प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे
– पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

सजग वेब टीम, पुणे

पुणे (दि.२९) |  पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी केले.
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी. पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर,जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, आपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोत, राहुल लंगर, वैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.

पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.
यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

Read more...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – अजित पवार

सजग वेब टीम, पुणे

पुणे, (दि.२८) | कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटोक्लस्टर, चिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे यांच्यासह आजी माजी महापौर, नगरसेवक आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरीता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याचादृष्टिने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुध्दची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे कोवीड-19 रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. कोरोना चाचण्यांचे मोठ्या प्रमाणात वाढवून चाचणीमध्ये लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह किंवा संस्थात्मक विलिनीकरण केले पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण आणता येईल. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यावेळेपासून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सोई-सुविधांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

Read more...

खा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश; २९५४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा

खा.अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश; कृषी विभागाने २९५४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान केले जमा

सजग वेब टीम, पुणे

पुणे | कृषी विभागाच्या विविध योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २९५४ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरुर आदी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान थकले होते. सदर अनुदान वितरीत करण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील ठिबक सिंचन योजनेच्या ६५० लाभार्थींचे रु. १.५ कोटी, यांत्रिकीकरण (एसटी संवर्ग) ३५० लाभार्थींचे रु. १ कोटी, आंबेगाव तालुक्यातील ठिबक सिंचन योजनेतील २५० लाभार्थींचे रु. ५० लक्ष, शिरुर व इतर तालुक्यातील ठिबक व यांत्रिकीकरण योजनेच्या १००० लाभार्थींचे रु. २ कोटी इतके मंजूर अनुदान प्रलंबित होते. कोविडच्या संकटकाळात आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन डॉ. कोल्हे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांना पत्र पाठवून व प्रत्यक्ष संपर्क साधून सदर अनुदान त्वरीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार २९५४ शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर जमा करण्यात आले असून उर्वरीत २६४७ प्रस्तावातील रु. ६५० लक्ष अनुदानाची मागणी कृषी उपसंचालक, फलोत्पादन – ४, कृषी आयुक्तालय यांच्याकडे केली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

सातत्याने अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मुळातच निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. त्यातच अनुदान रखडल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनुदान जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read more...

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर

जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील दहा गावांच्या नुकसान भरपाई प्रस्तावास मंजूरी – जालिंदर बांगर

सजग टाईम्स न्यूज, बेल्हे

बेल्हे | सन २०१८ या साली जुन्नर तालुक्यातील ६ महसूल मंडळे ही दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेली होती. यासाठी राज्यसरकारने नुकसान भरपाईसाठी निधी देखील जाहीर केला होता. परंतु ६ मंडळे दुष्काळ यादीत असून देखील नुकसान भरपाई बाबत तालुका महसूल प्रशासनाने सरकारकडे प्रस्तावच न पाठवल्याने हजारो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते.

याबाबत बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी आवाज उठवून वारंवार वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. हक्काची नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ नुकसानभरपाईचे प्रस्ताव सादर करणेचे आदेश जुन्नर तहसिलदार हेमंत कोळेकर यांना दिले होते. त्यानुसार नुकतीच बांगरवाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, रानमळा, उंचखडक, आणे, आनंदवाडी, नळावणे, शिंदेवाडी व पेमदरा या १० गावांतील बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत अनुदान मंजूर झाले असून त्याबाबत कृषी अधिकारी शिरसाठ यांनी बैठक घेतली. या बैठकीत बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर, राष्ट्रवादी युवक चे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अतुल भांबेरे, कृषी सर्कल अधिकारी गंभीरे, तलाठी साळवे, तलाठी कुमावत, ग्रामसेवक सातपुते, व इतर १० गावातील प्रमुख अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नुकसानभरपाई बाबत अनुदान मंजूर झाल्याबाबत सरपंच जालिंदर बांगर यांनी आळेफाटा पोलीस निरीक्षक मुजावर, तसेच पोलीस कर्मचारी नरेंद्र गोराणे, संदीप फड, सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तर्डे तसेच इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.

Read more...

भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले! – खासदार वंदना चव्हाण

“भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले!” – खासदार वंदना चव्हाण

सजग वेेब टीम, पुणे

पुणे | स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता २८ व्या क्रमांकावर गेला आहे, असे प्रसारमाध्यमांतून वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात, महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमधून उघड झाले आहे. या वस्तुस्थितीला केवळ प्रशासनच नव्हे तर, सत्ताधारी म्हणून भाजपचे सपशेल अपयश आहे.

पुणे शहर हे मुळातच स्मार्ट शहर आहे. गेल्या १५-२० वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेसा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये देशात पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. त्यावेळी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शहरातील १४ प्रकल्पांचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उत्तम कामामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्‍लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रिट, ई- बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले. गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदां आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे.

केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही महापालिकेला सहकार्य करीत आहे. तरीही शहरासाठी नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला गेल्या दीड वर्षांत करता आलेली नाही. भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांचेही स्मार्ट सिटीकडे लक्ष नाही. तसेच पुण्यातून आमदार झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचेही स्मार्ट सिटी आणि महापालिकेतील कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पुण्याचे रॅंकिंग घसरले आहे. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या पुणे सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्‍वासघात न करता, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी.

Read more...

कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती

कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती

त्यानिमित्त गिरणी कामगारांचे नेते श्री काशीनाथ माटल ह्यांनी वाहिलेली भावपूर्ण आदरांजली

भारतीय कामगार चळवळीतीचे प्रवर्तक आणि गांधीवादी कामगार चळवळीचे अग्रगण्य आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११३ वी जयंती येत्या २१ऑगस्ट रोजी संपन्न झाली. लॉकडाऊनमुळे हि जयंती उत्सवाच्या रुपात संपन्न होणे अशक्य असताना संघटनेच्या वतीने गेल्या शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी छोटेखानी समारंभात कामगार चळवळीत नवा आदर्श निर्माण करणाऱ्या भूतकाळाला उजाळा दिला.
संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गं.द.आंबेकर यांच्या नावे विविध सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक , सांस्कृतिक,क्रीडा,सहकारी उपक्रम राबवून नव्यापिढीपुढे त्यांचे कार्य झळाळत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.दरवर्षी गिरणी कामगारा़ंच्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्य देऊन गौरविण्यात येते.गेले तीस-पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गिरणी कामगार विद्यार्थ्याना प्रिय ठरलेल्या,अशा या उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद लाभला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र राज्यस्तरीय औद्योगिक गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्काराने संबंध महाराष्ट्रात इतिहास संपादन केला आहे.ज्येष्ठ अभिनेते विजय कदम,कॉ.ए.डी.गोलंदाज,गोदी कामगार नेते डॉ.शांति पटेल,हमाल कामगार नेते डॉ.बाबा आढाव, सरकारी कर्मचारी नेते कॉ.र.ग.कर्णिक, विडी कामार नेते कॉ.आडाम मास्तर ,इंटक रेल्वे नेते राजेंद्र प्रसाद भटनागर ,कामगार नेते कॉ.विश्वास उटगी(२०२०-पुरस्कार वितरण व्हायचा आहे.) या सारख्या कामगार चळवळीत निष्ठा आणि समर्पित भावनेने संबंध आयुष्य व्यतीत करणाऱ्या कामगार नेत्यांना आंबेकरजींच्या नावे जीवन गौरव तर अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्य महानुभावांना श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करुन संघटनेने कामगार चळवळीत नवा आयाम उभा कला आहे.

उच्च शिक्षित,सधन कुटुंबात जन्मलेल्या आंबेकर यांनी होमिओपॅथीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेले. राष्ट्रपिता महात्मागांधीं आणि पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार त्यांनी हिदुस्थान मजदूर सेवक संघाने चालविलेल्या अहमदाबाद येथील संस्थेत कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण घेतले.पुढे आंबेकर यांनी सन १९३० च्या सुमारास गिरणी कामगार चळवळीत प्रवेश केला.ते दुचाकी वरुन होमिओपॅथी औषधाद्वारे कामगार वस्त्यांमध्ये कामगार सेवा करु लागले.त्या काळात १९५७ मध्ये मुंबईत हिवतापाची साथ जिवघेणी ठरलेली.आंबेकरकरजींनी कामगारांची सेवा केली. केवळ दुचाकी वरुन कामगारांच्या जखमा बांधीत गिरणी कामगार संघटना बांधणारे गं.द.आंबेकर हे संपूर्ण जगामधील दुर्मिळ कामगार नेते होत.त्यानी त्या वेळी सुरू केलेला होमिओपॅथी दवाखाना आजही कार्यालयात सुरू आहे.१९३० मध्ये स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतला.त्यांना कारावासही झालेला.

