जुन्नर तालुक्यातील ४७ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के

जुन्नर तालुक्यातील ४७ शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जुन्नर तालुक्यातील निकाल हा ९७.७७ टक्के इतका लागला आहे. संपूर्ण राज्यातील दहावीचा निकालही गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी जास्त लागला आहे. शालेय अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा, कृती पत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकालाची टक्केवारी जास्त दिसत आहे असा अनुमान शिक्षण तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जुन्नर तालुक्यातील ८९ शाळांमधील ५४०० विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५२८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील १९९१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तर प्रथम श्रेणीत १९६१ व द्वितीय श्रेणीत ११२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिली आहे.

जुन्नर तालुक्यातील ८९ शाळांपैकी तब्बल ४७ शाळांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे यांनी दिली आहे. आमदार अतुल बेनके यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

जुन्नर तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी

प्रथम- ९९.६० टक्के
ऋतुजा प्रकाश आमले(अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, जुन्नर),
द्वितीय- ९९.२० टक्के
चैत्राली ज्ञानदेव गायकर- (चैतन्य विद्यालय, ओतुर)
तृतीय- ९९.०० टक्के
वैष्णवी मयूर अमूप (सरस्वती विद्यालय उदापूर)
तालुक्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे- गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर (नारायणगाव), विद्या विकास मंदिर (राजुरी), सरदार पटेल हायस्कूल (आणे), अंजुमन हायस्कूल (जुन्नर), श्री श्री संभाजी विद्यालय (बोरी), श्री विघ्नहर विद्यालय (ओझर), शिवनेरी विद्यालय (धोलवड), आणे माळशेज हायस्कूल, मढ, पुष्पावती विद्यालय (डिंगोरे), सरस्वती विद्यालय (उदापूर), आश्रमशाळा खिरेश्वर, आश्रमशाळा अंजनावळे, अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम (नारायणगांव), न्यू इंग्लिश स्कूल (खामुंडी), सावळाराम बुवा दांगट विद्यालय (उंब्रज), इंदिरा गांधी हायस्कूल (बेल्हे), आश्रम शाळा सोनवणे गुरुवर्य गोविंददेव प्रशाला (बोरी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (तांबे), न्यू इंग्लिश स्कूल (राजुर नं. १), शारदाबाई पवार विद्यालय (आंबेगव्हाण), श्री लेण्याद्री विद्यामंदिर (बल्लाळवाडी), ज्ञानदा माध्यमिक विद्यालय (मंगरूळ), सोमतवाडी आश्रमशाळा शितळेश्वर विद्यालय (सितेवाडी), समर्थ मधुकरराव विद्यालय (चिंचोली), कुलस्वामी श्री खंडेराय विद्यालय (हिवरे तर्फे नारायणगाव), कुलस्वामी विद्यामंदिर (वडज), अजितदादा पवार हायस्कूल (देवळे), ग्रामोन्नती मंडळ (गुंजाळवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (नगदवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (धामणखेल), न्यू इंग्लिश स्कूल (करंजाळे), न्यू इंग्लिश स्कूल (शिरोली बु.), ज्ञानदा माध्यमिक विद्यालय (गोद्रे), शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय (आळेफाटा), श्री जगदंबा विद्यालय (जाधववाडी), जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल (आळेफाटा), शेठ नेनसुख मुथा स्कुल (जुन्नर), ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल (आळे), शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम (जुन्नर), कर्पदिकेश्वर इंग्लिश स्कूल (ओतूर), हांडे देशमुख हायटेक स्कूल (आळेफाटा), विद्या निकेतन हायस्कूल (साकोरी), रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल (शिरोली), हिरा इंग्लिश मिडीयम (खानापूर) व आश्रमशाळा (खटकाळे).

Read more...

करणी सेना महाराष्ट्र राज्य मिडिया सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड

करणी सेना महाराष्ट्र राज्य मीडिया सेलच्या प्रदेश पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | करणी सेना महाराष्ट्र राज्य मीडिया सेलच्या प्रदेश अध्यक्ष पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरजपाल सिंह अम्मूजी(राजपूत)व राष्ट्रीय सचिव संजयसिंह राणा , राष्ट्रीय उपाध्यक्ष मधूकर आप्पा साहेब ढोमसे (राजपूत) यांच्या उपस्थितीत २४ जुलै रोजी करण्यात आली. करणी सेना ही देशभरामध्ये देव देश धर्म यासाठी प्रमुख काम करीत आहे.

