी यावर्षी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग योजनेच्या आर्थिक संरचनेत बदल करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी शासनामार्फत 8 हजार 500 कोटी रुपये उपलब्ध्‍ा करुन देण्यात आल्यामुळे व्याजावरील रक्कमेमध्ये बचत होणार आहे. या महामार्गावर कृषी समृद्धी केंद्रे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या वर्षात 4 कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येतील.

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
राज्यातील एकूण 28,006 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 4,252 ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी इमारत नाही. 1,074 ग्रामपंचायतींना सन 2020-21 मध्ये इमारत बांधणीकरिता 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना सन 2024 पर्यंत स्वत:चे कार्यालय मिळणार असून यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना
राज्यात विविध योजनांमधून जलसंधारणाची कामे होती घेण्यात आली आहेत. या योजनांमधून अधिक जलसंचय व्हावा यासाठी सुमारे 8 हजार जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विकेंद्रित जलसाठे निर्माण होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ होणार आहे. या योजनेसाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अपूर्ण सिंचन प्रकल्प कालबध्द कार्यक्रमाद्वारे पूर्ण करण्यात येणार
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याकरिता शाश्वत सिंचन हा प्रभावी उपाय आहे. राज्यात सध्या 313 प्रकल्प अपूर्ण स्थितीत आहेत. अपूर्ण सिंचन प्रकल्प कालबध्द कार्यक्रमाद्वारे पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 हजार 235 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
*महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल अर्थसंकल्प*
राज्यातील लोकसंख्येमध्ये 60 टक्क्यांहून अधिक असलेल्या महिला व बालकांसाठी प्रथमच महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल (जेंडर अॅण्ड चाईल्ड बजेट) अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. शासनाच्या उपाययोजनांचा महिला, तृतीयपंथी व बालकांना होणाऱ्या लाभाचे व संबंधित योजनांचे यामधून मूल्यमापन करता येणार आहे. राज्यातील महिला बचत गटाच्या चळवळीस गतिमान करुन महिलांना अधिकाधिक रोजगार व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासनामार्फत करावयाच्या एकूण खरेदीतील सुमारे 1 हजार कोटी रुपयांपर्यंतची खरेदी प्राधान्याने महिला बचतगटाकडून करण्याबाबत शासनामार्फत विचार होत आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणाऱ्या किमान एका महिला पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात येणार आहे.
हिरक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
राज्य स्थापनेला येत्या 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठी 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शंभराव्या अखिल भारतीय नाटय संमेलनाकरिता 10 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

जागतिक तापमानवाढ व पर्यावरण बदल यावरील उपाययोजनांसाठी तरतूद
जागतिक तापमानवाढ व पर्यावरण बदल यावरील उपाययोजनांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. नदी कृती आराखडा तयार करण्याबरोबरच पर्यावरण विभागासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वन विभागाकरिता या वर्षी 1 हजार 630 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील विविध पर्यटन कामांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद
मुंबईतील विविध पर्यटन कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

वरळीत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल
वरळी येथील दुग्धशाळेत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल उभारण्यात येणार असून यासाठी सुमोर एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पर्यटन संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्सालयाचा समावेश असणार आहे.
*पर्यटन व सांस्कृतिक कार्य* विभागासाठी या वर्षासाठी एकूण 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी
नांदेड येथील माहूरगड, बीडमधील परळी वैजनाथ, हिंगोलीतील औंढा नागनाथ, जि.हिंगोली, हिंगोलीतील नर्सी नामदेव, परभणीतील पाथरी, अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर, मिरज येथील हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 वी जयंतीसाठी सन 2020-21 करिता 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर प्रज्ञासूर्य, बोधीसत्व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या नावे अध्यासन सुरु करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवेचे बळकटीकरण
राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलून यावर्षी नवीन 500 रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 87 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी 25 कोटी रूपयांची तरतूद या वर्षासाठी करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य सेवेकरिता 2 हजार 456 कोटी रुपये आणि वैद्यकीय शिक्षणासाठी 950 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन 2020-21 व सातारा, अलिबाग व अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकंदर 996 उपचार प्रकारांचा समावेश करण्यात आला असून. आता प्राधिकृत रूग्णालयांची संख्या 493 वरून 1000 करण्यात आली आहे. पॅलिएटीव्ह केअरसंबंधी नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तर सातारा येथील पाटण येथील ग्रामीण रूग्णालय व भंडारा येथील साकोली येथे उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

