शेरकर – बोऱ्हाडे वादात आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

शेरकर – बोऱ्हाडे वादात आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | शिरोली बु. येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर आज रविवार (दि.३१) रोजी अखेर पडदा पडला आहे.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी हा वाद मिटवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. आज हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, युवा सेना प्रमुख गणेश कवडे यांनी देखील यात महत्वाची भूमिका निभावली.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोऱ्हाडे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी जुन्नर विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व गावातील भांडण गावातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

यावेळी दोघांनी एकमेकांविषयी झालेले समज- गैरसमज दूर करत आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. दोघांनीही आपआपले सामाजिक काम एकमेकांच्या सहकार्याने एकत्रितपणे करण्याची भूमिका ग्रामस्थांसमोर जाहीर केली.

सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्यातच या प्रकरणास वेगळे वळण लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे आमदार बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बोऱ्हाडे-शेरकर प्रकरणात आपल्या शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने सर्वांनीच प्रयत्न केले . गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास समिती व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन चर्चेतून हा वाद सामोपचाराने मिटवला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांनी महत्वपूर्ण भूमीका पार पाडली. या प्रकरणी सोशल मीडियावर कोणीही उलटसुलट चर्चा करू नये असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.

Read more...

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर (दि.२९)| आंबेगाव तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. या अहवालाने आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाची झोप उडाली आहे. तालुक्यात १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली आहे. या बातमीने आंबेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आंबेगाव तालुका हा कोव्हिड १९ चा हॉटस्पॉट बनला आहे.

आंबेगाव तालुक्यात यापूर्वी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामध्ये साकोरे १, शिनोली ३, निरगुडसर १, जवळे १ , वडगाव काशिंबे १ ,पिंगळवाडी १, वळती १, गिरवली १ त्यातील शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

आज आलेल्या अहवालानुसार वडगाव काशिंबे ७ , शिनोली १ , घोडेगाव १, फदालेवाडी ३, एकलहरे १, पेठ २ असे एकूण १५ जण पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. कालच उत्पादनशुल्क तथा कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना विषयक तालुका आढावा बैठक घेऊन तालुक्यातील रुग्णांचा आढावा घेतला होता. मात्र आज आलेल्या अहवालामुळे आंबेगाव तालुका हा हॉट स्पॉट बनला असल्याचे जाणवत आहे आंबेगाव तालुक्यातील बहुतेक प्रमुख गावे आणि बाजारपेठा बंद आहेत.

Read more...

अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील

अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावर आता राज्यातील राजकारण पेटू लागले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुका शिवसेनेचे प्रमुख माऊली खंडागळे, मावळ तालुका युवासेना प्रमुख अनिकेत घुले आदींनी आज बोऱ्हाडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

या दरम्यान आढळराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की “गेले दोन दिवस मी या घटनेची इतंभूत माहिती घेऊन अक्षय बोऱ्हाडे, सत्यशील शेरकर तसेच पोलीस प्रशासनाशी बोलून सर्व माहिती पडताळली. याप्रकरणी अक्षयची समक्ष भेट घेऊन त्याला पाठिंबा द्यावा यासाठी मला अनेकांनी फोन केले.

या संपूर्ण विषयावर मी अक्षयशी सविस्तर चर्चा केली असून व्यक्तिशः माझ्याकडून व शिवसेना पक्षाकडून काही मदत लागल्यास मी खंबीरपणे उभा आहे असे सांगून अक्षयला आश्वस्त केले आहे. निराधार व मनोरुग्ण व्यक्तींची अक्षय करीत असलेली सेवा मी गेली अनेक वर्षांपासून पहात आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊनच गेल्या २ वर्षांपूर्वी मी संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेत ‘श्री भैरवनाथ जीवन गौरव पुरस्काराने’ अक्षयला सन्मानित केले. यापूर्वीदेखील ज्या ज्या वेळी अक्षयला गरज पडली त्या त्या वेळी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सहकार्य करायला सांगितले हे अक्षयलाही चांगलेच माहित आहे.

परवा झालेल्या प्रकरणाबद्दल शिवसेना पक्षाचा उपनेता व संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे यास पाठिंबा जाहीर करत आहे.”

या दरम्यान सत्यशील शेरकर यांच्यावर काल जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी काल दिले असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणात शिरूर लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेने उघड भूमिका घेतल्याने या प्रकरणाने आता राजकिय वळण घेतले आहे.

Read more...

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

सजग वेब टिम, पुणे

पुणे | औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलांंपैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read more...

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर ; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर
; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आज औरंगपूर याठिकाणी मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींपैकी ३ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून एका व्यक्तीला पुणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे.

