कांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात
कांदा निर्यातबंदी चा निषेध, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत – बाळासाहेब थोरात
सजग वेब टीम, मुंबई
मुंबई | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार निषेध व्यक्त केला आहे. राज्यात ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलने करण्यात आली.
कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाचे खूप नुकसान झाले. त्याला ग्राहक नव्हते. तो माल घरी पडून राहिला, सडला आणि संपला. महापुराचं संकट असेल चक्रीवादळ संकट असेल किंवा अतिवृष्टीचं. या सगळ्या संकटाला शेतकरी तोंड देत आहे. राज्यशासन शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतंय. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारची यामध्ये साथ नाही.
मध्यंतरी केंद्र सरकारने काही कारण नसताना दूध भुकटीच्या आयातीचा निर्णय घेतला. हजारो टन दूध भुकटी राज्यात आणि देशात पडून असताना आयातीच्या घेतलेल्या निर्णयाने दुधाचे भाव कोसळले. आता केंद्र सरकारने निर्णय घेतलाय कांदा निर्यातबंदीचा. चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याची वेळ आली की केंद्र सरकारने त्यावर घाला घातलाच म्हणून समजा. कालच्या या निर्णयाने कांद्याचे भाव प्रतिटन ७००-८०० रुपयांनी घसरले.
कांदा निर्यातबंदीचा परिणाम म्हणजे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलाय. त्याच्या मनामध्ये चीड निर्माण झालीये आणि ही चीड त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्धची आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. आणि म्हणूनच काँग्रेसजनांनी आंदोलनाचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्याकरीता शेतकऱ्याबरोबर हे आंदोलन सुरु राहील आणि ही निर्यातबंदी उठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा आमचा निर्धार आहे असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply