हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी

हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.२८| हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ , आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्यकडे पाच लाख रूपयांचे 850 धन्य किट देण्यात आले.

 

विभागीय आयुक्त् कार्यालयात धनादेश प्रधान करतेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

Read more...

ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट – डॉ. दीपक म्हैसेकर

ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.(२७)| कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आला असून परवानगी प्राप्त झाल्यावर उपचार सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मशिनव्दारे प्लाझ्मा वेगळा काढला जावू शकतो आणि हा प्लाझ्मा कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जावू शकतो. असा प्लाझ्मा १८ वर्षावरील पुरुष किंवा महिला व्यक्ती देवू शकते. तथापी संबंधित महिला अद्यापर्यंत गर्भवती राहिलेली नसावी. तसेच त्या व्यक्तीचे वजन ५५ किलो पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-१९ च्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. यानंतर १४ दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा देवू शकतात. तथापी प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी मागील २८ दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत. संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस- बी तसेच एचआयव्ही बाधित नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान करताना तपासणी करण्यात येणारा रक्तगट व आवश्यक त्या सर्व बाबींची काळजी देखील घेण्यात येईल असेली डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Read more...

‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लॅन केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे

‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा – खा. डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे | लॉकडाऊन दीर्घकाळ पर्यंत थांबवणं आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य जनता यापैकी कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पथकासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून अनेक महत्त्वाच्या बाबींकडे या पथकाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, लॉकडाऊन केला आहे मात्र आपण मास टेस्टींग करत नाही हे विसंगत आहे तेव्हा मास टेस्टींग करावं अशी मागणी करून ते म्हणाले की, ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ प्लान तयार करून प्रथम ग्रीन झोन मध्ये त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑरेंज आणि रेड झोनमध्ये हा प्लान राबवावा असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका यासह विविध विभागांनी आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग आटोक्यात आहे अशा शब्दांत ठामपणे बाजू मांडत डॉ. कोल्हे यांनी राज्यातील कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक केले.

राज्य सरकार परराज्यातून आलेल्या कामगारांची चांगली काळजी घेत आहे. त्यांना व केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवीत आहे. परंतु परराज्यातून आलेल्या कामगारांना घराची ओढ लागली आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी विशेष ट्रेन्सचे नियोजन करण्याची उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांची मागणी मान्य करावी अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पथकाकडे केली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला नियमित तपासणी करण्यात यावी. उपचार करणारी रुग्णालये कोरोना संसर्गाची केंद्रीय बनणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी “टायफाईड मेरी” या बहुचर्चित घटनेप्रमाणे घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना इटली सारख्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांलयात कोरोना रुग्णावर उपचार केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनली याकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधून सर्वण कोविड रुग्णालयात एकाच वेळी रुग्ण दाखल करून उपचार करण्याऐवजी एका रुग्णालयाची खाटांची क्षमता संपेपर्यंत दुसऱ्या रुग्यालयात दाखल कोरोनाचा रुग्ण दाखल करू नये अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली.

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना अतिशय अस्पष्ट (व्हेग) आहेत. त्यामुळे आयुर्वेद, युनानीसह सर्व शाखांचा ‘कंबाईन इंटिग्रेटेड मेडिकल अॅप्रोच’ केंद्र सरकारने तयार करावा अशी सूचनाही या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत आपले मुद्दे मांडताना डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पथकाला केली.

Read more...

केंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा

केंद्रीय आरोग्य पथकाने घेतला पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चा आढावा

आमदार अतुल बेनके यांनी सादर केलेल्या मागण्यांवर समितीची सकारात्मक पाऊले

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | आज पुणे जिल्हा ग्रामीण आणि पुणे शहर मधील सर्व आमदारांशी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विशेष पथकाने व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील आरोग्य प्रशासन आणि परिस्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी काही महत्वाचे मुद्दे या समिती समोर मांडले.

जुन्नर तालुका पूर्णपणे शेती उद्योगावर आधारित तालुका आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळे वाहतूक करणाऱ्या गाड्या मुंबई, पुणे सारख्या शहरात जातात आणि येताना काही नागरिक छुप्या पध्दतीने या वाहनांमधून प्रवास करतात. या कारणांमुळे या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे व्यवस्थित तपासणी झाली पाहिजे, तसेच या गाड्यांचे निर्जंतुकीकरण करूनच पुन्हा तालुक्यात सोडल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय सुविधांच्या संदर्भातही बेनके यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांना या परिस्थितीतही शासनाने पासेस उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. या प्रमुख मागण्या बेनके यांनी या केंद्रीय समिती समोर मांडल्या.

