जीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

जीएमआरटी खोडद येथे दि.२८ व २९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

खोडद | जागतिक विज्ञान दिनानिमित्त २८ व २९ फेब्रुवारी या दोन दिवशी जुन्नर तालुक्यातील खोडद येथे जीएमआरटी प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी हे दुर्बीण केंद्र व इतर विद्यालये व महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ( विनामूल्य ) खुले ठेवण्यात येणार आहे.विज्ञान प्रदर्शनात ४२ महाविद्यालये,३३ शाळा व २० संशोधन संस्था सहभागी होणार असून एकूण २०० प्रकल्प या प्रदर्शनात पहायला मिळतील, अशी माहिती विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता,
जीएमआरटीचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी,प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी दिली.

विज्ञान प्रदर्शनाच्या या आयोजनामुळे अनेक विद्यार्थांना अनेक प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअर बद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या भागातील विद्यालये, महाविद्यालये व शाळांना मागील अनेक वर्षांपासून खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाकडून गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रतील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वर्षी दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२० या दोन्ही दिवशी हे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वासाठी खुले असणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी सांगितले.

प्रदर्शनातील प्रकल्प प्राथमिक ( ५वी ते ७ वी ), माध्यमिक ( ८ वी ते १० वी ), उच्चमाध्यमिक ( डिप्लोमा, डिग्री , बी एस सी ) आणि अभियांत्रिकी ( इंजिनियरिंग ) अशा चार गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या ( नोंदणीकृत ) विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनाचे उदघाटन हैद्राबाद येथीलनॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (इसरो) वैज्ञानिक शंतनू चौधरी यांचे हस्ते २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे, तसेच कार्यक्रमाचा समारोप २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ परिवहन अधिकारी अनिल पंतोजी उपस्थित राहणार आहेत.

या विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष प्रा.यशवंत गुप्ता, संयोजक डॉ.जे.के.सोळंकी, सहसंयोजक अभिजित जोंधळे, जी.जे.शेलटन, प्रमोद पडवळ, अजी पुनातू , युवराज कांबळे, चारुदत्त कानडे, हनुमंतराव भंडारी, मंगेश सोमवंशी, गुंडीराज थोरात, मंगेश उंबरजे, ज्ञानेश्वर पवार, विनोदकुमार वर्मा, सुरेंद्र गोरील, भावेश कुणबी, दिव्य ओबेरॉय, प्रीतिष मिश्रा यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी परिश्रम घेतले आहेत.

या विज्ञान प्रदर्शनात नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (इसरो) – हैद्राबाद यांचा ‘स्पेस ऑन व्हील्स’ हा प्रकल्प विशेष आकर्षण असणार आहे, तसेच कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, आघारकर अनुसंधान संस्था, पुणे,राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ( नारी ), पुणे,आघारकर अनुसंधान संस्था – पुणे, पुणे, भारतीय उष्ण देशीय हवामान विज्ञान संस्था, पुणे, भूशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, मॉझील्ला, इंडिया, आयुध अनुसंधान एवं विकास स्थापना ( ए आर डी ई ), पुणे,प्लाझ्मा अनुसंधान संस्था, गांधीनगर, गुजरात, विज्ञान वाहिनी यांचे प्रयोग, स्पेस ओडिसी प्लॅनेटोरिअम-अहमदनगर, फ्री सॉफ्टवेअर कम्युनिटी इंडिया, विज्ञान आश्रम – पाबळ, सी- स्काय दुर्बीण, मुंबई,आकाश मित्र मंडळ, मुंबई, पुणे जिल्ह्यातील शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जवळपास २०० प्रकल्प या प्रदर्शनात असणार आहेत.

Read more...

शिवनेरी विकास कामांंसाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवनेरी विकास कामासाठी २३ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर (दि.१९) | किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता तेवीस कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमांत ते बोलत होते. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अतुल बेनके, दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्ह्याचा ६५० कोटी रु.चा वार्षिक आराखडा तयार केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटी रु.चा निधी दिला जाईल. राज्याच्याआगामी अर्थ संकल्पात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे.

शालेय शिक्षण, अंगणवाडया, आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले, शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, शिक्षण यांची माहिती सर्वांना होण्यासाठी ‘जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ’ या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल. तसेच वयस्कांच्या सोयीसाठी रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन महत्त्वाचे आहे. बॉस्टन विद्यापीठात ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ अशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठ्यपुस्तकांतून महाराजांवरील गौरवपर धड्याचा समावेश ही शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुध्द नव्हती, तर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती. महाराजांचा कित्ता गिरवणे, ही आजची गरज आहे.

यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे नैतिकतेचे अधिष्ठान दिले, त्यामुळेच महाराजांच्या चरित्राचे गारुड आजही कायम आहे. जेेष्ठयांना शिवनेरीवर येण्यासाठी रोप वे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी केली. कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते माजी सहायक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अपर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. सुरवातीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटी शाखेच्या नूतन शाखेचे व एटीएम केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अतुल बेनके यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक घोलप यांनी मानले.

Read more...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द–मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सजग वेब टिम, जुन्नर

पुणे (दि.१९)| गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबध्द राहील ,असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्य मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे,खा. डॉ.अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माॕसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा पाठीशी राहू द्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवनेरी आपले वैभव आहे.या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली.या दिशेने सरकारचे काम चालू आहे. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता घेतली जात आहे. परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उप मुख्य मंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सह
असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

Read more...

शरद लेंडे यांच्या एक मताने झालेल्या विजयावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब 

जि.प.निवडणुक निकालाबाबत मंगेश काकडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

शरद लेंडे यांच्या एक मताने झालेल्या विजयावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब 

सजग वेब टीम पिंपळवंडी

पिंपळवंडी । जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या आळे-पिंपळवंडी गटामधून 21 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांचा एक मताने पराभव केला होता.

सदर निकालाविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी जिल्हा न्यायालय खेड येथे लेंडे यांच्या विजयाला आक्षेप घेणारी निवडणुक याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायलयाने फेटाळली आहे.

मंगेश काकडे यांनी शरद लेंडे यांना टपालाद्वारे मिळालेल्या मतपत्रिकांपैकी ३१ मतपत्रिकेस हरकत घेतली होती. सदर हरकत खेड न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एन.के.ब्रह्मे यांनी फेटाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेला निकाल कायम केला आहे.

सदर प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तर्फे ॲड. गिरीश कोबल यांनी काम पाहिले. तर जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांचे तर्फे ॲड.सुमित निकम, ॲड. विश्वास दौंडकर, ॲड.सुधीर कोकाटे, व ॲड.सागर थोरात यांनी काम पाहिले.

Read more...

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे शांततेत मतदान

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना निवडणूकीचे शांततेत मतदान

१९,१५४ मतदारांपैकी १०,६५५ मतदारांनी बजावला सरासरी ५५.६२% मतदानाचा हक्क

उद्या सोमवार (दि.१०) श्री.क्षेत्र ओझर येथे मतमोजणीनंतर जाहीर होणार निकाल

सजग वेब टीम जुन्नर 

शिरोली बु. । जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज रविवार (दि.९) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कालावधीत शांततेत मतदान पार पडले. जुन्नर,शिरोली बु.||., ओतूर, पिंपळवंडी आणि घोडेगाव असे पाच गट तसेच महिला राखीव प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग यासाठी ५५.६२% सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीखंडे साो. यांनी दिली

विघ्नहर कारखान्याचे एकूण १९१५४ सभासद आहेत. त्याकरिता जुन्नर, शिरोलीबु.||., नारायणगाव, ओतूर, पिंपळवंडी, बोरी बु.||. आणि मंचर अशी एकूण-७ मतदार केंद्र तयार करण्यात आली होती.

(नारायणगाव मतदान केंद्र येथे विजयी मुद्रा दाखवताना चेअरमन सत्यशिल शेरकर, संतोषनाना खैरे, कुंडलिक गायकवाड, गणेश कवडे व कार्यकर्ते )

जुन्नर गटामध्ये ३०५० पैकी १८३८ (६०.२६%), शिरोली बु.||. गटामध्ये ४३४६ पैकी शिरोली बु. येथे १४०६ ( ६४.४६%) व नारायणगाव येथे १२४५ ( ५७.५०%), ओतूर गटामध्ये ३३८८ पैकी १७०६ (५०.३५% ), पिंपळवंडी गटामध्ये ६१६५ पैकी पिंपळवंडी येथे १८१२ ( ५१.०९% ) व बोरी बु .|| येथे १५७६ ( ६०.१७% ) तर घोडेगाव गटामध्ये २२०५ पैकी १०७२ ( ४८.६१% ) मतदारांनी आपली मतदानाचा हक्क बजावला.

