अवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त
अवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त
सजग विशेष
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या जाचाला आणि अवाजवी टारगेट्समुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे बाजारपेठेत शांतता असल्याने वरिष्ठांनी दिलेले टारगेट पूर्ण करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय या क्षेत्रातील कर्मचारी सध्या त्रासलेल्या मानसिकतेतून जात असल्याचे दिसत आहे.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक संस्था सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. यात जास्तीत जास्त झिरो बॅलन्स खाती उघडणे व त्यांनंतर खात्यात पैसे टाकण्यासाठी ग्राहकांना फोन कॉल्स, ई मेल्स आणि इतर मार्गाने त्रस्त करणे. वरिष्ठांनी दिलेली टारगेट्स पूर्ण करण्यासाठी कर्मचारीही या पद्धतीने ग्राहकांना सातत्याने त्रास देत आहेत. सुरुवातीला ग्राहकांना वेगवेगळी अमिष दाखवून खाती उघडून त्यांनंतर पैसे टाकण्यासाठी व इन्शुरन्स काढण्यासाठी परावृत्त केले जात आहे.
नोकरवर्गाला अवाजवी टारगेटस् देणे त्यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना खोट्या पॉलिसी विकणे, योजनेची पूर्ण माहिती न देणे, आरोग्य विमा लाईफ इन्शुरन्स विकणे अशा गोष्टी सध्या घडत आहेत.
मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) यासारख्या योजनांसाठी रोज रोज ड्राईव्ह घेतले जातात. यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) करा असे सांगतो आणि त्यानंतर ग्राहक कुठलाही चार्ज न देता ठेव काढून घेऊ शकतो असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र नियमावली, अटी आणि शर्थी वेगळ्या असतात.
सध्या मोबाईल नंबर खात्यांना लिंक झाल्याने अडाणी किंवा वृद्ध माणसांच्या मोबाईलवरून विमा किंवा खाते उघडणे असेही प्रकार होत आहेत. अशा अनेक क्लृप्त्या लढवून कर्मचारी आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यातून ग्राहकांना आणि स्वतः कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरी जाऊन टारगेट्सची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्राहकांनी या कोरोना संकटाच्या काळात अशा वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक योजनांची माहिती घेऊनच व्यवहार करावेत अशी सूचना या क्षेत्रातील तज्ञांनी दिल्या आहेत.
वरिष्ठांच्या जाचामुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावातून जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरही मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.
या कंपन्यांच्या वरिष्ठांनी या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.