अवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त

अवाजवी टारगेटस् आणि वरिष्ठांच्या जाचामुळे खासगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी त्रस्त

सजग विशेष

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या जाचाला आणि अवाजवी टारगेट्समुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे बाजारपेठेत शांतता असल्याने वरिष्ठांनी दिलेले टारगेट पूर्ण करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय या क्षेत्रातील कर्मचारी सध्या त्रासलेल्या मानसिकतेतून जात असल्याचे दिसत आहे.

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक संस्था सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. यात जास्तीत जास्त झिरो बॅलन्स खाती उघडणे व त्यांनंतर खात्यात पैसे टाकण्यासाठी ग्राहकांना फोन कॉल्स, ई मेल्स आणि इतर मार्गाने त्रस्त करणे. वरिष्ठांनी दिलेली टारगेट्स पूर्ण करण्यासाठी कर्मचारीही या पद्धतीने ग्राहकांना सातत्याने त्रास देत आहेत. सुरुवातीला ग्राहकांना वेगवेगळी अमिष दाखवून खाती उघडून त्यांनंतर पैसे टाकण्यासाठी व इन्शुरन्स काढण्यासाठी परावृत्त केले जात आहे.

नोकरवर्गाला अवाजवी टारगेटस् देणे त्यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना खोट्या पॉलिसी विकणे, योजनेची पूर्ण माहिती न देणे, आरोग्य विमा लाईफ इन्शुरन्स विकणे अशा गोष्टी सध्या घडत आहेत.

मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) यासारख्या योजनांसाठी रोज रोज ड्राईव्ह घेतले जातात. यामुळे नोकरवर्ग ग्राहकांना मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD) करा असे सांगतो आणि त्यानंतर ग्राहक कुठलाही चार्ज न देता ठेव काढून घेऊ शकतो असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र नियमावली, अटी आणि शर्थी वेगळ्या असतात.

सध्या मोबाईल नंबर खात्यांना लिंक झाल्याने अडाणी किंवा वृद्ध माणसांच्या मोबाईलवरून विमा किंवा खाते उघडणे असेही प्रकार होत आहेत. अशा अनेक क्लृप्त्या लढवून कर्मचारी आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यातून ग्राहकांना आणि स्वतः कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या घरी जाऊन टारगेट्सची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्राहकांनी या कोरोना संकटाच्या काळात अशा वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूक योजनांची माहिती घेऊनच व्यवहार करावेत अशी सूचना या क्षेत्रातील तज्ञांनी दिल्या आहेत.

वरिष्ठांच्या जाचामुळे अनेक कर्मचारी मानसिक तणावातून जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरही मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.
या कंपन्यांच्या वरिष्ठांनी या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read more...

फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे

फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | ”कोरोनाच्या संकटानंतर अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतमाल साठवणूक व जलद वाहतूक या गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केले आहे. जुन्नर तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृहे व सहकारी तत्वावर फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग पुढील पाच वर्षात सुरू करण्याची गरज आहे. शेतमालाच्या जलद वाहतूकीसाठी
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आराखड्यात जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी चार ठिकाणी शेतमालवाहतूक रॅकची व्यवस्था केली आहे. ज्या पद्धतीने या प्रकल्पाचे सध्या काम सुरू आहे याच गतीने आणि वेळेत निधी उपलब्ध झाल्यास पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम २०२४ पर्यंत पुर्णत्वास येईल.”, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या भाजीपाला (तरकारी) खरेदी विक्री बाजाराचे व डिजिटल काटा पट्टीचे उदघाटन आज (ता.२५) दसऱ्याच्या शुभमहूर्तावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे होते. या वेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, उपसभापती दिलीप डुंबरे, जेष्ठ संचालक धोंडिभाऊ पिंगट, निवृत्ती काळे, धनेश संचेती, संतोष तांबे, प्रकाश ताजणे, विपुल फ़ुलसुंदर, रमेश भुजबळ, गुलाबराव नेहरकर, विनायक तांबे, माऊली खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर सन २०१८ ला तयार झाला. मात्र या प्रकल्पाचे सादरीकरण झाले नव्हते. मी खासदार झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्या नंतर या प्रकल्पाला गती मिळाली. सद्य स्थितीत ज्या गतीने या प्रकल्पावर काम सुरू आहे ते पाहता सन २०२४ पर्यंत पुणे नाशिक रेल्वे धावेल. रेल्वे प्रकल्पाचे नियोजन करताना मी शेतकरी हिताची काळजी घेतली आहे. शेतमाल वाहतूकीसाठी जुन्नर साठी दोन, आंबेगाव व खेड तालुक्यासाठी प्रत्येकी एक रॅकची तरतूद केली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी खेड ते चांडोली दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. नारायणगाव बाह्यवळण रस्ता व खेड घाटाचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेड ते आळेफाटा दरम्यानच्या इतर बाह्यवळणाची कामे लवकरच सुरु होतील. जुन्नर येथील शिवसंस्कार सृष्टीचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. या बाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समावेत बैठक झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भव्य शिवसंस्कार सृष्टी साकारली जाईल.”

