पांडुरंग पवार यांच्या निधीतून बांगरवाडी पाझरतलाव दुरुस्ती ग्रामस्थांमध्ये समाधान
sajagtimes2019-05-30T05:09:32+00:00
बांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार – पांडुरंग पवार
बेल्हे | बांगरवाडी येथील १९७८ साली बांधलेला व त्यावेळी झालेल्या निकृष्ट कामामुळे सध्या कुचकामी ठरलेल्या पाझरतलावाचे दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रगतीपथावर आहे.
यामुळे पावसाळ्यानंतर परिसरातील विहिरींची व विंधनविहीरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात परिसरातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा पाझरतलाव विशेष फायदेशीर ठरणार आहे.बांगरवाडी येथे गावठाण हद्दीजवळ दुधवडी व बांधुडा या दोन डोंगरांच्यामध्ये सुमारे चाळीस वर्षांपूर्वी झालेला जुना पाझरतलाव आहे. या पाझर तलावातून पावसाळ्यात तलाव भरल्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती असून अडचण व नसून खोळंबा अशी या पाझरतलावाची परिस्थिती होती व गळतीमुळे पाणी वाहून जात असल्याने पाण्याचा विशेष फायदा होत नव्हता. या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास २२ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
या दरम्यान या पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर असून, काल (ता.२९) सकाळी या कामाची जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी सरपंच जालिंदर बांगर, उपसरपंच हेमलता बांगर, बाळशीराममहाराज बांगर, प्रदीप पिंगट, मोहन बांगर, मंगेश बांगर, बाबू बांगर, सचिन बांगर, गोविंद बिचारे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान या पाझर तलावाची पाण्याची गळती थांबविण्यासाठी बंधाऱ्याच्या भिंतीत ६० ते ७० फूट खोल चर खोदून ५०० मायक्रोन जाडीचा प्लास्टिक कागद टाकून माती टाकून त्यावर रोलिंग करण्यात आले असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले. हा प्लास्टिक कागद सुमारे ६० वर्षे टिकू शकतो.या बंधाऱ्यात एकूण २.४३ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होणार असून बांगरवाडीचा पाणिप्रश्न सुटणार असल्याचेही पांडुरंग पवार यांनी सांगितले.आगामी काळात बांगरवाडी परिसर कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही पांडुरंग पवार यांनी स्पष्ट केले.