प्रत्येक तालुक्यात किमान 4 आदर्श शाळा
पुढील 4 वर्षात 500 कोटी बाह्य सहाय्यित अर्थसहाय्याद्वारे प्रत्येक तालुक्यात किमान 4 अशा एकूण 1500 शाळांना आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडा विकासासाठी तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये तर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटी रुपयांवरून 25 कोटी रुपये आणि विभागीय संकुलाची अनुदान मर्यादा 24 कोटीं रुपयांवरून 50 कोटी रुपये वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. शिक्षण विभागासाठी 2 हजार 525 कोटी रुपये तर उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1 हजार 300 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना’
राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 21 ते 28 वयोगटातील 10 लाख सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना शिकाऊ उमेदवारी कायदा, 1961 मधील तरतुदीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेसाठी आगामी 5 वर्षात एकूण 6 हजार कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते विकासासाठी दोन नवीन योजना
रस्ते विकासासाठी दोन नवीन योजना करण्यात आल्या आहेत. ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात 40 हजार किमी रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर नागरी सडक योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
*अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी-*
• कोकण विभागात काजूफळ पिकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देणार.
• अश्वशक्तीच्यावरील यंत्रमागधारकांना प्रती युनिट विजेच्या अनुदानात 75 पैसे वाढ.
• कोकण सागरी महामार्गास तीन वर्षात मूर्त स्वरूप देण्यासाठी 3500 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात येणार.
• पुणे शहरात बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी 170 किमीचा रिंग रोड बांधणार. यासाठी 15 हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित.
• पुणे, पिंपरी चिंचवड मेट्रोअंतर्गत शिवाजीनगर ते शेवाळेवाडी, मान ते पिरंगुट या नवीन मार्गिका, वनाज ते रामवाडी या मेट्रोचा विस्तार चांदणी चौक-वनाज-रामवाडी-वाघोलीपर्यंत विस्तार. मेट्रोसाठी 1 हजार 657 कोटींची तरतूद.
• वसई-ठाणे-कल्याण जलमार्गावर मिरा-भाईंदर ते डोंबिवली प्रवासी वाहतूक सुरू करण्यास तत्वत: मान्यता.
• महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यातील जुन्या बस बदलून आरामदायी व सुविधादायक नवीन 1600 बस विकत घेण्यासाठी आणि बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी 401 कोटी रुपयाची तरतूद.
• दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या धर्तीवर बेंगळुरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत सातारा जिल्ह्यात 4 हजार कोटी खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करणार.
• राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करुन आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करण्यात येणार. यासाठी खाजगी उद्योजकांकडून रुपये 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून शासनाकडून येत्या काळात 1500 कोटीं रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार.
• स्थानिकांना रोजगारांसाठी आरक्षण कायदा करण्यात येणार.
• मराठवाडा वॉटरग्रीडसाठी 200 कोटी रुपये निधी प्रस्तावित.
• जल जीवन मिशनसाठी 1 हजार 230 कोटी रुपये निधी प्रस्तावित.
• पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास 2 हजार 42 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित.
• मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसिद्धीकरिता मुंबई येथे मराठी भाषा भवन बांधण्यात येणार
• वडाळा येथे वस्तू व सेवाकर भवन बांधण्याकरिता 118.16 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित.
• नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार
• न्यायालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्याकरिता सन 2020-21 करिता 911 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.
• आमदार स्थानिक निधीमध्ये 2 कोटी रुपयांवरुन 3 कोटी रुपये वाढ.
• जिल्हा वार्षिक योजनेकरिता रुपये 9 हजार 800 कोटी इतका निधी प्रस्तावित मागील वषाच्या तुलनेत रुपये 800 कोटींनी वाढ.
• सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार.
• पुणे येथे नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी 1000 निवासी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार
• मुंबई व पुणे विद्यापिठात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी 500 निवासी क्षमतेची वसतिगृहे उभारण्यात येणार
• सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता सन 2020-21 करिता रुपये 9 हजार 668 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित.
• लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळास निधी उपलब्ध करुन देण्यात येणार
• तृतीयपंथीयांचे हक्काचे संरक्षण आणि कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यात येणार, या मंडळासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद.
• आदिवासी विकास विभागासाठी सन 2020-21 करिता 8 हजार 853 कोटी रुपयांची तरतूद
• अल्पसंख्यांक विभागासाठी सन 2020-21 करिता रुपये 550 कोटी रुपयांची तरतूद
• हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी ठाणे जिल्ह्यांत मुंब्रा कळवा येथे हज हाऊसचे बांधकाम करण्यात येणार
• इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागासाठी सन 2020-21 करिता 3 हजार कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित.
• जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 मध्ये रुपये 9800 कोटी.
• जिल्हा वार्षिक योजनेमधील 3 टक्केपर्यंतचा निधी पोलिसांच्या वाहनाकरिता राखीव ठेवण्यात येणार.
• शासकीय शाळा खोल्या दुरुस्ती व अंगणवाडी बांधकामासाठी विविध योजनेमधून निधी उपलब्ध करुन देणार.
• वार्षिक योजना 2020-21 करिता रुपये 1 लक्ष 15 हजार कोटी निधी प्रस्तावित. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी रुपये 9 हजार 668 कोटी नियतव्यय. आदिवासी विकास उपयोजनेसाठी रुपये 8 हजार 853 कोटी नियतव्यय प्रस्तावित.
अर्थसंकल्पीय भाषणाची ठळक वैशिष्ट्ये : भाग- दोन
• मुद्रांक शुल्क सवलत – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र आणि पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपुर या महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क व इतर निगडीत भारामध्ये पुढील दोन वर्षांच्या कालावधीकरिता 1 टक्के सवलत
• वीज शुल्क सवलत – औद्योगिक वापरावरील वीज शुल्क सध्याच्या 9.3 टक्क्यावरून 7.5 टक्के करण्यात येईल.
• मूल्यवर्धित कराच्या दरात वृध्दी – पेट्रोल व डिझेलच्या विक्रीवर सध्या अस्तित्वात असलेल्या कराव्यतिरिक्त, अतिरिक्त 1 रुपये प्रति लिटर कर वाढ.
‘ हाच माझा देश, ही माझीच माती, येथले आकाशही माझ्याच हाती | आणला मी उद्याचा सूर्य येथे लावती काही करंटे सांजवाती || या कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करुन श्री. पवार यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.

