आरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य
आरोग्य सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्थेचे प्रशासनाला मोलाचे सहकार्य
वारुळवाडी | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत वारूळवाडी परिसरामध्ये आज आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासंबंधीची प्रशासकीय नियोजन बैठक काल वारूळवाडी याठिकाणी पार पडली होती.
आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षक वर्ग, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी व उपकरणे यासंबंधीचे नियोजन काल करण्यात आले.
या सर्वेक्षणासाठी ‘आम्ही वारुळवाडीकर’ या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या या अभियानामध्ये संयुक्त जबाबदारी म्हणून प्रशासनाला अपुऱ्या पडणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी विविध पातळीवर सहकार्य केले जात आहे. यामध्ये वाहनांची व्यवस्था आणि संशयित रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था व वारूळवाडीतील प्रत्येक भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी या संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मोलाची मदत करण्यात येत आहे.
संस्थेचे १०० स्वयंसेवक प्रशासनाला सर्वेक्षणाच्या कामात मदत करत आहेत. या आरोग्य सर्वेक्षण अभियानास वारूळवाडीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे. संस्थेच्या या सामाजिक कामाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘आम्ही वारूळवाडीकर’ संस्था आपले कर्तव्य पार पाडत आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे संस्थेचे कार्यकर्ते सतेज जयसिंग भुजबळ व भाऊ वारुळे यांनी सांगितले आहे.
Leave a Reply