एक कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून करणी सेनेचे काम सर्वांना परिचित आहे अशा महाराष्ट्र राज्य करणी सेनेच्या इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया सेल च्या प्रदेश अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अतुलसिंह शैलेंद्रसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली

महाराष्ट्र वरीष्ठ समिती पुढील प्रमाणे
कमेटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- देविचंद सिंह बारवाल.
महाराष्ट्र प्रदेश महीला अध्यक्ष -संध्या ताई राजपूत
महाराष्ट्र वरीष्ठ प्रवक्ता-दिनेश सिंह जाधव (राजपूत )
महाराष्ट्र युवा शक्ति- अध्यक्ष-गिरीश सिंह परदेशी
शुरवीर महाराणा प्रताप तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पालन करून राज्यातील हिंन्दू बांधवांच्या समस्या आणि संघटनसाठी राष्ट्रीय करणी सेना सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन अतुलसिंह परदेशी यांनी केले.

Read more...

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे-  बाळासाहेब पडघलमल

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे-  बाळासाहेब पडघलमल

सजग वेब टीम, पुणे

पुणे, दि.२७ | प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी दिली आहे.
जिल्ह्यात पीक विमा योजना प्रसिद्धीची सुरूवात दक्षता पथकाचे अधिक्षक कृषी अधिकारी श्री मुळे आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवडी यांच्या हस्ते विमा योजना विषयी माहिती असलेल्या प्रचार रथाला झेंडा दाखवून करण्यात आली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे-नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतक-यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.
ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी आहे, कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २.० टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे, या प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

या योजनेतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पूरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार असल्याची माहितीही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री पडघलमल यांनी दिली आहे.

Read more...

पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी

पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी

मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर च्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनला निवेदन

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करुन पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणार्‍या गुन्ह्याबाबात चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर तालुक्याच्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील, पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना य‍ांनाही देण्यात आले आहे.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला पत्रकारांचे नेहनीच सहकार्य आहे. चुकीच्या पद्घतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करुन काही होणार नाही असे सांगत आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करुन योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अतुल परदेशी म्हणाले की सर्व पत्रकार एकत्र आहेत पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भुमिका पत्रकारांच्यावतीने मांडली.

यानिमित्तानं अतुल परदेशी, सुरेश वाणी, रविंद्र पाटे, सचिन कांकरिया, अॅड. कुलदिप नलावडे, अतुल काकंरिया, किशोर चौरे, प्रा.अशफाक पटेल, स्वप्निल ढवळे, पवन गाडेकर, आयुब शेख, दर्शन फुलपगार, मंगेश पाटे, चेतन बोर्‍हाडे, रफिक शेख, तान्हाजी तांबे, सुभाष घुले यांसह प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक मिडीयाचे मी एक पत्रकार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

यानिमित्तानं उपस्थित पत्रकारांची कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन मिटिंग संपन्न झाली. यावेळी अतुल परदेशी, सचिन कांकरिया, रविंद्र पाटे, सुरेश वाणी, अॅड.कुलदिप नलावडे यांनी पत्रकार सुरक्षा व पुढील कार्यवाही विषयी मार्गदर्शन केले.

या मिटिंगचे प्रास्ताविक प्रा.अशफाक पटेल यांनी केले तर आभार किशोर चौरे यांनी मानले.

Read more...

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम

सजग वेब टीम, जुन्नर

पुणे दि.२६ | कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच मास्क घालून व सुरक्षित अंतराचे पालन करुन व प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेच्या सूचनांचे पालन करुनच बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
जुन्नर नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अतुक बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रमा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसिलदार हनुमंत कोळेकर, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री, नगर अभियंता विवेक देशमुख आदीसह लोकप्रतिनिधी, नागरिक, शांतता समितीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासोबतच काळजी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणाचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोविड सेंटरमध्ये जैव-वैद्यकीय कचरा, भोजन व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा तसेच उपचाराबाबत दक्षता घ्या. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
प्रतिबंधित क्षेत्रातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती तसेच बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. अशा तपासणीतून कोरोना संसर्गाचे लवकर निदान होवून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. तसेच कोरोना बाधित रुग्णाला घरी सोडल्यानंतर त्यांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरीत आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी दिले. तसेच येणाऱ्या कालावधीतील सण-उत्सव साजरे करताना कोरोना संसर्गाबाबत शासनाच्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्गाबाबत नागरिकांनी दक्षता घेतली आहे. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची तालुक्याची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून यापुढील काळात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करताना सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी याबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. नागरिकांनी यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आभार नगराध्यक्ष शाम पांडे यांनी मानले.