या प्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणात त्रुटी आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या पैशाची हमी घेतात. या मुळे बाजार समित्या टिकणे आवश्यक आहे. सभापती काळे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत. उपबाजारामुळे भाजीपाल्याला योग्य भाव मिळेल. भाजीपाला वाहतूक चालक व मालक संघटनेच्या अडचणीही सोडवल्या जातील.

सभापती काळे म्हणाले सन २००४ साली बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५५ कोटी रुपयांची होती. मी सभापती झाल्यानंतर उपबाजार आवाराचे अत्याधुनिकरण केले. शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या. यामुळे बाजार समितीच्या वार्षिक उलाढालीत बाराशे कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नारायणगाव येथील उपबाजारात दहा हजार लिटर क्षमता असलेली जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.

कोरोना काळात उत्कृष्ट कार्य बजावणारे बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे,शरद घोंगडे, व्यापारी घोलप, कमलाकर वाजगे यांचा सत्कार आमदार बेनके, खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक तांबे यांनी केले तर आभार उपसभापती दिलीप डुंबरे यांनी मानले.

Read more...

कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके

कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घ्यावी – आशाताई बुचके

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | नेहरु युवा केंद्र पुणे भारत सरकार आणि युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मंडळ विकास कार्यक्रमांतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी व कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम ग्रामपंचायत नारायणगावच्या सभागृहात लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत नारायणगाव व नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जि.प.सदस्या आशाताई बुचके म्हणाल्या की प्रशासनासह समाजात युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था चांगले काम करत आहेत. युवकांबरोबरचं युवतींनीही समाजोपयोगी कार्यात सहभाग घ्यायला हवा. कोरोना अजुन संपलेला नाही नागरिकांनी गाफिल न राहता स्वत:ची व कुटुंबिय‍ांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

डाॅ.वर्षा गुंजाळ यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम अंमलबजावणी, जाणिवजागृती विषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानिमित्तानं संतोष नाना खैरे, आशिष माळवदकर यांनीही मार्गदर्शन करत युवा मंडळे व कोरोना काळात कौतुकास्पद कार्य करणार्‍यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वैद्यकीय अधिकारी डाॅ.वर्षा गुंजाळ, आशिष माळवदकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, सजग टाईम्स मुख्य संपादक स्वप्निल ढवळे, युवा शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक संतोष भोर, योगेश रायकर, मुन्ना काझी, दिनेश भंडारे य‍ांसह युवा मंडळ, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्तानं कोरोना काळात कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, अश्वमेघ युवा मंच, रुग्णवाहिका चालक संजय भोर, डाॅ.वर्षा गुंजाळ, डाॅ.लहु खैरे, डाॅ.प्रविण शिंदे, डाॅ.अनुष्का शिंदे, हजरत फजलशाहवली ग्रुप, आरिफ आतार युवा मंच, श्रीराम मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, केजीएन फाउंडेशन यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भोर यांनी केले. सुत्रसंचालन अशफाक पटेल तर आभार स्वप्निल ढवळे यांनी मानले.

Read more...

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप

सजग टाईम्स न्यूज, जुन्नर

जुन्नर (दि १७) | जुन्नर तालुक्यात जून महिन्यात नुकसान झालेल्या निसर्ग वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शनिवारी (दि.१७) रोजी करण्यात आले.

जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश शनिवारी प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आले. आमदार अतुल बेनके यांच्यासह जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर तहसीलदार कार्यालय याठिकाणी या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये शांताराम काशिनाथ गाढवे रु. ३०००/- ,
प्रसाद अनिल कबाडी रु.५००००/- ,
चंद्रकांत नमाजी डामसे रु. १२०००/- ,
सावळेराम रामभाऊ कारभळ रु. १२००० /- आदी शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले. इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील लवकरच नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा होईल असे आमदार बेनके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जि.प.सदस्य देवराम लांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, मा.जि.प.भाऊसाहेब देवाडे, निलेश रावते, ललित जोशी, सचिन डाके, किरण लोहकरे, भुषण ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सजगवेबटीम, पुणे 

