राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | नारायणगाव शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावातील राजे ग्रुप व गौतमभाऊ औटी मित्र परिवाराच्या वतीने मास्क, सॅनिटाईझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेले काही दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना मदत म्हणून तसेच माझ्या माणसांसाठी माझी जबाबदारी या हेतू ने औटी मळा ,दरंदाळे मळा, खेबडे मळा, गाढवे मळा या ठिकाणी सॅनिटाईझर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर कोविड योद्धा म्हणून काम पार पाडत असणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या जीवाची काळजी करतात त्यामुळे त्यांचा देखील उचित सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी अमित बोरचटे, ओंकार तांबे, वैभव तांबे, अनिकेत औटी, तेजस परदेशी, संदेश औटी, प्रवीण औटी, अमित कांबळे, प्रदीप ढोरसकर राहुल डेरे ,हर्शल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

शेतकरी विधेयकाविरोधात लोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे निदर्शने

लोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे मूक निषेध शेतकरी विरोधी विधेयक मंजूर झाल्याने निदर्शने

लोकभारती पुणे च्या वतीने आळेफाटा येथे पोलिस निरीक्षक मा. टी.वाय.मुजावर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

सजग टाईम्स न्यूज, आळेफाटा

आळेफाटा | शेतकरी आणि शेती व्यवस्था उध्वस्त करणारी तीन विधेयक केंद्र सरकारने मंजूर करून घेतली आहेत. या विधेयकाच्या विरोधात देशभर शेतकरी आक्रमक आहेत. लोकभारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनीही आंदोलनाची हाक दिलीय. जगाचा पोशिंदा संकटात आहे. अशावेळी आपण साऱ्या बळीराजाच्या लेकरांनी सोबत उभ रहाणं गरजेचं आहे.

केंद्र सरकारने कायदे न करता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करून लागू कराव्यात.या करीता लोकभारती पुणे च्या वतीने आळेफाटा चौक, शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मूक निदर्शन करून पोलिस निरीक्षक मा. टी.वाय.मुजावर साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र संपर्क सचिव प्रमोद दिवेकर, जुन्नर तालुका लोकभारती अध्यक्ष मा.खालिदभाई पटेल,जुन्नर तालुका उपाध्यक्ष महेश थोरात, पारनेर तालुका अध्यक्ष रोहिदास डोंगरे, संगनमेर तालुक्याचे अध्यक्ष अनिल शिरोळे अणे शाखा अध्यक्ष सचिन पवार,संकेत कडुसकर, संपत शिंदे, सागर जगताप,फिरोज पटेल उपस्थित होते.तुळशीदास चौगुले व जुन्नर तालुक्यातील इतर पदाधिकारी तसेच सर्व सभासद महिला आघाडी व आदी मान्यवर उपस्तीत होते

Read more...

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई (दि.२३) | आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्यचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद चे अध्यक्ष आविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, शरद कला प्रतिष्ठान चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,अभिनेते सुशांत शेलारआदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकरांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाटय सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी  शासन सकारात्मक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी तमाशा सम्राज्ञी “विठाबाई नारायणगावकर” यांच्या नावाने कल्याणकारी आर्थिक विकास महामंडळ करावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

Read more...

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी – शरद पवार

राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी – शरद पवार

सदस्यांना पाठिंबा म्हणून एकदिवसाचे अन्नत्याग करणार

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारीच अपील करायचे असल्याने दिल्लीत गेलो नाही

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई (दि.२२)| राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले आहे त्याला पाठिंबा देत आज एकदिवसाचे अन्नत्याग करत उपाध्यक्षांच्या तथाकथित गांधीगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी बील आणि मराठा आरक्षण, कांदा या व इतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन केले.