वरील सर्व आकडेवारी पाहता श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या एकूण १९१५४ सभासद मतदारांपैकी १०, ६५५ मतदारांनी मतदान केले असून सरासरी ५५.६२% मतदान झाले आहे. उद्या सोमवार ( दि.१०) श्री क्षेत्र ओझर येथे मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीबाबत बोलताना शिवनेर पॅनलचे प्रमुख सत्यशिल शेरकर म्हणाले की, शेतकरी वर्गाविषयी असलेली तळमळ आणि पारदर्शक कारभारामुळे ही निवडणूक पूर्णतः सभासद मतदारांनी हातामध्ये घेतली होती. त्यामुळे सभासद मतदारांचा विश्वास आणि उस्फूर्तपणे केलेल्या मतदानामुळे शिवनेर पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधीक्क्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read more...

माझा लाव रे तो व्हिडिओ करु नका – आमदार अतुल बेनके

माझा लाव रे तो व्हिडिओ करु नका – आ.अतुल बेनके

विघ्नहर कारखान्याने पारदर्शक कारभार करुन शेतकरी, सभासद, कामगार यांचे हित जोपासले – चेअरमन सत्यशिल शेरकर

कारखाना प्रयोगशिल, प्रगतीशील असल्याने शेतकर्‍यांचीही प्रगती झाली – कृषिरत्न अनिल मेहेर

२१ – ० असा निकाल देऊन विरोधकांना जागा दाखवा – जि.प.सदस्या आशाताई बुचके

आर्थिक सुबत्तेबरोबर आरोग्य विकासासाठी कारखान्याने प्रयत्न करावे – सरपंच योगेश पाटे

सजग वेब टीम नारायणगाव

नारायणगाव । श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.जुन्नर आंबेगाव संचालक मंडळ निवडणुक २०२० चा शिरोली गटाची उस उत्पादक व सभासदांची सभा शिवनेर पॅनेलचे प्रमुख चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या प्रमुख उपस्थित नारायणगाव जयहिंद पॅलेस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या सभेचे प्रास्तविक लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी करत विजय शिवनेर पॅनेलचा आहे. विघ्नहर कारखान्याने तालुक्यात आर्थिक सुबत्ता आणली आहेच परंतु तालुक्यातील कॅन्सर आजाराचे प्रमाण पाहता, आर्थिक सुबत्तेबरोबर आरोग्य विकासासाठी कारखान्याने प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले.

यानिमित्तानं कृषिरत्न अनिल मेहेर म्हणाले की, निवृत्तीशेठ शेरकर यांची अोळख देवमाणुस होती. पुढे सोपानआण्णा नंतर सत्यशिल सक्षमपणे नेतृत्व करतायतं. निवृत्तीशेठ आणि वल्लभशेठ यांनी सोबत काम केलं आज सत्यशिल आणि अतुल सोबत काम करतायतं ही कौतुकाची बाब आहे. विघ्नहर कारखान्याचा नावलौकिक राज्यासह देशात सत्यशिल शेरकर यांनी पोहचवला. तसेच कारखाना प्रयोगशिल, प्रगतीशील असल्याने शेतकर्‍यांचीही प्रगती निश्चित झाली आहे. यांसह विरोधकांच्या प्रश्नांना कृषी जाणकार म्हणुन उत्तरे देत मेहेर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कारखान्याच्या निवडणुका लागल्याने चांगल्या कामासाठी सर्व पक्ष एकत्र आले. आपल्या सर्वांना प्रत्येक गटातुन जास्तीत जास्त मतदान करुन घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुस्लिम समाजानेही शेठबाबांना साथ दिली आहे. २१ – ० असा निकाल देऊन विरोधकांना जागा दाखवा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी केले.

विघ्नहर कारखान्याने पारदर्शक कारभार करुन शेतकरी, सभासद, कामगार यांचे हित जोपासले आहे. मोफत माती परिक्षण, बायोकंपोस्ट खत ना नफा न तोटा पद्धतीने दिलं जातयं, शेतकर्‍यांना आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रमातुन मार्गदर्शन केले जातयं. त्यामुळे आज अनेक शेतकरी १०० टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेतायतं. यासाठी विघ्नहर कारखाना शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडवत आहे. सध्या १३९ कारखान्यांपैकी ६२ बंद पडलेत. ६६ खाजगी आणि ७७ सहकारी कारखाने कार्यरत आहे. कारखाने बंद पडण्यामागे आणि खाजगीकरणासाठी राजकारण कारणीभुत आहे. परंतु आपल्याला कारखाना टिकवायचाय यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते शेतकरी हितासाठी एकत्र आलो असे मनोगत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी करत सभासदांना कपबशी चिन्हांवर मतदान करुन शिवनेर पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केले.