आज सकाळी विठ्ठलवाडी (वडज) याठिकाणी राहणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या १७ झाली आहेत.

रुग्णसंख्या आणि गावे खालील प्रमाणे

सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी २, पारुंडे  २, आंबेगव्हाण २, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, औंरगपूर १, विठ्ठलवाडी वडज -१ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून जुन्नरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तालुका रेडझोन म्हणून जाहीर करून कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी काही नागरिक करत आहेत.

Read more...

अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी खा.अमोल कोल्हे यांनी मांडली भूमिका

अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी खा. अमोल कोल्हे यांनी मांडली भूमिका

सर्वांनी कायद्यावर विश्वास ठेवण्याचे केले आवाहन

सजग वेब टिम, पुणे

पुणे | जुन्नर तालुक्यात शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर व मनोरुग्णांसाठी सामाजिक कार्य करणार्‍या अक्षय बोर्‍हाडे या तरुणाला काँग्रेसचे युवा नेते सत्यशिल शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवुन मारहाण केल्याचा आरोप बोर्‍हाडे याने फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे. त्यावरुन जुन्नर तालुक्यात राजकिय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. काल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओवर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या आहेत.

या प्रकरणी खा. उदयनराजे भोसले, खा.संभाजीराजे छत्रपती, आ. नितेश राणे यांसह अनेकांनी याविषयी फेसबुक पोस्ट करुन निषेध नोंदवत प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या विषयी शिरूर चे खासदार अमोल कोल्हे काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आज खा. अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली.

त्यांनी मांडलेली भूमिका अशी की,
“काल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओ वर राज्यातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत तसेच बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन आले. माझी विनंती आहे की नाण्याची एकच बाजू ऐकून मत बनवण्यापेक्षा पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं. आणि एकच बाजू ऐकून सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा.
तसेच सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आणि तरीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.”

दरम्यान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनीही काल आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.

सदर प्रकरणी शेरकर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा करुन आरोप फेटाळत म्हटले आहे की, कोरोना पार्श्वभुमीवर गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अक्षयने स्वत:ची व रुग्णांची काळजी घेण्याच्या सुचना देण्यासाठी त्याला आम्ही ग्रामस्थांनी बोलवले होते, परंतु आम्ही त्याच्या कामावर आक्षेप घेतोय असा गैरसमज करुन त्याने आम्हाला अरेरावीची भाषा करत शिविगाळ करुन तो निघुन गेला. अक्षयला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, तसे असल्यास त्याने ते सिद्ध करुन पुरावे द्यावेत असेही शेरकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी दोन्ही बाजूंनी समर्थक आपल्या बाजू सोशल मीडियावर मांडत आहेत.

Read more...

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका कार्यकारिणी ची बैठक पार पडली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हि बैठक पार पडली. या बैठकीसाठी आ.अतुल बेनके यांच्या समवेत तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा सरचिटणीस दिलीप कोल्हे, युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, पं. स. सभापती विशाल तांबे, मीडिया विभाग प्रमुख विजय कुऱ्हाडे, पक्षाचे जि.प.सदस्य यांसह काही प्रमुख आणि निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी, पक्षाची भूमिका यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

जुन्नर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या शासकीय उपाययोजना व पुढील धोरणे या बाबतीत माहीती आमदार बेनके यांनी यावेळी दिली. रेशनिंग वितरण, अन्न धान्य पुरवठा तसेच कोविड केअर सेंटरची उभारणी यासंबंधीची सविस्तर माहीती बेनके यांनी दिली.

या बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी पक्षाच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या महत्वाच्या उपाययोजनांची माहिती देत तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे व घेतलेल्या दक्षतेचे कौतुक केले.

या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध सुचना करून काही मागण्याही जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या. सर्व सुचनांची दखल घेत तालुक्यासाठी अधिक मदत देण्याचे आश्वासन गारटकर यांनी दिले. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांमध्ये कशाप्रकारे काम सुरू आहे, बारामती पॅटर्न काय आहे व जिल्ह्यात अनेक उपाययोजना कशा सुरू आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सध्या तालुक्यातील बहुतांश कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून आलेले नागरिक आहेत असे आढळून आले आहे यावर उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात नव्याने ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याने प्रशासनाला तशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.

अनेकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली व या गंभीर संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Read more...

जुन्नर तालुक्यात आणखी चार जण कोरोनाबाधित; सावरगाव ठरतंय हॉटस्पॉट

जुन्नर तालुक्यात आणखी चार जण कोरोनाबाधित; सावरगाव ठरतंय हॉटस्पॉट

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील सावरगाव याठिकाणी मुंबईहून आलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींच्या तपासणी अहवालात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. तर ऍक्टिव्ह केसेस १० आहेत. सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी १ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून मुंबईकर मंडळींचे आगमन मात्र जुन्नरकरांची चिंता वाढवताना दिसत आहे.