देशाच्या राज्यसभेत कृषी विषयक दोन तीन बिलं येणार होती परंतु ती बिलं लगेच येतील असं नव्हतं. यातून असं दिसलं की, ही बिलं तातडीने मंजूर करावी याप्रकारचा आग्रह सत्ताधाऱ्यांचा होता. या बिलासंदर्भात सदस्यांना प्रश्न त्यांच्या शंका आणि मतं व्यक्त करायची होती. त्याप्रकारचा आग्रह त्यांनी धरला होता. हा आग्रह बाजूला ठेवून सदनाचे कामकाज पुढे रेटवून नेण्याचा प्रयत्न असावा. परंतु सदस्यांनी हे सगळं नियमाच्या विरोधात आहे. हे पुन्हा पुन्हा सदस्य नियमांचे पुस्तक घेऊन सांगत असताना त्यांना प्रतिसाद न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने सदस्यांच्या भावना तीव्र होवून ते वेलमध्ये धावले. नियमांचा आधार घेऊन सांगत असतील तर कोणता नियम सांगत होते ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण तो विचार न करता तातडीने मतदान घेण्याचा व आवाजी पध्दतीने मंजूर करण्याचा प्रयत्न त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती असे शरद पवार यांनी सांगितले.

माझ्यासारख्याची अपेक्षा होती की,सदनाच्या प्रमुखांकडून विशेषतः उपाध्यक्षांकडून… चेअरवर होते त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची त्यांचं ऐकण्याची व त्यांना बोलण्याची संधी देण्याची. मी राज्य आणि देशाच्या विधीमंडळात व सदनात ५० वर्षापेक्षा जास्त काम केले आहे. पीठासीन अध्यक्षांकडून यापध्दतीचं वर्तन मी पाहिलं नाही. मला आणखी एका गोष्टीचा धक्का बसला की, बिहारमधील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि संसदीय पध्दतीने व लोकशाही पध्दतीचे जाणकार असताना त्यांनी त्यांच्या या विचारांना तिलांजली देण्याचे काम केले आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

सदस्यांनी आपली तीव्र भावना किंवा प्रतिक्रिया दिली तर त्यांना ताबडतोब बडतर्फ करून त्यांचे अधिकार काढले. साहजिकच त्याची प्रतिक्रिया येणारच. ते सर्व सदस्य उपाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे आत्मक्लेष करण्यासाठी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणं धरलं आहे. आतापर्यंत त्यांनी सोडलंय का माहित नाही. परंतु त्यांनी आपल्या भावना सदनात आणि सदनाबाहेर शांततेने व्यक्त केल्या आहेत.

उपाध्यक्षांनी नियमांना महत्त्व न देता सदस्यांचे मुलभूत अधिकार ठोकरले. हे करून पुन्हा जे सदस्य उपोषण करत आहेत त्यांना चहापान घेवून गेले मात्र त्या सदस्यांनी त्यांचा चहापान नाकारला. चहाला हात पण लावला नाही. त्यांचा हा गांधीगिरीचा भाग होता असं ऐकलं परंतु यापूर्वी गांधीगिरीची बेईज्जत झाली नव्हती ती त्याठिकाणी घडली आहे.

बिलावर हवी तशी चर्चा होवू शकली नाही म्हणजे होवू दिली नाही. आवाजी मताने बिलं मंजूर करण्याची वेळ आताच का आलीय असा सवालही शरद पवार यांनी केला.

काल म्हणजे सोमवारी दिल्लीत जाता आलं नाही यांचं कारण शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात राज्यसरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अपील करण्याची गरज होती. महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकमुखाने निर्णय घेतला तो जतन व टिकवला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसोबत व कायदेशीर जाणकार यांच्याशी चर्चा केली. आपणच छापलं आहे दाखवलं आहे. काल सुप्रीम कोर्टात अपील दाखल केल्याचे. अपील लवकर दाखल करण्याची आवश्यकता होती. कारण महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये या प्रश्नांसंदर्भात एकप्रकारची अस्वस्थता दिसत होती. या कारणामुळे थांबावं लागलं हे सांगतानाच मात्र संसदेचे कामकाज मी बघत होतो. राज्यसभेत कधी घडत नाही किंवा कधी बघायला मिळत नाही परंतु बघायला मिळाले असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा उत्पादन यावर बोलतानाच देशभरातील शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे त्याला आमचा नक्की पाठिंबा असेल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत नोटीस आल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मला पहिली नोटीस इन्कम टॅक्स कार्यालयाकडून आली आहे. अजून सुप्रियाला आली नाही. चांगली गोष्ट आहे. देशातील इतक्या सदस्यांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला. या नोटिसीचं उत्तर द्यावं लागेल. नाहीतर दंड असतो त्यामुळे त्या नोटिसीचं उत्तर देणार आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट केले