विघ्नहर कारखान्याने शेतकर्‍यांचं समाधान करण्याचं काम केलयं. यानिमित्तानं आमदार अतुल बेनके यांनी कपबशी चिन्हाला मतदान करा असे आवाहन करत विधानसभेला असलेलं आशाताईंचं हे चिन्ह होतं त्या विसणार नाहीत. पण आता मी सांगतोय शिवनेर पॅनेलच्या कपबशील मतदान करा पण माझा लाव रे तो व्हिडिओ बनवु नका असे सांगताच सभेत एकच हशा पिकला. त्याचबरोबर चीन दौरा व कोरोना व्हायरस वरुन माजी आमदारांना बेनके यांनी नाव न घेता कोपरखळी मारली. तसेच धरणातल्या मृतसाठ्याला हात लावु न देण्याचा निर्णय आम्ही केलाय. त्यामुळे जुन्नरमधील शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता पडु देणार नाही. रोजगार निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण स्मारक प्रकल्प होणार आहे. तसेच शिवजयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर तालुक्यासाठी महत्वाची घोषणा करणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले. यावेळी गुलाब नेहरकर यांनीही मनोगत व्यक्त केेले

या सभेला आमदार अतुल बेनके, चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, बाळासाहेब पाटे, जि.प.सदस्य आशाताई बुचके, गणपत कोकणे, अनिलतात्या मेहेर, रमेश भुजबळ, एम.डी.भुजबळ, अशोक पाटे, शरद चौधरी, एकनाथ शेटे, संजय पानसरे, सुजित खैरे, संतोष दांगट, सचिन वारळे, संतोष वाजगे, विलास पाटे, यांसह शेतकरी, सभासद, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, आजी माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी केले. सुत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले तर आभार शिरोली गटाचे उमेदवार संतोष खैरे यांनी मानले.

Read more...

खासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

खासदार डॉ .अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

 

सजग वेब टीम, सणसवाडी शिरुर

शिरुर । खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील दुसरे शिबिर आज हडपसर येथे संपन्न झाले. जि.प सदस्या सौ.सुजाता पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.

                शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ३०१ ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सभापती मोनिकाताई हरगुडे, रविबापू काळे, पंडित दरेकर, आदी उपस्थित होते. तसेच स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्यावतीने डॉ.रवी गुप्ता, डॉ.सागर कानेकर, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ.निहार प्रधान, डॉ.यशवंत सिंह, डॉ.सुरजित पेन, डॉ.स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read more...

तमाशा कलावंतांवर हल्ला करणार्‍यांविरोधात मोक्का सारखा कायदा करा – सरपंच योगेश पाटे

तमाशा कलावंतांवर हल्ला करणार्‍यांविरोधात मोक्का सारखा कायदा करा – सरपंच योगेश पाटे

गतपुरी साकुर येथील हल्ल्यात जखमी कलावंताची सरपंच पाटे यांनी रुग्णालयात घेतली भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलावंतांना सरंक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – अविष्कार मुळे

तमाशा कलावंतांवरील हल्ल्याचा नारायणगाव येथे जाहीर निषेध 

सजग वेब टीम नारायणगाव 

नारायणगाव । इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) रोजी मध्यरात्री तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. तसेच महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडला. यात कलावंत विकास भारद्वाज व देवानंद मोरे यांना गंभिर मारहाण झाली असुन याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वाडीवºहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.

या घटनेनंतर आज लोकनियुक्त सरपंच योगेश बाबु पाटे यांनी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तमाशा कलावंत देवानंद मोरे यांची भेट घेत विचारपुस केली. तसेच तमाशा कलावंतावर होणार्‍या हल्लांविषयी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन कलावंतांशी असभ्य वर्तन व हल्ला करणार्‍यांविरोधात मोक्का सारखा कायदा करावा असे सजग टाईम्सशी बोलताना सांगितले.

यावेळी अखिल मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष व पांडुरंग मुळे तमाशा फडाचे मालक अविष्कार मुळे मांजरवाडीकर यांनी तमाशा परिषदेकडून जाहीर निषेध करीत तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ती टिकली पाहिजे त्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत घेत असतो. परंतु अशा गावगुंडांनी येऊन त्रास दिला तर लोककला कशी टिकेल असा प्रश्न पडला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलावंतांना सरंक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे, माजी उपसरपंच संतोष दांगट, सदस्य आरिफ आतार, गणेश पाटे, काशिनाथ अल्हाट,अनिल खैरे, मुन्ना पठाण, पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांसह तमाशा कलावंत उपस्थित होते.

