जुन्नर तालुका राष्ट्रवादी म्हणतेय ‘आमचं ठरलंय’ अतुल बेनकेच
जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल करायचा, असा निर्णय जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. – पांडुरंग पवार
सजग वेब टिम, जुन्नर , स्वप्नील ढवळे
नारायणगाव | जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल करायचा, असा निर्णय आज झालेल्या तालुका बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत इच्छुकांशी चर्चा करण्यासाठी आज नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. या वेळी पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी उमेदवारीसाठी बेनके यांची शिफारस केली. जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
” आमचं ठरलंय “
सभापती संजय काळे म्हणाले, “सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो. आमच्यातील मतभेदाचा फटका पक्षाला बसला. परंतु आता बेनके व माझ्यातील मतभेद संपुष्टात आले असून पक्ष तालुक्यात एकसंध झाला आहे. जुन्नरचा पुढील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, अशी ग्वाही आम्ही आमचे नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. उमेदवारीसाठी आम्ही बेनके यांच्या नावाची शिफारस १५ जून रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली होती. कोणत्याही परिस्थितीत अतुल बेनके यांना आमदार करायचं, असं आमचं ठरलंय. याबाबत शंका घेण्याचे कारण नाही.”
या बैठकीस अनिल मेहेर, महिला तालुकाध्यक्षा सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, आदिवासी नेते दादाभाऊ बगाड, तुळशीराम भोईर, तुषार थोरात, फिरोज पठाण, सूरज वाजगे, वाय. जी. गायकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत बोलताना पवार म्हणाले की, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली असल्याने सर्व मतभेद बाजूला ठेवून या वेळी जुन्नरच्या उमेदवारीसाठी अतुल बेनके यांची शिफारस करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे एक जुलै रोजी बेनके यांचेच एकमेव नाव उमेदवारीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनीही बेनके यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना बेनके म्हणाले, “माझ्या नावाची सर्वानुमते शिफारस केली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मागील पाच वर्षांतील चुकीच्या धोरणाचा फटका तालुक्यातील जनतेला बसला आहे. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड नाराजी आहे. कुकडीच्या पाण्यासाठी मी सर्वस्व देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करील.”
या बैठकीचे सूत्रसंचालन विकास दरेकर, अरविंद लंबे यांनी केले.