Read more...

१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक

१३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक

संघिक गटात एसएसबी संघाला सुवर्ण पदक

सजग वेब टिम, पुणे

पिंपरी चिंचवड, दि.१३| महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पुरूषांच्या .22 50 मिटर फ्री पिस्टल गटात बीएसएफच्या एस.के घोषने 550.0, 10xगुणांसह सुवर्णपदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एस.के घोषने 550.0, 10x गुणांसह सुवर्णपदक पटकावले. एसएसबीच्या गौरव दागरने 550.0, 8x गुणासह रौप्य तर एसएसबीच्याच विक्रम शिंदेने 550.0, 7x गुणासह कांस्य पदक पटकावले.

सांघिक गटात एसएसबी संघाने 1649.0 गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात गौरव डागरने 550.0, विक्रम शिंदेने 550.0 तर प्रविण कुमारने 549.0 गुण मिळवून देत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. बीएसएफ संघाने 1616.0 गुणा घेत रौप्य पदक पटकावले. यात एस.के घोषने 550.0, रुपक मलिकने 535.0 तर विवेक चौधरीने 531.0 गुण मिळवले. सीआरपी संघाने 1588.0 गुण मिळवत कांस्य पदकाला गवसणी घातली. यात धिरेंद्र कुमार सिंगने 537.0, तुषार सिंगने 528.0 तर गौरव कुमार सिंगने 523.0 गुण मिळवले.

स्पर्धेचे पदक वितरण भारताची आंतरराष्ट्रीय नेमबाज (काॅमनवेल्थ गेम पदक विजेती) अर्जुन पुरस्कार प्राप्त हिना सिध्दु यांच्या हस्ते तसेच श्री संदीप बिष्णोई ,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पुरूष-50 मिटर फ्री पिस्टल-
1. एस.के घोष(बीएसएफ)(550.0, 10X) , 2. गौरव दागर (एसएसबी)(550.0, 8X), 3.विक्रम शिंदे(एसएसबी)(550.0, 7X)

पुरूष- सांघिक गट-
1. एसएसबी- 1649.0-(गौरव डागर 550.0, विक्रम शिंदे 550.0, प्रविण कुमार 549.0)
2. बीएसएफ- 1616.0(एस.के घोष 550.0, रुपक मलिक 535.0, विवेक चौधरी 531.0)
3. सीआरपी- 1588.0(धिरेंद्र कुमार 537,तुषारसिंग 528,गौरवकुमारसिंग 523)

Read more...