त्या काळात गिरणी कामगारांना बेमुदत संपा शिवाय काहीच मिळत नाही, हा समाज साम्यवादी कामगार चळवळीने पूढे आणलेला.पण आंबेकर यांनी प्रथम वाटाघाटी, न्यायालयिन मार्ग आणि शेवटी संपाचा मार्ग अनुसरण्याचा विचार पुढे आणला.उठसूट संपकरुन संपाचे तिक्ष्ण हत्यार बोथट होताकामानये यावर त्यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांनी प्रँक्टीकली खरा करून दाखवला.महागाई निर्देशांकाशी निगडित पगारवाढ,भविष्य निर्वाह निधी,आजरपणाची रजा,ग्रँच्युईटी आदी बेनिफिट कामगारांना मिळवून देऊन त्यांनी त्यांचे जीवनमान उंचालले.गिरणी कामगारांना चुनाभट्टी,परेल आंबेकर नगर,ठाणे येथे मालकी हक्काची घरे उभे करून देणारे त्या काळापर्यंत तरी आंबेकर हे पहिलेच कामगार नेते होत. आंबेकर हे न्यायालयात स्वतः कामगारांची अभ्यासपूर्ण बाजू मांडत.त्यांचे एक प्रतिस्पर्धी कामगार नेते कॉ.एस.ए.डांगे म्हणत,न्यायालयात फक्त आंबेकररांनी लढावे,ते खरे होते.आंबेकर यांनी अविवाहित राहून शेवटच्या श्वासा पर्यंत गिरणी कामगारांसाठी चंदना प्रमाणे देह झिजविला. त्यांनी निस्वार्थी, ध्येयवादी आणि समर्पित भावनेने संघटना उभी केली.त्यांची संघटना ७० वर्षापेक्षा अधिककाळ ताठ मानेने उभी आहे आणि त्यांचे नावही १०० वर्षे टिकून आहे,याचे कारण त्यांच्या कार्याला विधायक चळवळीचा वारसा आहे.संघाचे नेतृत्व आणि अन्य पदाधिकारी तो वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत.खरेतर आजच्या कामगार चळवळी पुढील तो आदर्श ठरावा.

– काशिनाथ माटल

Read more...

आणे येथे कालिकामाता मंदिरात देवीच्या मुकुटाची व दागिन्यांची चोरी

आणे येथे कालिकामाता मंदिरात देवीच्या मुकुटाची व दागिन्यांची चोरी

सजग टाईम्स न्यूज, आणे

आणे | आणे येथे मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कालिकामाता देवीचा मुगुट १ किलो २०० ग्रॅम मुगुट, १ तोळ्याचे मनी आणि वटयांची चोरी झाली मंदिरात चोरी झाली आहे.

मंदिराचे पुजारी साईनाथ सासवडे देवीची पुजा करुण आणि दागिने देवीला पेहराव करुण ते गाभारा व मंदिराच्या दरवाजाला लॉक लाऊन निघुन गेले. त्यानंतर संध्याकाळी ०७.३० च्या सुमारास पुजारी यांच्या काकी ज्योती सासवडे यांनी गभाऱ्याचा दरवाजा उघडल्या नंतर त्यांना देवीच्या डोक्यावर मुगुट नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मंदिराचे पुजारी साईनाथ सासवडे यांना सांगितले असता मंदिरात चोरी झाल्याचे समजले.

चोरट्यांनी मंदिराचे कोणतेही लाॅक न तोडता चोरटे मंदिराच्या गाभार्‍याच्या खिडकीतुन उतरल्याचे पुजारी यांनी सांगितले. मंदिराचे पुजारी यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर चोरीची माहिती दिल्यांनतर तात्काळ पोलिस स्टेशनकडुन घटनास्थळी पाहणी करण्यात आली असुन घटनेचा तपास आळेफाटा पोलिस करत आहे.