राज्यसभेत राष्ट्रवादी दिसली नाही असा प्रश्न पत्रकारांनी केला असता या शेतकरी बिलावर राज्यसभेत प्रफुल पटेल आणि लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे असेही सांगितले.

Read more...

खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वरदविनायक कोविड हॉस्पिटलला HNFO मशिन्स भेट

खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वरदविनायक कोविड हॉस्पिटलला HNFO मशिन्स भेट

सजग वेब टीम, शिरूर

मांडवगण फराटा | शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉ.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान यांचे वतीने मांडवगण फराटा येथील वरदविनायक कोविड हॉस्पिटल ला दोन H N F O अत्याधुनिक मशीन भेट देण्यात आली.

सदर मशिन्समुळे कोविड रुग्णांना हाय फ्लो ऑक्सिजन देण्याची सोय होणार आहे. या २ मशिन्स आज सकाळी शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कृषी व पशू संवर्धन च्या माजी सभापती सुजाता भाभी पवार व जगदंब प्रतिष्ठान चे मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, तालुका युवक अध्यक्ष सागरराजे निंबाळकर सरपंच शिवाजी कदम, दत्तात्रय फराटे, शंकरराव फराटे, आनंदराव जगताप, जगदंब प्रतिष्ठानचे अमोल हरपले, दत्ता लोखंडे, दिलीप वांझरे, तेजस झोडगे या मान्यवरांच्या हस्ते या मशीन वरदविनायक हॉस्पिटल च्या डॉ.भोसले, डॉ.पवार यांना सुपूर्त करण्यात आल्या.

या मशिनमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच उपचार मिळणार आहे त्यामुळे तात्काळ उपचार व वेळेची बचत होणार आहे. या मशिन्स उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Read more...

महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे, (दि. २०) | महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला भेट दिल्‍यानंतर त्‍यांनी प्रशिक्षणार्थ्‍यांशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे, संचालक प्रदीप देशपांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, पहिल्‍यांदाच या प्रबोधिनीला भेट देण्‍याचा योग आला. कोणत्‍याही राज्‍यात अशी संस्‍था नाही, फक्‍त महाराष्‍ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्‍यांना गुप्‍तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. येथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रशिक्षण संस्‍थेसारख्‍या सोयीसुविधा निर्माण व्‍हाव्‍यात, यासाठी राज्‍य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील.

प्रत्‍येक राज्‍यात खालपासून वरपर्यंत गुप्‍तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करु पाहणा-या शक्‍ती बॉम्‍बस्‍फोटासाठी ड्रोनसारख्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. अशा गोष्‍टींवर वेळेपूर्वी मात करणे आवश्‍यक आहे, त्‍यासाठी गुप्‍तवार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी भविष्‍यात राज्‍याची आणि देशाची सेवा करतील, अशी आशा गृहमंत्री देशमुख यांनी व्‍यक्‍त केली.

राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे यांनी संस्‍थेच्‍या प्रशिक्षणाची माहिती दिली. संचालक प्रदीप देशपांडे यांनी येथे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाच्‍या आराखड्यात काळानुरुप बदल केले जात असून राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञ, प्रशिक्षक येऊन मार्गदर्शन करत असल्‍याचे सांगितले. सूत्रसंचालन विजय पळसुले यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्‍य राखीव पोलीस बलाच्‍या कार्यालयास भेट देवून अधिका-यांशी चर्चा केली. पोलीस उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्‍यागी, समादेशक निवा जैन यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्‍पूर्वी गृहमंत्री देशमुख यांनी शहीद स्‍मारकास पुष्‍पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

Read more...

राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांचा झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल – एकनाथ शिंदे.

राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल – एकनाथ शिंदे.

राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न.

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई, (दि.१८)| राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून सुरू झालेला जयसिंगपूर पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल असे गौरोद्गार नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे आज कोविड सेंटरचा लोकार्पण प्रसंगी काढले. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटरचे लोकार्पण नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने मुंबईत झाले. यावेळी ते बोलत होते, कोणत्याही शासकीय निधी शिवाय लोकसहभागातून उभारण्यात आलेले हे सेंटर अतिशय आद्ययावत असून कोविड काळात याची खूपच आवश्यकता होती. ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना विरोधात प्रत्येकाला लढायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या संकल्पनेतील माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिलेल्या सूचना पाळून आपण कोरोना सारख्या जागतिक महामारी विरोधात यशस्वी पणे लढा उभारू असे श्री. शिंदे म्हणाले.

जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री संजय पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन तसेच शिरोळ तालुक्यातील, जयसिंगपूर परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सौजन्याने सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट सभागृह जयसिंगपूर येथे १० व्हेंटिलेटर आणि १०० ऑक्सिजन बेडच्या मोफत अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत. त्यामुळे व शहरातील व शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, दत्त साखरचे चेअरमन श्री. गणपतराव पाटील, जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाई‍क, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी.केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार अर्पणा मोरे- धुमाळ, शिरोळ पं.स.सभापती कविता चौगुले, ग. वी. अधिकारी शंकर कवितके, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व मान्यवर उपस्थित होते.

तर स्वामी समर्थ सेवा केंद्र जयसिंगपूर, दानचंद घेाडावत फामिली चॅरीटेबल ट्रस्ट जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरोळा तालुका कर्मचारी, सिध्दिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, जयसिंगपूर, डॉ. ओमप्रकाश जैन (हुबळी), उद्योजक प्रवीण इंगळे, युवराज शहा, प्रवीण बलदवा, चेतन चौधरी, दिपक चौधरी, माजी नगराध्यक्षक अमरसिंह निकम, राजेश मालू, आनंद मनियार,आयडीबीआय बँक शाखा, जयसिंगपूर अरूणा रोड गणेश उत्सोव मंडळ ३री गल्ली जयसिंगपुर विजयालक्ष्मी गणेशोत्सोव मंडळ ५वी गल्ली, जयसिंगपूर, गांधी रोड गणेशोत्वस मंडळ ७वी गल्ली, जयसिंगपूर जय भारत कला क्रिडा मंडळ ४ थी गल्ली, जयसिंगपूर, व्ही. बॉइज चौक शाहू नगर जयसिंगपूर, साई फिटनेस जिम, जयसिंगपूर, कल्याणसिंग रजपूत तसेच जयसिंगपूर नगर पालिकतील राजश्री शाहू विकास आघाडी व ताराराणी आघाडीच्या नगरसेवक/ नगरसेविका यांच्या देणगीतून हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नामुळे शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांना तातडीने आणि योग्य उपचार मिळणार आहेत.

Read more...

जुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके

जुन्नर तालुक्यात २५० कोविड बेड्स वाढविणार – आ.अतुल बेनके

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | आज कोरोना संसर्गातून बाहेर पडल्यावर प्रथमच आमदार अतुल बेनके यांनी दैनंदिन कामकाजास सुरवात केली. नारायणगाव याठिकाणी आपल्या संपर्क कार्यालयामध्ये तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड आदी अधिकाऱ्यांसमवेत आमदार बेनके यांनी आज आढावा बैठक घेतली. जुन्नर तालुक्यातील कोविड १९ च्या परिस्थिती व उपाययोजनांबाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली.