क्रीडाक्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी – काकासाहेब पवार

बाबाजी पवळे (सजग वेब टीम)

राजगुरूनगर | आपल्याकडे खेळ म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मनातला ताणताणाव दूर करण्याचे माध्यम मानले जाते. परंतु आता खेळामध्ये सोनेरी भविष्य निर्माण झाले असून क्रीडाक्षेत्रात करीयरची उत्तम संधी असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू व वस्ताद काकासाहेब पवार यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, उपप्राचार्य जी. जी.  गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, पहिलवान शिवराज राक्षे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा.तानाजी पिंगळे, प्रा.सारिका गोरे, प्रा.योगेश मोहिते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

काकासाहेब पवार म्हणाले की,  खेळात करियर करण्यासाठी खेळाचे आकर्षण असणे गरजेचे आहे.  खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या
खेळाडूंना शासकीय व विविध खाजगी कंपन्यात नोकरीची संधी उपलब्ध आहे. कुस्तीपटू राहुल आवरी याने  कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यावर महाराष्ट्र सरकारने त्याची  पोलीस सेवेत मोठ्या पदावर  नियुक्ती केली. आपणही मनातील  भीती दूर करून प्रचंड मेहनत घेऊन आपली स्वप्नपूर्ती करावी असे  आवाहन त्यांनी केले.  त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी क्रिकेट या खेळाबरोबर कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांनाही विविध लीगमुळे चांगले दिवस आले  असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा खेळाडू हवा आणि त्याच्यात खिलाडूवृत्ती हवी. खेळामुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. त्याचा आत्मविश्वास वाढतो. देशासाठी खेळण्याचा आनंद आणि अभिमानामुळे मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राच्या पर्यायाचा करियर म्हणून विचार करण्याचे आवाहन करून सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

या पारितोषिक वितरण समारंभात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६ वा क्रमांक आलेल्या सारिका खिलारे या विद्यार्थिनीचा सुमारे ५ हजार रुपयाचे नानासाहेब थिगळे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या शिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर   नेटबॉल, हॅण्डबॉल, वेटलिफ्टिंग,  अॅथलेटिकस व पावरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी  करणाऱ्या  प्रगती गोपनारायण, रोहित जाधव, अक्षय घोंगे, राजकुंवर तापकीर, केतन सांडभोर, सुरज घोगरे, अंकिता गायकवाड, ऋतुजा नाणेकर संदीप वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विशाल बांदल, प्रगती उतर्डे, प्रतीक्षा उतर्डे. एन.सी.सी.मधील प्रवीण बोरकर, चंद्रशेखर रणपिसे, मयूर सावंत, सांस्कृतिक विभागातील प्रगती गोपनारायण, विद्या ठोंबरे, पायल नेटके, हस्ताक्षर स्पर्धेत गणेश कुलकर्णी, मला आवडलेला वक्ता या स्पर्धेतील राहुल सरोदे, तसेच  कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थी असलेल्या  कृतिका गुंजाळ, वैशाली ठोंबरे, वैशाली लांडे, अभिजित बेंडाले, सीमा आरुडे, मयुरी भवारी, तेजल राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. बारावीला गणित विषयात १०० गुण मिळविणाऱ्या सिद्धेश रामाने याचाही गौरव करण्यात आला.

साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
या निमित्ताने जीमखाना विभागातील वेटलिफ्टिंग स्टँडचे उदघाटन काकासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस बी पाटील, सूत्रसंचालन प्रा. शाम खेत्रे यांनी, पारितोषिक वाचन प्रा. प्रतिमा लोणारी व प्रा. दिलीप मुळूक यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. सारिका गोरे यांनी तर आभार उपप्राचार्य जी.जी.गायकवाड यांनी मानले.

Read more...