पुणे|कोरोनाच्‍या काळात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

यावेळी सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, ज्‍येष्‍ठ पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती, ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, ‘जागृती ग्रुप’चे राज देशमुख, किरण साळी, प्रा. अक्षीत कुशल, प्रा. रामचंद्रन आदी उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्यात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्‍ण सापडला. तथापि, २६ फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्‍यावतीने राबविण्‍यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्‍यमांपर्यंत अचूक आणि तात्‍काळ पोहोचवण्‍यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्‍ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्‍हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्‍यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्‍यात येत होती. त्‍यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्‍यास मदत झाली. याबाबींची दखल घेवून हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. यापूर्वी राजेंद्र सरग यांना विश्‍व संवाद केंद्र आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २०१७ चा आद्य पत्रकार देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले. याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार, महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००४ पासून सन २००७ पर्यंत सलग ४ वर्षे प्रथम पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन २००८ चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, दक्षतातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, दैनिक रत्‍नभूमी, रत्‍नगिरी तर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन २००८ मध्‍ये प्रथम पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन २००३ चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, दैनिक गांवकरी, औरंगाबादतर्फे व्‍यंगचित्र क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल सन २००४ मध्‍ये गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन २००८ चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. परभणी येथील जनसहयोग संस्‍थेच्‍यावतीने साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन २०१२ चा ‘जननायक पुरस्‍कार देऊन सन्‍मान करण्‍यात आला आहे.
आकाशवाणी मुंबईच्‍या वतीने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्‍य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल २०१७ मध्‍ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी २०१७ मध्‍ये आयोजित अखिल भारतीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रास उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात राजेंद्र सरग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय त्‍यांनी रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. विविध दिवाळी अंकांत त्‍यांची ११ हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.

Read more...

नीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची नेहल निलेश भळगट या विद्यार्थिनीने ७२० पैकी ६७५ गुण मिळवून देशात ९३५ वा क्रमांक पटकावून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात नीट चे शिक्षण घेऊन एवढे मोठे यश मिळविणारी पहिली मुलगी ठरली आहे.
या परीक्षेसाठी कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल मधून ३५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १ व ५०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे २ विदयार्थी आहेत. यामध्ये तन्वी रामदास काळे हिला ५५५ तर वैदेही मनोहर कवडे हिला ५१४ गुण आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला होता या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जुन्नर तालुक्यात एका ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षण घेऊनही आपण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट’ परीक्षा मध्ये चांगले मार्क पाडू शकतो. त्यासाठी मोठा खर्च करून पुण्याला किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही. शिकविण्यासाठी चांगले शिक्षक व मन लावून नेटाने अभ्यास केला तर नीट परीक्षेमध्ये आपण ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही चांगले मार्क पाडू शकतो हे या मुलांनी मिळवलेल्या गुणांवरून सिद्ध झाले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शाळेचे सचिव विष्णू थोरवे, शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपल्या मुलांना चांगले गुण मिळावे त्यांना वैद्यकीय प्रवेश मिळावा यासाठी जुन्नर तालुक्यातून अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना मोठा खर्च करून पुणे या ठिकाणी पाठवत आहेत मात्र ग्रामीण भागातही चांगले शिक्षक मिळाले तर मुले अभ्यास करून चांगले गुण संपादित करू शकतात. ग्रामीण भागातील वातावरण हे अभ्यासासाठी पोषक आहे त्यामुळे पालकांनी यापुढील काळात याचा विचार करणे आवश्यक आहे.

Read more...

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक

ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑनलाईन उपक्रमांचे जागतिक पातळीवर झाले कौतुक

स्वप्निल ढवळे, सजग टाईम्स न्यूज

नारायणगाव | नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल च्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

जागतिक शिक्षक दिनानिमित्त आयोजित पाचव्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल समिट २०२० चे ऑनलाईन आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये भारत व इतर देशातील शैक्षणिक तज्ञांनी व्हर्च्युअली आपली मते मांडली. या समिटमध्ये नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल स्कूलच्या प्राचार्या उषा मूर्ती यांनाही वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मुलांचा अवघ्या वय वर्षे चार पासूनच शैक्षणिकच नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा वसा घेऊन काही नाविन्यपूर्ण उपक्रम जसे कम्युनिकेटीव लँग्वेज प्रोग्रॅम, सर्कल टाईम, फॅमिली सपोर्ट बिल्डींग अॅक्टिविटीज, कल्चरल अॅक्टिविटी, मुलांच्या गरजेप्रमाणे व अभ्यासक्रमानुसार पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी उपक्रम प्राचार्या उषा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुरू करण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण प्राचार्या उषा मूर्ती यांनी ऑनलाईन व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे केले. या उपक्रमांचे भरभरून कौतुक या समिटमध्ये करण्यात आले व ब्लूमिंगडेल प्री स्कूल ला बेस्ट स्कूल इन इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह टेक्निक इनिशिएटीव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार मिळविण्यात शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. या सर्वांनी विविध उपक्रमांच्या संकल्पनेला सत्यात उतरवले व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांच्यामधील संवादाला एक नवी ओळख करून दिली असे उषा मुर्ती यांनी सांगितले.