त्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या संदर्भातील पासेस देण्यास त्वरित मान्यता देऊन ते देण्यास सुरवातही झाली आहे. उर्वरित मुद्द्यांवर केंद्रीय समितीने याबाबत त्वरित निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास
आदेश दिले आहेत अशी माहिती जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्स शी बोलताना दिली आहे.

Read more...

पुणे विभागात कोरोना बाधित ०१ हजार ३१ रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे विभागात कोरोना बाधित ०१ हजार ३१ रुग्ण
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे

विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

०१ कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.२३| विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ०१ हजार ३१ झाली असून विभागात १७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात ०१ हजार ३१ बाधित रुग्ण असून ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ९३६ बाधीत रुग्ण असून ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ३७ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २७ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी ११ हजार ४६ चा अहवाल प्राप्त झाल असून ६६२ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ९ हजार ९६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ०१ हजार ३१ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९२७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Read more...

खा. अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठानची आदिवासी भागातील लोकांना मदत

खा. अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांना मदत

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सामाजिक मदत आणि उपक्रम सध्या राबविले जात आहे. नारायणगाव याठिकाणीही आज खा. डॉ अमोल कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने गरजू आणि उपेक्षित नागरिकांना मदत कार्यक्रम देण्यात आली. जुन्नर तालुक्यातील आदिवासी आणि मावळ भागातील ६६३ गरजू कुटुंबियांना किराणा माल आणि जिवनावश्यक वस्तू डॉ कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या कार्याचा नारळ वाढविण्यात आला.

यावेळी शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नर चे आमदार अतुल बेनके, नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, नारायणगाव चे ग्रामसेवक नाईकडे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे यांच्यासह कोल्हे मळ्यातील विविध कार्यकर्ते आणि जगदंब प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more...

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय

सजग वेब टिम, जुन्नर

मुंबई दि २१ |  कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील

बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे

राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read more...

बालचमूंंनी खाऊसाठी जमवलेले पैसे दिले ग्रामसुरक्षा निधीसाठी मदत

बालचमूंंनी खाऊसाठी जमलेले पैसे दिले नारायणगाव ग्रामसुरक्षा निधीसाठी

सिद्धेश व अर्जुन सचिन तांबे यांच्याकडुन ५,५५३ रुपये मदत

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन कोरोना सुरक्षा व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी “नारायणगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसुरक्षा निधीला” मदत करण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले असुन या आवाहनाला नारायणगावसह परिसरातील नागरिक उत्स्फुर्त प्रतिसाद देत भरभरुन मदत करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सरपंच पाटे यांचे मित्र सचिन तांबे यांचे चिरंजीव सिद्धेश सचिन तांबे, अर्जुन सचिन तांबे यांनी सरपंच योगेश पाटे यांच्याकडे खाऊसाठी जमलेले पैसे जवळपास ५,५५३ रुपयांचा डबा ग्रामनिधीसाठी सुपुर्त केला. यानिमित्तानं सरपंच पाटे यांनी या बालचमूंंचे कौतुक करत त्यांना घरीच राहून काळजी घेण्यास सांगितले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांनी ग्रामपंचायत सोडियम हायपोक्लोराईड फवारणी, धुराची फवारणी, गोरगरीबांना जेवन, हातावर पोट असलेल्यांना अन्न धान्यांचा पुरवठा, मोफत आरोग्य तपासणी व अौषध पुरवठा यांसह विविध उपक्रम राबवत असुन कोरोना सुरक्षेच्या नारायणगाव पॅटर्नचे लोकप्रतिनिधींसह प्रशासासह कौतुक होत आहे. यासाठी दानशुर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन नारायणगाव ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, मुलांचे पालक सचिन तांबे, राजेश पाटे, अनिल खैरे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, अजित वाजगे, अजय पाटे, ईश्वर पाटे, जालू खैरे, निखिल सावंत, तेजस पाटे उपस्थित होते.

Read more...

पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांची ‘डिक्की’ संस्था बेघर नागरिकांच्या मदतीला

पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे अध्यक्ष असलेली
‘डिक्की’ संस्था बेघर नागरिकांच्या मदतीला

 

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि. (१४) |कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये
पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे संस्थापक अध्यक्ष असलेली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) ही संस्था देखील आघाडीवर आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभर लागू केला. तथापि, राज्य शासनाने त्यापूर्वीच दोन-तीन दिवस अगोदर शाळा, महाविद्यालये, मॉल, थियटर बंद केली, त्यामुळे लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील बेघर, हातावर पोट असणारे नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनातील अधिका-यांनी उपाय योजण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्या आवाहनानुसार पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांच्या सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडून भोजन वितरणाची पहिली परवानगी डीक्कीला मिळाली, हे विशेष !

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंपाकगृहात सुमारे 2100 लोकांच्या जेवणाची तयारी गेल्या 28 मार्चपासून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या अधिका-यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे.

येरवड्यातील मदर तेरेसा समाज मंदिर, क्रांतीवीर लहूजी वस्ताद शाळा, साळवे इ लर्निंग स्कूल, तसेच नानासाहेब परुळेकर स्कूल (विश्रांतवाडी) आणि वडगाव शेरीतील आचार्य आनंदऋषी शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे नाष्टा आणि दोन वेळचे भोजन वितरित केले जाते. या कामी डिक्कीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा 40 जणांचा गट सहकार्य करत आहे. त्यामध्ये राजेश बाहेती, अनिल ओव्हाळे, राजू साळवे, अमित अवचरे, महेश राठी, कौस्तुभ ओव्हाळे, राजू वाघमारे, मैत्रयी कांबळे आणि सीमा कांबळे यांचा प्रमुख सहभाग आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचे औचित्य साधून 2100 खास स्वीट डिशेस देण्यात आल्याचे डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले. याशिवाय 129 वस्त्यांतील 1129 कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, दाळ यांचा समावेश असलेला शिधा (4 माणसांच्या कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतका) वितरित करण्यात येणार आहे.

डिक्की ही संघटना 14 एप्रिल 2005 रोजी स्थापना करण्यात आली. प्रत्येक राज्यात तिच्या शाखा आहेत. याशिवाय 7 देशातही ही संघटना पोहोचली आहे. सुमारे एक लाखांहून अधिक उद्योजक या संघटनेचे सदस्य आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची जबाबदारी आम्ही उचलली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर आणि इतर कर्मचा-यांची राहण्याची व्यवस्था बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात करण्यात आली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची सोय जुन्या शासकीय विश्रामगृहात (आय बी) करण्यात आली आहे. येथे सुमारे 40 जण राहत आहेत. यांच्याही भोजनाची जबाबदारी डीक्कीने उचलली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील पोलीस कर्मचारी व इतरांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.

Read more...

‘मदत नव्हे कर्तव्य’ आ.सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम

‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत मावळातील १४ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप

मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम

तालुक्यातील वाडी-वस्तीवरसुद्धा घरपोच मिळणार अन्नधान्य

मावळ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘लॉकडाउन’मुळे अनेकांचा रोजगार बुडाला. हजारो कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून मावळातील २० हजार गरजु कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याचा उपक्रम आमदार सुनील शेळके यांनी हाती घेतला आहे.
तालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र परिवार यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे सोमवारी (दि.१३एप्रिल २०२०) येथे सकाळी ११ वाजता या उपक्रमाची औपचारिक सुरूवात करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १४ हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तसेच सामाजिक संस्था, सभासद यावेळी उपस्थित राहणार आहेत.

याविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, कोरोना विषाणुविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना आम्ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून ह्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करुनच जीवनावश्यक वस्तू वाटप …
वाटप करताना प्रशासनाने दिलेल्या ‘सोशल डिस्टंसिंगबाबत सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. गरजु कुटुंबियांना एक महिना पुरेल इतका किराणासह अत्यावश्यक ११ वस्तुंचा संच तयार केला आहे. ग्रामीण भागातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ येथील गरजु कुटुंबांसह १९ आदिवासी गावे, डोंगर पठारावर असणारे पाडे, वाड्या वस्त्यांवर जावून घरपोच धान्यवाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी शासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घेतली जाईल, असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

Read more...
Open chat