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद 

 

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नितीन बाळसराफ प्रतिष्ठान, नालंदा अ आणि कुकडी व्हॅली संघांना विजेतेपद

सजग वेब टीम

नारायणगाव | अतुलदादा बेनके युवा मंच पुरस्कृत आणि जुन्नर तालुका फुटबॉल क्लब
(रजि. क्र. 1733/2014/पुणे)
आयोजित (जुन्नर /आंबेगाव मर्यादीत)
7अ साईड फुटबॉल चॅम्पियन्स लीग हि ३ दिवसीय स्पर्धा काल नारायणगाव याठिकाणी शिवमुक्ताई मंगल कार्यालय गार्डन च्या मैदानावर पार पडली. काल या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, यांसह नारायणगाव चे सरपंच योगेश(बाबूभाऊ) पाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, युवानेते अमित बेनके, प्रशांत खैरे, हर्षल वाजगे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

या स्पर्धेत १४ व १७ वर्षाखालील आणि खुला गट अशा पद्धतीने सामने खेळविण्यात आले.

खुल्या गटाच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यांत नितीनभाऊ बाळसराफ प्रतिष्ठान संघाने पेनल्टीशूटआऊट मध्ये स्वराज्य स्ट्रायकर्स संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर या आधीच्या उपांत्य फेरी सामन्यात अश्वथ्थ रँगलर्स या संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ४-० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीमध्ये मात्र नितीनभाऊ बाळसराफ प्रतिष्ठान संघाने बाजी मारत अश्वथ्थ रँगलर्स चा पराभव करत त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली आणि लीग टायटल वर आपले नाव कोरले.
खुल्या गटात बेस्ट स्ट्रायकर म्हणून अरविंद लेंडे, बेस्ट डिफेंडर- अमोल दोरमारे, बेस्ट गोलकिपर – प्रसनजीत सिंग आणि किरण वाजगे (संयुक्त)

दुसरीकडे १७ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक नालंदा अ,
द्वितीय क्रमांक नालंदा ब
कुकडी व्हॅली अ आणि कुकडी व्हॅली ब या संघांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवले. यागटात बेस्ट स्ट्रायकर – पृथ्वी बाणखेले, बेस्ट डिफेंडर –
समर्थ काजळे, बेस्ट गोलकिपर – वेदांत भालेराव

तसेच १४ वर्षाखालील गटात
प्रथम क्रमांक – कुकडी व्हॅली
द्वितीय क्रमांक – नालंदा
तृतीय क्रमांक – ब्लूमिंगडेल
या संघांनी यश संपादन केले.
यागटात बेस्ट स्ट्रायकर – सक्षम लोहोटे , बेस्ट डिफेंडर –
आयुष कुटे, बेस्ट गोलकिपर – सुयश हुलवळे

या स्पर्धेच्या नियोजनात्मक कामात प्रशांत बेलवटे, तुषार कोऱ्हाळे, संतोष कोल्हे, किरण वाजगे, राहुल पापळ, सचिन सुर्वे, विक्रांत खर्गे, मोहनिष दळवी, योगेश गांधी, सुजित कोऱ्हाळे, ओंकार मेहेर, माणिक मावळे, निलेश जंगम, सुब्बो सरकार, उत्कर्ष घोरपडे, गोवर्धन देशमुख, प्रशांत रोकडे, हर्षल पोहरे यांनी प्रामुख्याने काम पाहिले तर समालोचक म्हणून अनिकेत वाजगे, काझी सर यांनी काम पाहिले.

Read more...

नारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन

 

नारायणगाव येथे सेव्हन अ साईड फुटबॉल लीग चे आयोजन

सजग वेब टीम

नारायणगाव | अतुलदादा बेनके युवा मंच यांच्या वतीने जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशन, पुणे आयोजित सेेव्हन अ साईड फुटबॉल लीगचे आयोजन, नारायणगाव येथील शिवमुक्ताई मंगल कार्यालय मैदानात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी पहिल्या सामन्याची नाणेफेक करून सामन्यांना सुरुवात करून दिली. या सामन्यांमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला आहे. या संघांमध्ये जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील खेळाडूंचा समावेश असून सर्व संघ मालक हे जुन्नर तालुक्यातील आहेत.

या फुटबॉल लीग च्या मार्फत जुन्नर तालुका व पंचक्रोशीतील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. या वेळी “फुटबॉल या क्रीडाप्रकारामध्ये जुन्नर तालुक्यातील खेळाडू नक्कीच आपले कौशल्य आणि अस्तित्व सिद्ध करतील”,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत “खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या साठी अतुल बेनके नेहमी मदतआणि प्रयत्नशील राहील “अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या सामन्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यात खेळणारे ८ खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत.