Read more...

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – अजित पवार

राज्यात स्वदेशी झाडांच्या लागवड-संवर्धनाला चालना देणार – अजित पवार

मुंबई, (दि.२५)| देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून शासकीय रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालना देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडी संदर्भातील विविध विषयांवरील बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

यावेळी वनमंत्री संजय राठोड, ‘सह्याद्री देवराई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सिनेअभिनेते सयाजी शिंदे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य संरक्षक दिनेश त्यागी, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक विवेक खांडेकर उपस्थित होते.

निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वनविभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. या कामात महसूल व वन विभागासोबत ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’ला सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड व संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात ७५ ठिकाणी फळझाडांच्या परसबागा फुलविण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत जुनी झाडे शोधून तज्ज्ञ गटाच्या माध्यमातून त्या झाडांना ‘हेरीटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. ‘सह्याद्री वनराई’च्या मॉडेलच्या मदतीने राज्यात कमी वेळात ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Read more...

कार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना

कार्यमालक आणि कार्यालय मालकावर गुन्हा दाखल ; जुन्नर तालुक्यातील दुसरी घटना

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगाव (दि.२५) | कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करत एक विवाह सोहळा नुकताच हिवरे तर्फे नारायणगाव याठिकाणी पार पडला. या सोहळ्यातील वधूसह १२ रुग्णांचे निदान कोरोना पॉझिटिव्ह आले आणि यापैकी वधूची आजी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत नारायणगाव पोलिसांनी वर पिता सह्याद्री भिसे आणि ओसारा हॉटेल चे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत नारायणगांव पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा १३ऑगस्ट रोजी हिवरे तर्फे नारायणगांव येथील ओसारा हॉटेल येथे झाला. भिसे हे येडगांव येथील शेतकरी व नारायणगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी राजकीय कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कोरोनाबाधित असलेली वधूची आजी उपस्थित होती. त्यांचे उपचार सुरु असतांना पुण्यात निधन झाले. त्यानंतर वधूसह लग्नसोहळ्यातील दोन्ही कुटुंबातील अकरा जणांचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोशल मिडियावर सध्या या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

समाज माध्यमांवर झालेल्या या चर्चेची व माहितीची शहानिशा करत नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी हॉटेल ओसारा येथे जाऊन चौकशी केली असता. त्यात उपस्थितांच्या यादीत कोरोना बाधित व्यक्तींचे नावे आढळून आले. त्यामुळे कार्यमालक भिसे आणि ओसारा होटेलचे मालक यांचेवर गुन्हा रजिस्टर २५८/२०२०भारतीय दंड विधान कलम १८८,२६९,२७० कलमान्वये कोविड -१९ उपाययोजना २०२० नियम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Read more...

श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याचे सर्वेक्षण काम सुरू

श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याचे सर्वेक्षण काम सुरू

बांगरवाडी | बांगरवाडी, बेल्हे येथील श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व श्री.आदिनाथ बाळेश्वर मंदीर येथे डोंगरावर जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करत होते. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे  सदस्य पांडुरंग पवार यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न करुन आज श्रीक्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याच्या कामासाठी आज सर्वेक्षण सुरू केले. या रस्त्याची मागणी बांगरवाडी गावचे सरपंच जालिंदर बांगर व अन्य ग्रामस्थांनी केली होती. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून या रस्त्याचे सर्वेक्षण आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  पांडुरंग पवार (उपाध्यक्ष व सदस्य जि. प.पुणे) यांच्या उपस्थितीत विभूते साहेब (कार्यकारी अभियंता RP PWD पुणे), दाते साहेब (उपअभियंता RP PWD पुणे), कांबळे साहेब(सर्वेअर RP PWD पुणे), खंडारे साहेब(सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर) यांनी पाहणी केली. उद्या पासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. यावेळी बांगरवाडी चे सरपंच जालिंदर बांगर, सदनाना पतसंस्थेचे चेअरमन प्रदीपशेठ पिंगट, फकिरा पाबळे, गणेश पाबळे व निवृत्ती पवार आदी उपस्थित होते.

Read more...
Open chat