या सर्व परिस्थितीत प्रशासनाने सर्व नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

Read more...

अजितदादा कुठे आहेत?’ आ.कपिल पाटील यांचे लेखणीतून उत्तर

परवा खासदार गिरीश बापट म्हणाले, ‘अजित दादा कुठे आहेत?’

अजित दादांनी त्यांना उत्तर दिलं असेलही. पण बापटांच्या त्या प्रश्नांने मी स्वतः चकीत झालो.

लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये मंत्रालयात मला 10 ते 12 वेळा जावं लागलं. आणि त्यातला असा एकही दिवस गेला नाही की, मंत्रालयात अजित दादा दिसले नाहीत.

उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादांची एक ख्याती होती की, भल्या सकाळी 7.30 वाजता ते मंत्रालयात येऊन दाखल होत. अजून त्यांना रितसर बंगला मिळालेला नाही. पण मुंबईतल्या आपल्या फ्लॅटवरून ते सकाळीच मंत्रालयातल्या आपल्या दालनात येऊन बसत आणि कामाला सुरुवात करत. मंत्रालयाचे दरवाजे उघडतात सकाळी 10 वाजता. पण दादा पहाटे येऊन बसत ते यासाठी की दादांच्या मागे त्यांना भेटणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्या भेटीगाठीत मंत्रालयीन कामकाज बाजूला पडता कामा नये हा त्यांचा हेतू असे. तेव्हा सुद्धा दादा मला गराड्याशिवाय कधी दिसले नाहीत. दादांशी फोनवर बोलणं अधिक बरं पडायचं. आणि आपला फोन उचलला गेला नाही तर ते उलटा फोन करतात. कारण भेटायला गेलं की ही तोबा गर्दी. आता फरक इतकाच झालाय कोविडनंतर की लोकांची गर्दी मंत्रालयात नसते. कारण घराबाहेर पडायला मिळत नाही आणि मंत्रालयात प्रवेश नाही. पण दादा मंत्रालयात असतात.

अख्खं मंत्रालय रिकामं आहे अक्षरशः. कारण 5 टक्क्यांहून अधिक कर्मचारी मंत्रालयात असता कामा नयेत, असा कोरोनामुळे प्रशासनाचा दंडक आहे. येण्याजाण्याची सोयही नाही. पण बहुतेक मंत्रालय 5 टक्के काय 1 टक्कासुद्धा भरलेलं दिसत नव्हतं. मला पूर्ण मंत्रालयात या दहा दिवसात दिसले ते चार, पाचच मंत्री. कधी अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे. पण दादांचा दिवस चुकत नव्हता. दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठकाहून बैठक घेत होते. त्यांच्या दिमतीला फक्त एक खाजगी सचिव, संबंधित खात्याचे सचिव आणि एक शिपाई. दोन, चार पोलीस. यापलीकडे मंत्रालयात कुणी दिसत नसे.

राजेश टोपे, अनिल परब, अनिल देशमुख आणि एकनाथ शिंदे या चार मंत्र्यांचे अपवाद वगळता अक्षरशः मंत्रालय रिकामं असायचं. मंत्रालयात आवाज येतात ते फक्त मांजरींचे. कर्मचाऱ्यांच्या डब्यातलं अन्न त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते बहुतेक उंदीरच शोधत असतात.

प्रत्येकवेळी मला दादांकडेच जावं लागलं. संबंधित विषय दादांच्या खात्याशी निगडित नसताना सुद्धा. पण दादा दोन मिनिटात काम पूर्ण करायचे. तिथल्या तिथे रिझल्ट द्यायचे. मी एकदा त्यांना म्हटलं यूपीतल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना घरी जायचं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, की हिंदी भाषिक शिक्षक आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने आहेत.

दादांनी विचारलं,
इतके शिक्षक आहेत?

मी म्हटलं,
हो.

पण दुसऱ्या क्षणी त्यांनी सचिवांना फोन लावला.

ट्रेन जात असेल तर कपिल पाटलांचंही काम करा.

पुढे एक श्रमिक ट्रेन शिक्षकांसाठी उपलब्ध झाली. शिक्षक, त्यांचे कुटुंबीय गावी पोचलेही.

आयत्यावेळी ती ट्रेन रद्द होणार होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी मदत केली म्हणून ती ट्रेन गेली.

पण या सगळ्या काळामध्ये दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत. पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शल सारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच आहेत.