या घटनेच्या निषेधार्थ तमाशा पंढरी नारायणगाव येथे तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्याजवळ नारायणगाव ग्रामपंचायत, श्री.मुक्ताई देवस्थान ट्रस्ट, तमाशा कलावंत व ग्रामस्थांच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी कारखान्याचे संचालक संतोष खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, आशिष माळवदकर, माजी उपसरपंच संतोष दांगट, सदस्य आरिफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, ज्ञानेश्वर अौटी, काशिनाथ अल्हाट, महेबुब काझी, दिपक वारुळे, अनिल खैरे, तमाशा कलावंत सीमा पोटे, कलाकार संजय फल्ले, निलेश दळवी, राजेश रत्नपारखी, पत्रकार प्रा.अशफाक पटेल यांसह तमाशा कलावंत, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read more...


शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध – चेअरमन सत्यशिल शेरकर

विरोधकांना पुन्हा कारखान्याला उभे राहण्याची इच्छा होणार नाही अशा भव्य मतांनी शिवनेर पॅनेलला विजयी करा – संजय काळे

पाण्यासाठी जेलमध्ये जायलाही दादा मागे हटले नाही. शेतकर्‍यांसाठी सत्यशिलदादा सदैव कार्यरत – अशोक घोलप, व्हाईस चेअरमन 

सजग वेब टीम जुन्नर 

जुन्नर । श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.जुन्नर आंबेगाव संचालक मंडळ निवडणुक २०२० चा जुन्नर गटाची उस उत्पादक व सभासदांची सभा शिवनेर पॅनेलचे प्रमुख चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या प्रमुख उपस्थित कोंडाजीबाबा डेरे सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

शेठबाबा, सोपानशेठ यांच्यानंतर सत्यशिलदादा समर्थपणे कारखाना सांभळतायत. पाण्यासाठी जेलमध्ये जायलाही दादा मागे हटले नाही. शेतकर्‍यांसाठी सत्यशिलदादा सदैव कार्यरत आहेत. त्यामुळे ९ तारखेला बहुमताने शिवनेर पॅनेलला निवडुन देण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

ऐतिहासिक निर्णयासाठी आपण अाज एकत्र जमा झालो आहोत. कारखान्याने जुन्नर तालुक्याचं भाग्य बदललं. यात शेरकर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. आज सत्यशिलदादांच्या नेतृत्वाखाली कारखाना रोल माॅडेल म्हणुन समोर येतोय ही गौरवाची बाब आहे. राजकारण बाजुला ठेवुन सर्वांना सोबत घेत दादा काम करतायत असे प्रतिपादन डाॅ.सुनिल शेवाळे यांनी केले.

शेठबाबांपासुन विरोधकांना सभासद थारा देत नाही. शेठबाबांच्या विचारांवर आणि आण्णांच्या आदर्शांवर सत्यशिलदादा कार्यरत आहेत. यापुढेही दादांनी असवच चांगले काम करुन त्यांनी सभासदांचे हित जपत चांगला बाजारभाव द्यावा असे मनोगत लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे यांनी व्यक्त केले.

भारतात असलेल्या कारखान्यांमध्ये विघ्नहर कारखान्याचं नाव आवर्जुन येतं ही कौतुकाची बाब आहे. दिवसेंदिवस कारखान्याचा आलेख उंचावत चालला आहे. पाच वर्ष विरोधी पॅनेलवाले कुठ असतात असा सवाल यावेळी मनोगत व्यक्त करताना अोबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी उपस्थित केला.

सत्यशिलदादांचा कारभार शेतकर्‍यांना न्याय देणार आहे. त्यामुळे राज्यासह देशात विघ्नहर कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्यापुढील आव्हाने पेलुन सत्यशिलदादा शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहेत असे जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी सांगितले.

सभासद उत्स्फुर्तपणे सत्यशिलदादांच्या शिवनेर पॅनेल सोबत आहेत. विरोधकांना पुन्हा कारखान्याला उभे राहण्याची इच्छा होणार नाही अशा भव्य मतांनी शिवनेर पॅनेलला विजयी करा असे वक्तव्य सभापती संजय काळे यांनी व्यक्त केले.