नवनवीन उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्थेच्या खजिनदार गौरी अतुल बेनके या मोलाचे सहकार्य व साथ देत असतात. त्यांच्या सहयोगाने व पुढाकाराने हे उपक्रम यशस्वीपणे पार पाडता येतात असेही मूर्ती यावेळी म्हणाल्या.

कोविड-१९ च्या संकटकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा लॉकडाऊन सुरु असताना मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित व्हर्च्युअल ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा दूरदर्शी निर्णय अवघ्या १५ दिवसातच ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मॅनेजमेंट व प्राचार्यांनी घेतला. आज पर्यंत त्याचे नियमित व यशस्वी नियोजन सुरू आहे. अगदी नर्सरी पासून इयत्ता १२वी पर्यंतचे क्लासेस सुरू करण्याकरिता सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालकांना सुद्धा वेळोवेळी माहिती व गरज पडल्यास ट्रेनिंग देऊन त्यांनाही नवीन ऑनलाइन शिक्षण पद्धती आत्मसात करण्यास ब्लूमिंगडेलचे प्रयत्न सुरू आहेत व त्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे अशी माहिती प्राचार्य मूर्ती यांनी ग्लोबल समिटमध्ये दिली.

आदर्श विद्यार्थी घडविणे या ध्येयाचे पुन्हा उच्चारण करत गौरी बेनके यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाच्या सहयोगाचे कौतुक केले. ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यास शाळा नेहमीच अग्रेसर राहील. शैक्षणिक पद्धतीचे स्वरूप काळानुसार कितीही बदलले तरीही ब्लूमिंगडेल पूर्णपणे हे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य रित्या घडवत राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ही ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या जागतिक पुरस्काराचा उल्लेखनीय सन्मान केला व विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे ध्यासपूर्ण कार्य संस्था नेहमीच करते असे ही मत त्यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

आदर्श विद्यार्थी घडविणे हे ध्येय समोर ठेवून संस्थेचे सर्व कर्मचारी, संचालक व व्यवस्थापन कार्यरत आहे व संस्थेच्या प्रगतीबाबत समाधानी आहोत असे गौरी बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाच्या सहयोगाचे कौतुक यावेळी त्यांनी केले. नवनवीन उपक्रम व आदर्श विद्यार्थी घडविण्यात शाळा नेहमीच अग्रेसर राहील. शैक्षणिक पद्धतीचे बदलते स्वरूप काळानुसार कितीही बदलले तरीही ब्लूमिंगडेल हे बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने घडवत राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल वल्लभशेठ बेनके यांनी ही ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या जागतिक पुरस्काराबद्दल उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या कर्मचारी, शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले आहे. बदलत्या काळात नव्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे ध्येय समोर ठेवून संस्था नेहमीच कार्यरत राहील असे मत त्यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.

Read more...

प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार

प्रशासनाने सतर्क राहावे; नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – अजित पवार

पुणे विभागातील अतिवृष्टीसह पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

सजग वेब टिम, पुणे

पुणे (दि. १६) | जिल्ह्यासह पुणे विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज विविध प्रशासकीय यंत्रणांकडून घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

दरम्यान सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, त्याचीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली.

पुणे येथील विधान भवन सभागृहाच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासह पुणे विभागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (व्हिसीव्दारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे,पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. या वादळी पावसात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तसेच घरांची पडझड, मालमत्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इतर मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Read more...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ‘कोरोना’ रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

सजग वेब टिम, पुणे

पुणे (दि. १६) | ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

दरम्यान ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-१९ ‘ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली.

यावेळी व्हिडीओप्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संजय जगताप,ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसेच राज्य शासनाने ग्रंथालय सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींना नॉन-कोवीड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी, स्थानिक आकाशवाणी केंद्र तसेच समाज माध्यमातून मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे इत्यादी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत आहे तसेच लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे होणार्‍या मृत्यूबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे असे सांगितले.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Read more...

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अंधारातच भरवला जनता दरबार

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयाबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार

जनतेला ताटकळत न ठेवता त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई दि.१६ | मंत्रीमंडळाच्या बैठकीतून वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही परंतु आलेल्या जनतेला माघारी न पाठवता बैठक संपल्यानंतर मंत्रालयाच्या बाहेर अंधारातच आलेल्या लोकांचं म्हणणं आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला असून त्यांच्या तत्परतेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार हा उपक्रम राज्यात यशस्वी ठरतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना  ‘जनता दरबार’ हा उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्यानंतर राज्यातील जनता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आपल्या समस्या घेऊन दाखल होते आहे.

बुधवारी असाच एक किस्सा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबाबतीत घडला. ४ ते ६ या वेळेत जनता दरबारात पोचता आले नाही मात्र आलेल्या लोकांना घरी परत न पाठवता रात्री उशिरा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मंत्रालयीन कामकाज संपताच मंत्रालयाबाहेरील परिसरात, भरअंधारात लोकांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

Read more...
Open chat