यास्पर्धेच्या उदघाटन समारंभावेळी सुजीत खैरे, अमित बेनके, शेखर शेटे, संतोष वाजगे,विकास बाळसराफ, जयेश कोकणे, किरण वाजगे, अतुल आहेर, सुदीप कसाबे, अजित वाजगे, नारायण वर्पे, संदीपभाऊ मुळे, विलास नरवडे, विशाल बानखेले, नितीन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न

दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते संपन्न

सजग वेब टिम

सणसवाडी | आज सणसवाडी तालुका शिरुर येथील अष्टविनायक गृप आयोजित दोस्ती करंडक २०१९ क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रदिप विद्याधर कंद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन स्थानिक पातळीवरील उद्याचे चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी प्रयत्न करताना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यात सर्व प्रकारच्या खेळांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल राहण्याचा आशावाद यावेळी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच रमेशराव सातपुते, शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दत्तात्रय हरगुडे, मा सरपंच साहेबराव दरेकर, अजित दरेकर, मनसेचे उपाध्यक्ष रामदास दरेकर, मा उपसरपंच राहुल दरेकर, बाबासाहेब दरेकर, मा ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, क्रांतीवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर प्रकाश दरेकर, विजयराव साठे निवेदक अमोल दरेकर, युवा कार्यकर्ते आकाश दरेकर, सागर हरगुडे अरुण दरेकर, ग्रामस्थ तरुण युवक खेळाडू आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोस्ती करंडक क्रिकेट स्पर्धेचे नियोजनप्रमुख म्हणून सतिश दरेकर शिवसेना विभागप्रमुख, उद्योजक मच्छिंद्र हरगुडे, बाळासाहेब सैद, हनुमंत दरेकर, प्रशांत दरेकर, सुहास दरेकर, उपसरपंच नवनाथ भुजबळ, वैभव यादव, नवनाथ दरेकर, पांडुरंग दरेकर, विलास दरेकर, बाबासाहेब दरेकर, दत्तात्रय हरगुडे, गोविंद दरेकर, संपत दरेकर, संभाजी शेळके, संतोष दरेकर आदींंनी काम पाहिले.

Read more...

सचिन तेंडुलकर चे गुरू रमाकांत आचरेकर सरांचे निधन

मुंबई – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू देणारे गुरुजी रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

(more…)

Read more...

प्रणाली कोद्रे यांची महा स्पोर्ट्सच्या संपादकपदी नियुक्ती

 

पुणे, ता. २९ । देशातील पहिली प्रादेशिक स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट अशी ओळख असलेल्या महा स्पोर्ट्सच्या (mahasports.co.in) संपादकपदी प्रणाली कोद्रे यांची आज नियुक्ती करण्यात आली. महा स्पोर्ट्सला २९ डिसेंबर रोजी दोन वर्ष पुर्ण होत असून याचे औचित्य साधून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली दीड वर्ष महा स्पोर्ट्समध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर २२ वर्षीय कोद्रे यांनी आज ही सुत्रे स्विकारली. “ही एक मोठी जबाबदारी असून येत्या काळात महा स्पोर्ट्सला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असा विश्वास यावेळी कोद्रे यांनी व्यक्त केला.

महा स्पोर्ट्स ही पुणे स्थित मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट असून याची मालकी ‘डीजी राईस्टर’ (digiroister.com) या डिजीटल मॅनेजमेंट फर्मकडे आहे. महा स्पोर्ट्सबरोबरच याच वर्षी ‘डीजी राईस्टर’ने खेल कबड्डी (khelkabaddi.in) ही केवळ कबड्डी क्षेत्रावरील न्यूज वेबसाईट सुरु केली असून तिलाही क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

गेल्या दोन वर्षात महा स्पोर्ट्ने अनेक खेळांवर अतिशय सुरेख वार्तांकन केले असून सध्या दरमहा सरासरी ४० लाखांपेक्षा जास्त वाचक या वेबसाईटला प्रत्यक्ष किंवा विविध अॅपच्या माध्यमातून भेट देतात. फेसबुकवर महा स्पोर्ट्सचे ४ लाखांहून अधिक फाॅलोवर्स असून ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युबवरही वेबसाईटवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येत्या काळात महा स्पोर्ट्सने महिन्याला १ कोटी वाचकांचे लक्ष ठेवले असून जास्तीत जास्त मल्टिमीडिया स्टोरीला वेबसाईटच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे.

Read more...
Open chat