Read more...

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट


ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीसह ग्रामविकासावर झाला संवाद

कोल्हापूर ( दि.२४ ) | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभराच्या चर्चेत या दोघांनी ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर चर्चा केली. लोकसहभागातून ग्रामविकास या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या दोघांनीही पुन्हा भेटण्याचे ठरविले आहे.

या भेटीत अण्णा हजारे यांनी मंत्री श्री मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या नवीन कायदा झाला . त्यासंदर्भात दोनच दिवसापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खाजगी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री श्री मुश्रीफ यांनीही पत्र लिहून अण्णा हजारे यांना लवकरच आपली भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्र लिहिले होते.

त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत अण्णा हजारे यांनी महात्मा गांधीजी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधन संपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले.

चौकट…
अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरण…..
या भेटीत अण्णा हजारे यांनी खाजगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान; कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हा कायदा करावा लागल्याचे श्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबीबाबत मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले.

Read more...

पशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ

पशुसंवर्धन विभागाच्या गोचीड आणि जंत निर्मूलन अभियानाचा आणे याठिकाणी शुभारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

सजग वेब टीम, जुन्नर

आणे | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणे व कात्रज दूध संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बलराम दूध उत्पादक संस्था व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून गुरुवारी (दि.२३) आणे येथे गोचीड निर्मूलनासाठी लसीकरण करण्यात आले तसेच जंत निर्मूलनासाठी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ आणे येथील दाते मळ्यात जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आला.

यावेळी कात्रज दूध संघाचे ट्रेनिंग ऑफिसर डॉ. मंगेश फाकटकर, डॉ. भरत गायकवाड, डॉ.खालिद मणियार, डॉ. अरविंद बेडेकर, डॉ. संदेश कोबल, डॉ.आंधळे, डॉ. भगत, डॉ. बढे, डॉ. बेल्हेकर, डॉ. रोहन दाते असे नऊ पशुवैद्यक आणे परिसरातील सुमारे १२०० जनावरांचे लसीकरण करतील असे बलराम दूध संस्थेचे अध्यक्ष माऊली संभेराव यांनी सांगितले.

या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, चंद्रकांत ढगे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, राम देशमुख, रोहित दाते, संतोष दाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क

उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले मास्कचे वाटप

नारायणगाव | नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांचे विश्वासू सहकारी अनिल खैरे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.

यानिमित्तानं नारायणगाव खोडद रोड येथे जवळपास १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना काळात कार्यरत असणार्‍या सेवकांना २०० मास्कचे सरपंच योगेश पाटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईड फवारणी, अर्सेनिक गोळ्यांचे वाटप यांसह ग्रामपंचायत व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यामातुन राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमात अनिल खैरे हे सक्रिय पुढाकार घेत अाहेत. सध्या कोरोना पार्श्वभुमीवर सामाजिक जबाबदारी अोळखुन त्यांनी वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने हार, तुरे, फ्लेक्स यावर अनावश्यक खर्च करु नये असे आवाहनही मित्र परिवाराला केले होते. त्यानुसार मित्र परिवाराने खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक उपक्रम राबवले यानिमित्तानं त्यांचे वर्गमित्र लक्ष्मी ऑटो स्पेअर्स चे मालक विशाल अडसरे यांनी ग्रामपंचायतला २०० मास्क भेट दिले.

यावेळी विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, कुसुमताई शिरसाठ, राजेश बाप्ते, भाऊ मुळे, धर्मेंद्र गुंजाळ अजित वाजगे, ईश्वर पाटे, अजय पाटे, जयेश कोकणे, जालिंदर खैरे, नंदू अडसरे यांसह अनिल खैरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

Read more...

रस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत जुन्नरच्या रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा 

रस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा 

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | समाजात एकीकडे पैसा हा सर्वस्व मानला जात असताना याच पैशांमुळे नाते-गोतेही दुरावले जात आहेत. मात्र, आजही समाजात काही अशी माणसे आहेत, जी पैशांपेक्षा माणुसकीचा विचार करताना दिसतात.

याचाच प्रत्यय रविवारी जुन्नर-आपटाळे रोडवर आला. हरवलेले 18 हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांनी प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने परत केले.

जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील बाळू बिडवई हे रविवारी संध्याकाळी जुन्नर येथे कामानिमित्त निघाले. जुन्नर पोचल्यानंतर त्यांच्या खिशातील 18 हजार रुपये रस्त्यात पडल्याचे काही अंतर पुढे गेल्यानंतर पडल्याचे लक्षात येताच बिडवई यांना धक्का बसला. संपूर्ण रस्त्यावर शोधाशोध करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. बिडवई यांनी पुन्हा जुन्नर -आपटाळे रोडवर पैसे शोधायला सुरवात केली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांना सोमतवाडी पेट्रोलपंपाजवळ हरवलेले पैसे सापडले होते या तरुणाने प्रामाणिकपणा दाखवत हरवलेले 18 हजार रुपये सापडल्याचे मित्र तौसिफ़ खान यांस सांगितले. पटेल यांनी खान यांनासोबत घेऊन जुन्नर रोड वर कोणी रस्त्यावर शोधत असेलच या भावनेनं समोरच्या व्यक्तीचा शोध घेतला. व सापडलेले 18 हजार रुपये त्यांना सुपूर्त केले.

सध्या कोरोना लाॅकडाऊनमुळे सर्वच जण अडचणीत आहेत. ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील त्याची काय अवस्था असेल या विचारातूनच आपण हे पैसे परत केल्याचे रिजवान पटेल व तौसिफ़ खान यांनी सांगितले.

Read more...

डॉ.आंबेडकर यांच्या मूळगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपाची मदत

डॉ. आंबेडकर यांच्या मूळगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपाची मदत

– विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

– भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

– आंबडवेतील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला ‘एक हात मदतीचा’

पिंपरी । शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश जगाला देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादाळत नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी सकाळी ही मदत शाळेला पोहोच झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे आदी उपस्थित होते.
यापूर्वी पिंपरी-चिंचवडकरांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त नागरिकांसाठी लक्षवेधी मदतकार्य केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे आहे.

आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर व असोंड येथील आश्रमशाळा व वसतिगृह चालवले जाते. अत्यंत ग्रामीण भागात संस्थेचे कार्य सुरू आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. या हेतुने संस्था कार्यरत आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेच्या ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे संस्थेचे मोठे नुकसान…
आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे . कॉलेज इमारतीवरील तसेच लेडीज हॉस्टेल व सांस्कृतिक भवनावरील सुमारे 1100 पत्र्यांचे नुकसान झाले आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे. गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम इदाते यांनी दिली.

राज्य शासन पुरस्कारप्राप्त शाळा पण संकटात मदत शून्य…

कर्मवीर दादासाहेब इदाते यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आपल्या संस्थेने गेली 26 वर्ष शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कर्मवीर दादांनी सुरू केलेल्या या सर्व संस्था अतिशय दुर्गम भागात कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच आर्थिक विषयामध्ये संस्थेने कधीही पैसा कमविण्याचा अथवा शिक्षणाचा धंदा करण्याचा प्रयत्न केला नाही. संस्था 80 G मान्यताप्राप्त असून आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मनाचा शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही, अशी खंतही कार्याध्यक्ष इदाते यांनी व्यक्त केली.

स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे साकारले होते सिनिअर कॉलेज…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्था ग्रामीण भागात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगला शिक्षणाचा संदेश दिला. पण, त्यांच्या जन्मगावी चौथीपर्यंतसुद्धा शाळा नव्हती. ज्या भागात शिक्षणाचा लवलेश नव्हता. अशा भागातील मुलांसाठी संस्थेने शाळा सुरू केल्या आहेत. युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच मंडणगड येथे सिनिअर कॉलेज सुरू झाले. कारण, मंडणगड तालुका असला तरी, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा करावयाची असेल, तर त्याची बदली आजही मंडणगड येथे केली जाते. असोंड येथे भटके विमुक्तांसाठी आश्रमशाळा आणि ओबीसी मुलांसाठी वसतिगृह आहे. सातवीनंतर पुढे काय? म्हणून संस्थेच्या पुढाकाराने माध्यमिक वसतिगृह विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा बंद आहेत. पण, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व डागडूजी करण्याची चिंता संस्था चालकांना आहे.

माजी समाज कल्याण मंत्री भाई गिरकर यांचा दानशूरपणा…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला माजी समाज कल्याण मंत्री विजय तथा भाई गिरकर यांनी कायम मदत केली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर गिरकर यांनी चौथ्या दिवशी शाळेला भेट दिली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन गिरकर यांनी संस्थेला १ लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला होता. तसेच, गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या समता परिषदेकडूनही १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेला देण्यात आला आहे. संस्थेच्या वाटचालीत भाई गिरकर यांचे मोठे योगदान आहे, असेही कार्याध्यक्ष इदाते यांनी म्हटले आहे.

Read more...
Open chat