राजकारणामुळे अनेक कारखाने बंद पडलेत. काही सहकारी कारखान्यांच्या चेअरमनी खाजगी कारखाने उभे केलेत ही खेदाची बाब. आपल्याला विघ्नहर कारखाना संस्था टिकवायची, वाढवायची आहे. त्यासाठी सर्व संचालक कार्यरत आहेत. शेतकर्‍यांचा ऊस चांगला यावा यासाठी तज्ञांकडुन मार्गदर्शन केलं जातयं आणि त्यामुळे अनेकजण १०० टनाच्यापुढे उत्पादन घेतायतं ही तसेच विघ्नहर कारखान्याचा हुमनी किड पॅटर्न राज्याने स्विकारला कौतुकाची बाब आहे. पुणे जिल्ह्यात दोन नंबरचा बाजारभाव विघ्नहर कारखाना देतोय. शासनाच्या निर्णयामुळे कारखानदारी अडचणीत येतेय. शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे तसेच कारखान्याच्या माध्यमातुन कुकडेश्वर मंदिराचे कामे पुर्ण केले आहेच परंतु पुरातत्त्व खात्याने परवानगी दिल्यास कुकडेश्वर मंदिराचा कळसही लावु देऊ असे मनोगत शिवनेर पॅनेल प्रमुख चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी व्यक्त केला.

या सभेच्या निमित्ताने अॅड.मारुती ढमढेरे, मच्छिंद्र कबाडी, सिताराम खिलारी, हिराताई चव्हाण, सुरेखाताई गांजाळे, संतोष ढोबळे यांची मनोगते झाली.

यावेळी शिवनेर पॅनेलचे पॅनेल प्रमुख सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सभापती संजय काळे, जि.प.सदस्य शरद लेंडे, देवेंद्र खिलारी, पं.स.गटनेते दिलीप गांजाळे, उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, फिरोज पठाण, भाऊ कुंभार, अविनाश कर्डिले, बाबा परदेशी, दिनेश दुबे, पापा खोत, बाजीराव ढोले, भाजपाचे उल्हास नवले, यांसह शिवनेर पॅनेलचे सर्व उमेदवार, कारखान्याचे महिला – पुरुष सभासद व विविध पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या सभेचे प्रास्तविक व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी केले. सुत्रसंचालन व्हि.डी.पानसरे यांनी तर आभार जुन्नर गटाचे उमेदवार देवेंद्र खिलारी यांनी मानले

Read more...

उर्वरित १६५ रुपये देऊन ‘एफआरपी’पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा मानस – सत्यशिल शेरकर

उर्वरित १६५ रुपये देऊन ‘एफआरपी’पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा मानस – सत्यशिल शेरकर

सजग वेब टिम, जुन्नर

ओझर | श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी खासदार निवृत्ती शेरकर यांनी केल्याने तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले त्यावेळचे नेते माजी आमदार शिवाजीराव काळे, वल्लभ बेनके तसेच तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी सहकारात राजकारण न आणता कारखान्याच्या उभारणीत हातभार लावला व विकासाची गंगा आणण्यास मदत केली. आजही सर्वपक्षीय नेत्यांनी विदयमान अध्यक्षांना पाठिंबा दिला. परंतू काहींनी हि निवडणूक लावण्यास हातभार लावला व स्वतः मात्र बाजूला झाले.परंतू सर्व मतदार वर्ग सत्यशील शेरकर यांच्या पाठिशी उभा राहतील. त्यांच्या शिवनेर पॅनलच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील असा विश्वास जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी व्यक्त केला.
विघ्नहर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या शिवनेर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र ओझर ( ता. जुन्नर ) येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध पक्षातील नेते, सभासद, ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. सभासद हेच खऱ्या अर्थाने कारखान्याचे मालक आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला बिनविरोध निवडून दिले. आम्ही प्रामाणिकपणे काम करून सभासद, ऊस उत्पादक, कामगार, वाहतूकदार तसेच कामगारांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तसेच उर्वरित १६५ रुपये लवकरचं शेतकर्‍यांना देऊन एफआरपी पेक्षाही अधिक रक्कम देण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व शिवनेर पॅनलचे प्रमुख सत्यशील शेरकर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात केले.

यावेळी मंगलदास बांदल, पांडूरंग पवार, शरद लेंडे, आशा बुचके, बाळासाहेब खिलारी,बी.व्ही. मांडे, गुलाब नेहरकर, संभाजी तांबे, कैलास काळे, उल्हास नवले, वर्षा काळे, शुभांगी लाटकर यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ कवडे यांनी केले तर पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read more...
Open chat