जुन्नर तालुक्यात कोविड १९ संदर्भात लेण्याद्री व ओझर येथील सेंटर अंतर्गत ७०० बेड्स कार्यरत आहेत. यामध्ये येत्या काही दिवसात आणखी २५० बेड्स वाढविण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार बेनके यांनी दिली आहे .

तालुक्यात सध्या महाराष्ट्र शासन, खासगी रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय व इतर संस्था यांच्या वतीने जवळपास १३१ ऑक्सिजन बेड्स कार्यान्वित केले आहेत. यासंदर्भात आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याची तपशीलवार माहिती उद्या उपलब्ध होईल.
तसेच चालू असलेल्या कोविड सेंटर्स मधील व्यवस्थापन, जेवण, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर विषयांसंदर्भात ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून यात सातत्यपूर्ण काम कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या पेशंट्सना प्लाझ्मा ची आवश्यकता आहे त्यासाठी एक हेल्पलाईन उपलब्ध केली जाईल. अनेक समाजसेवी संस्था यासाठी खूप चांगलं काम करत आहेत लायन्स क्लब हि संस्थाही प्लाझ्मादानासाठी चांगला कार्यक्रम राबविणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आमदार अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

ज्या व्यक्ती कोविड १९ मधून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढाकार घ्यावा व इतर रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात सहभागी व्हा प्रशासनाला सहकार्य करा. सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कुणीही आजार लपवून ठेवू नका. स्वच्छता राखा व मास्कचा वापर करा असे आवाहन बेनके यांनी यावेळी केले.

Read more...

खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट

खा.अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव ग्रामीण रुग्णालयास मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन भेट

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव | शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व बंधन बॅंक यांच्यावतीने डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटरला हाई फ्लो नझल ऑक्सिजन व मल्टीपर्पज पॅरामिटर टेस्टिंग मशीन ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे प्रतिनिधी डॉ.योगेश आगम, डॉ. मिलिंद घोरपडे, डाॅ. अभिजीत काळे, जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ.सदानंद राऊत, जगदंब प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सागर रामसिंग कोल्हे, यांच्यातर्फे आज सुपूर्त करण्यात आले.

सध्या कोविड आजाराने सर्वत्र थैमान घातले असून जुन्नर तालुक्यातील नागरिकांच्या उपचारामध्ये मदत होण्यासाठी हे अत्याधुनिक मशिन अत्यंत महत्त्वपूर्ण असून सदर उपकरणामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांसाठी हे उपकरण जीवनदायी ठरणार असून टेस्टिंग मशिनमध्ये २४ प्रकारच्या चाचण्या मोफत होणार असल्याची माहिती डाॅ.योगेश आगम यांनी दिली.

खा.कोल्हे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपून एक संवेदनशील उपक्रम समाजोपयोगी कार्य करून आपला वाढदिवस साजरा करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे .

सदर कार्यक्रमास आशाताई बुचके, सत्यशिल शेरकर, दिलीप कोल्हे , तहसिलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, बंधन बॅंकेचे मॅनेजर आदित्य मराठे, तुषार डोके, अतुल आहेर, गणेश वाजगे, आशिष हांडे, संतोष केदारी, राहुल गावडे, मुकेश वाजगे, राजु कारभळ, डाॅ.सुदाम पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते

Read more...

आदिवासी भागात सेवा देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ – अजित पवार

आदिवासी भागात सेवा देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ; मानधन २४ हजारावरुन ४० हजारावर – अजित पवार

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई, दि.१६ सप्टेंबर| राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन २४ हजारावरुन थेट ४० हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला.

‘मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पाडली.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी बहुमोल योगदान देत आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळे त्यांचे मानधनात २४ हजारावरून थेट ४० हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.

राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र रुग्णांची सेवा करताना हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

Read more...
Open chat