दादांनी खात्यांच्या बैठका तर खूप घेतल्या. प्रत्येक खात्याची बैठक घेतली. तिजोरी रिकामी असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांनी करायला लावले. राजेश टोपेंच्या खात्याला जिथे जिथे अडचण असेल तिथे काही क्षणात ते फाईल तयार करायचे आणि मुखमंत्र्यांकडे पाठवून द्यायचे. लोक त्यांना भेटायला येत नाहीत. पण म्हणून फोन थोडी थांबले आहेत. सचिवांबरोबर चर्चा आणि फाईली मोकळ्या करत असताना शेकडो फोन ते रोज घेत असतात. आणि प्रत्येकाच्या कामाला न्याय देत असतात.

कुणी गुजरातमध्ये एक मुलगा अडकला होता. आईबाप इथे पुण्यात. त्या मुलाला आणण्याची व्यवस्था त्यांनी केली.

सिंधुताई सकपाळ यांच्या आश्रमात भाजीपाला पाठवण्यात अडचण येत होती. दादांनी पोलिसांना सांगितलं, अरं तिथं तर भाजीपाल्याची गाडी आश्रमापर्यंत गेली पाहिजे. भाजीपाल्याची गाडी रोजच्या रोज जायला लागली.

पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती हे दादांचं होमटाऊन किंवा कार्यक्षेत्र. दादांनी रेड झोनचं रूपांतर ऑरेंज आणि काही ठिकाणी ग्रीन झोनमध्ये करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि करून दाखवलं. कारखाने चालू केले. छोटे मोठे उद्योग धंदे चालू करायला लावले. बजाजचा उद्योग समूह सुरू झाला. अर्थचक्र चाललं नाही तर राज्य चालू शकणार नाही, हे दादांना पक्कं ठावूक आहे. म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे उद्योग सुरू करावेत, यासाठी दादा अक्षरशः व्यक्तीशः लक्ष घालतात. चालू करून देतात.

एकनाथ शिंदे, अनिल परब, राजेश टोपे, अनिल देशमुख हे वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. त्यांच्या प्रत्येक अडचणीला दादा प्राधान्याने मदत करताहेत.

दादा बोलायला तसे फटकळ आहेत. तसे कसले पक्के फटकळ आहेत. पण दादा अत्यंत सहहृदय आहेत. संवेदनशील आहेत. ते निर्भय आणि निडर आहेत. अभ्यासू आहेत आणि निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे. कोविड युद्धामध्ये मी ती अगदी जवळून पाहिली. म्हणून चकित झालो माजी मंत्री आणि भाजप खासदार गिरीश बापट यांच्या त्या प्रश्नांने की दादा कुठे आहेत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वाभाविकपणे सर्वांना समोर दिसतात. त्यात आश्चर्य नाही. पण त्या दोघांच्या यशामध्ये दादांचा अदृश्य वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून मी त्यांना या कोविड युद्धातला फिल्ड मार्शल म्हटलं. फिल्ड मार्शल म्हणजे काय हे गिरीश बापटांना सांगण्याची आवश्यकता नाही. बापट तसे दादांचे मित्र आहेत. आणि त्यांना माहीत नाही असं असू शकत नाही. हे बापटांसाठी म्हणून मी लिहीत नाहीये. अनेकांना वाटत असेल की दादा कुठे आहेत? म्हणून हा प्रपंच.

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Read more...

लेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात

लेण्याद्री येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात

आमदार बेनके यांनी घेतला कामकाजाचा आढावा

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील कोविड 19 केअर सेंटरची उभारणी अंतिम टप्यात असून, गुरुवारी दि.२१ रोजी सांयकाळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे सहा सेंटरची महत्वपूर्ण मागणी सरकारकडे केली होती. यात जुन्नरसाठी आमदार अतुल बेनके हेही आग्रही होते. त्यापैकी महाळूगे, वाघोली, शिरूर, मंचर आणि लेण्याद्री (जुन्नर) ही पाच कोविड 19 केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्सशी बोलताना सांगितले.

कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णाच्या स्वॅबचे नमुने याठिकाणी घेण्यात येणार असून, पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच या तपासणीचा अहवाल २४ तासाच्या आत प्राप्त होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सेंटर सध्या शंभर बेड्सचे असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सचे उपचार या केअर सेंटरमध्ये करण्यात येतील. त्यासाठी रूग्णास पुण्याला नेण्याची गरज भासणार नाही, अशी व्यवस्था उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व कामात आपली प्रशासकीय यंत्रणा वेगाने राबत आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले.

या पाहणी दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार हनुमंत कोळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, गट विकास अधिकारी विकास दांगट, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत शिंदे,जुन्नर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री काटकर, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थान चे अध्यक्ष कैलास लोखंडे आणि सर्व संचालक आदी उपस्थित होते. यावेळी केअर सेंटरच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Read more...
Open chat