स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अबॅकस गणिती तंत्र शिकवणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल
पामा इंडियाचे काम कौतुकास्पद – बी.व्ही.मांडे
ओझर | पामा इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणारी राष्ट्रीय पातळीवरील बौद्धिक गणित स्पर्धा (अबॅकस) श्री क्षेत्र ओझर येथे (दि ५ व ६ जुन ) रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पामा इंडियाचे सुमारे पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताच्या विविध भागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून 19 व्या ग्लोबल आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच दरवर्षी या स्पर्धेसाठी चोवीस देशातून विद्यार्थी सहभागी होत असतात अशी माहिती पामा इंडिया चे चेअरमन आबाजी काळे यांनी दिली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी पामा इंडियाच्या उपाध्यक्षा शिल्पा काळे, संचालक शिवराज पाटील, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, अॅड. कुलदीप नलावडे, प्रा.अशफाक पटेल, सरपंच अस्मिता कवडे, दिग्दर्शक विजय झिंजाड, रामदास कुटे, ह.भ.प दर्शन महाराज कबाडी, कलाध्यापक संघाचे कुसाळकर सर, या प्रमुख पाहुण्यांसह आकाश रायकर, तेजस बोर्हाडे, मनीषा अौटी, विजय कुर्हाडे, सुप्रिया मोढवे, श्रीतिजा वामन, अॅड.रत्ना हांडे, नमिता दांगट, विकास काळे हे उपस्थित होते.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे यांनी पामा इंडियाच्या उपक्रमाचे जुन्नरचे सुपुत्र असल्याने आबाजी काळे यांचा अभिमान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रा.अशफाक पटेल यांनी सध्याचे स्पर्धेचे युग पाहता विद्यार्थ्यांना अबॅकस सारखे गणिती तंत्र शिकवणे गरजेचे असुन ही अत्याधुनिक तंत्रप्रणाली शिकणारे विद्यार्थी भविष्यात देशाच्या प्रगतीला हातभार लावु शकतात असे सांगत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मास्टर अबॅकसचे संचालक शिवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पामा इंडिया नॅशनल अबॅकस या भव्यदिव्य स्पर्धेचे मॅनेजमेंट ड्रीम्स स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंटने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड्रीम्स स्पार्क इव्हेंटचे चेअरमन गणेश मोढवे यांनी केले.
Leave a Reply